- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Nursing Training:Akola:health: परिचर्या प्रशिक्षण विद्यालय ठरतेय मैलाचा दगड; हजारो युवतींना दिले रोजगाराचे साधन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ओळख संस्थेची
ॲड.नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: गेल्या तब्बल 63 वर्षांपासून हजारो युवतींना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणारे, जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या अखत्यारीतील परिचर्या प्रशिक्षण विद्यालय हे वैद्यकीय क्षेत्रात मैलाचा दगड ठरत असल्याची माहिती प्राचार्या संगीता साने यांनी दिली. आज बुधवार 26 मे रोजी हे विद्यालय आपल्या कारकीर्दीची 63 वर्षे पूर्ण करून 64 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या विद्यालयाच्या स्थापनेपासून आज पर्यंतचा इतिहास उलगडला.
ही संस्था लेडी हार्डिंग या नावानेच आजही पंचक्रोशीत प्रसिद्ध
प्राचार्या संगीता साने
संगीता साने यांनी सांगितले, की जिल्हा स्त्री रूग्णालयाचे पूर्वीचे नाव लेडी हार्डिंग हॉस्पिटल होते. ही संस्था लेडी हार्डिंग या नावानेच आजही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. स्त्रियांसाठीच्या या रूग्णालयात पूर्वीपासूनच प्रसूती व स्त्रीरोगासंदर्भात उपचार केले जातात. ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळात ख्रिश्चन मिशनरी यांनी सुरू करून ब्रिटीश सरकारला सुपूर्द केली. ग्रामीण भागात माता व बालसंगोपन सेवा देण्यासाठी सन 1958 मध्ये प्रथमत: याठिकाणी सहाय्यक परिचारिका प्रसविका अर्थात 'एएनएम' हा प्रशिक्षण कोर्स सुरू करण्यात आला. 1958 ते सप्टेंबर 1983 पर्यंत एकूण 26 बॅचेसमधून जवळपास 800 परिचारिका या ठिकाणी प्रशिक्षित झाल्या.
त्यानंतर मार्च 1983 मध्ये Step Ladder हा 1 वर्षाचा प्रशिक्षण कोर्स Health for all by 2000 AD च्या ध्येयपूर्तीसाठी सुरू झाला. दर 6 महिन्यांनंतर 50 प्रशिक्षणार्थींची बॅच अशा एकूण 8 बॅचेसमध्ये 547 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित झाल्यात. त्यावेळी महाराष्ट्र परिचर्या परिषद, मुंबई 1 वर्षाच्या परिचर्या प्रशिक्षणास नोंदणी देण्यास तयार नसल्यामुळे 6 महिने प्रमोशनल प्रशिक्षण देवून परिषदेची नोंदणी करण्यात आली. जानेवारी 1988 पासून भारतीय परिचर्या परिषद व महाराष्ट्र परिचर्या परिषदेचा मान्यताप्राप्त दीड वर्षाचा RANM / MPHW (F) प्रशिक्षण कोर्स सुरू करण्यात आला.
1988 ते 1998 पर्यंत प्रत्येक 6 महिन्यांनंतर बॅचेस घेण्यात येत होत्या. त्यानंतर प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात 20 प्रशिक्षणार्थींची बॅच घेण्यात येत होती. 2005 नंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 40 प्रशिक्षणार्थींच्या 4 बॅचेस घेतल्यानंतर परत प्रती 20 प्रशिक्षणार्थींची भरती व प्रशिक्षण 2 वर्षांचे झाले. अशा जवळपास 1000 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित झाल्या. या संस्थेमार्फत जवळपास 2500 प्रशिक्षणार्थी आजपर्यंत प्रशिक्षित झाल्या आहेत. सन 1960 पर्यंत जनरल नर्सिंग पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थी 6 महिन्यांचा 'मिडवाइफरी कोर्स' करण्याकरिता जिल्हा स्त्री रुग्णालयात येत असत. अशा एकूण 53 बॅचेसमधून जवळपास 827 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित झाल्या आहेत. या प्रशिक्षण संस्थेत अनेक प्रशिक्षकांनी अध्यापनाचे कार्य केले. 1958 मध्ये श्रीमती वर्की या ट्युटर्स होत्या तर श्रीमती दिवे या मेट्रन होत्या. येथून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या हजारो सहाय्यक परिचारिका प्रसाविका आरोग्य विभागात सेवा देत आहेत.
संस्था सुरू झाली तेव्हा सध्याच पाडण्यात आलेल्या परिचारिका निवासस्थानात प्रथम परिचर्या प्रशिक्षण प्रशाला सुरू करण्यात आली होती. मेस व वसतिगृह त्याच परिसरात होते. पहिलेच क्वार्टर हे मेट्रनचे होते. 1974 मध्ये परिचर्या प्रशिक्षण प्रशाला नवीन इमारतीमध्ये स्थानांतरीत करण्यात आली. या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांच्या हस्ते झाले. ही इमारत सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. 100 प्रशिक्षणार्थीचे वसतिगृह देखील आहे. यापुढेही ही संस्था अशीच वाटचाल करीत राहील. रूग्णालयाला 500 खाटांची मंजूरी असून, येथे बालतज्ज्ञ परिचारिका प्रशिक्षण कोर्स प्रस्तावीत आहे, असेही संगीता साने यांनी सांगितले.
गेल्या दीड वर्षांच्या काळात सर्वत्र कोरोनाने थैमान घातल्याच्या पृष्ठभूमीवर परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील अध्यापिका आणि प्रशिक्षणार्थी यांनी प्राचार्या संगीता साने यांच्या मार्गदर्शनात एक ध्वनीचित्रफीत तयार करून जनतेमध्ये कोरोनाप्रती जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. संगीता साने यांच्या कार्यकाळात या विद्यालयाने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा