Mukund Khaire: भारतीय संविधानचे गाढे अभ्यासक प्रा.मुकुंद खैरे यांचे कोरोनाने निधन





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: समाजक्रांती आघाडीचे अध्यक्ष आणि घटनेचे अभ्यासक ॲड. प्रा. मुकुंद खैरे (मूर्तिजापूर) यांचे आज बुधवारी, सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान कोरोना आजाराने अकोला येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होते. यापूर्वी त्यांची पत्नी छायाताई आणि मुलगी ॲड. शताब्दी यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले.





प्रा. मुकुंद खैरे मागील काही दिवसांपासून कोरोना आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या पत्नी व मुलगी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पत्नी छायाताई यांचे गत आठवड्यात तर मुलगी ॲड. शताब्दी हिचे  2 मे रोजी उपचारा दरम्यान अकोला येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. 




प्रा.खैरे यांनी मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. या दरम्यान त्यांनी समाज क्रांती आघाडी या सामाजिक संस्थेची 6 डिसेंबर 1991 रोजी स्थापना केली. ही संघटना पुढे नेत देशव्यापी झाली. भारतीय राज्यघटनेचे (भारताचे संविधान) गाढे अभ्यासक, प्रभावी वक्ते,कुशल संघटक अशी त्यांची ख्याती होती.




समाज क्रांती आघाडीच्या माध्यमातून त्यांनी वंचित शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला. संघटनेची चैत्यभूमी मुंबई येथे  स्थापना केली. बुद्ध गया मुक्ती आंदोलन, संविधान बचाव, राजकारणाला भ्रष्ट्राचार मधून मुक्ती आंदोलन, दसरा छोडो 24 ऑक्टोबर का स्वीकार करो, भूमिहीनांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न, आरोग्याच्या अधिकारासाठी ते झटले.



बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित 


प्रा. खैरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होते. कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात स्वतंत्र प्रतिमा त्यांनी निर्माण केली. १० वर्षांपासून त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश घेतला. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांच्या अकाली निधनाने मूर्तिजापूर नगरीवर शोककळा पसरली आहे.  




2 मे रोजी शताब्दी खैरे हिचे निधन



शताब्दी खैरे यांचे निधन 2 मे रोजी कोरोना आजाराने झाले. त्या एलएलएम सुवर्ण पदक प्राप्त होत्या. शताब्दी खैरे, नागपूर येथील उच्च न्यायालयात वकील म्हणून मागील ४ वर्षापासून कार्यरत होत्या. सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत धडपड करीत असत. त्यांनी "बुध्दीष्ट लॉ" नावाचे एक कायद्याचे पुस्तक लिहिले आहे. शोषित समाजाची दखल घेण्यासाठी त्यांनी केंद्र सरकार कडे निवेदन केले. येवढेच नव्हे तर विविध आंदोलने करुन आदिवासीच्या शेतजमीन त्यांच्या नावावर करून देण्यास त्या यशस्वी झाल्या. सामाजिक न्याय हक्कासाठी  केंद्र सरकार व राज्य सरकार विरुद्ध कायदेशीर नोटीस बजावून  सर्वसामान्यांचे अधिकार व हक्क कायम ठेवण्यास यशस्वी ठरल्या. प्रा. मुकुंद खैरे, (समाज क्रांती आघाडी) याचे सोबत त्यांचे खांद्याला खांदा लावून, वयाच्या १०-१२ वर्षापासून शताब्दी यांनी काम केले. गत आठवड्यात कोरोनाने त्यांच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले होते. 

टिप्पण्या