Mucormycosis: black fungus: म्युकरमायकोसीस आजार आहे तरी काय? हा आजार कोणाला होतो?आदी मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवा एका क्लीक वर... डॉ.राजकुमार चव्हाण यांनी सांगितली या आजाराची वस्तुस्थिती

                                     File photo





भारतीय अलंकार 24

अकोला,दि.२१: सध्या म्युकर मायकोसीस म्हणजेच काळी बुरशी या आजाराची रुग्ण संख्या वाढत आहे. या आजाराविषयी अनेक समज गैरसमज दिसून येत आहेत. हा आजार मुख्यतः कोविड उपचारानंतर होतांना  दिसून येत आहे. याबाबत शास्त्रीय माहिती व वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक तथा आरोग्य उपसंचालक (अकोला परिमंडळ) डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याशी बातचीत केली.


             डॉ राजकुमार चव्हाण


 


प्रश्न- म्युकर मायकोसीस म्हणजेच काळी बुरशी या आजाराविषयी चर्चा सुरु आहे, याबाबत नेमके वस्तुस्थिती  काय आहे?


डॉ. चव्हाण-  कोरोनाशी युद्ध सुरू असतानाच आता मात्र नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. ते म्हणजे म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) या आजाराला. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अथवा मधुमेह नियंत्रणात नाही,अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराची लागण होताना दिसून येत आहे. मात्र प्रत्येक कोरोनाबाधिताला हा आजार होतोच असे नाही, त्यामुळे घाबरून न जाता त्याविषयी शास्त्रीय माहिती घेऊनच प्रतिबंध करावा. राज्य शासनाने त्यावर तातडीच्या उपाययोजना देखील सुरू केल्या आहेत.


 प्रश्न- या आजाराचे नेमके स्वरुप कसे आहे? त्याची लागण कशी होते?


डॉ. चव्हाण- म्युकरमायसेटीस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ती पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. मात्र जेव्हा मानवी शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते, अशा वेळेस म्युकरमायकोसीसची लागण होते. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस आणि सायनसेस वर दुष्परिणाम होतो. योग्यवेळी निदान व बुरशीप्रतिकारक उपचार केल्यास रुग्ण बरा होतो. प्रतिकारशक्ती कमी असलेली व्यक्ती, इतर दीर्घकालीन आजार मुख्यतः मधुमेह औषधोपचार किंवा स्टीरोइड्सचा गरजेपेक्षा जास्त वापर, कर्करोग पिडीत रुग्णांना ह्या आजाराची लागण होताना दिसून येते.


प्रश्न- हा आजार झालाय हे रुग्णाने कसे ओळखावे? त्याची लक्षणे कोणती दिसून येतात?


डॉ. चव्हाण- या आजाराची प्रमुख लक्षणे ही डोके दुखणे, चेहऱ्याला सूज येणे, ताप येणे, तोंडामध्ये गळू येणे व त्यामधून पू येणे, दातातून पू येणे, दात हलणे जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरड्यांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, डोके दुखणे, सायनसेसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेहऱ्याची त्वचा काळी पडणे, नाकात काळे सुके मल तयार होणे, दात काढल्यानंतर न भरणारी जखम इत्यादी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख आरोग्य तज्ज्ञांकडून त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.


प्रश्न- या आजारावरील उपचारासाठी काय पद्धती व सुविधा आपल्याकडे आहेत?


डॉ. चव्हाण- या लक्षणांनी युक्त रुग्णाची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. कोविड व स्टेरॉईडचा तपशील माहिती घेणे आवश्यक. रक्त तपासणी करणे. सी. टी स्कॅन, एन्डोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकर मायकोसीसचे निदान करणे सोपे आहे. उपचार पद्धतीत यावर  एम्पोटेरेसिन बी या इंजेक्शचा वापर केला जातो व आवश्यकता वाटल्यास शस्त्रक्रिया केली जाते. आपल्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे विशेषज्ञ उपलब्ध असून त्याठिकाणी काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात आली आहे. या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व उपचारासाठी स्वतंत्र पथक देखील राज्य शासनाच्या सुचनांनुसार नेमण्यात आले आहेत.


प्रश्न- या आजाराच्या उपचाराचा खर्च सामान्यांना परवडणारे नसल्यास त्याबाबत शासनाकडून काही मदत आहे का?


डॉ. चव्हाण- राज्य शासनाने म्युकरमायकोसीसचा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत केला असून त्याअंतर्गत ह्या योजनेशी संलग्न रुग्णालयांमध्ये व शासकीय रुग्णालयांमध्ये या आजारावर विनामूल्य उपचार होतील अशी व्यवस्था शासनाने केली आहे.


प्रश्न- हा आजार होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी?


डॉ. चव्हाण-जे रुग्ण कोविड मधून बरे झाले आहेत आणि ज्यांना मधुमेहासारख्या आजारांची पार्श्वभूमी आहे अशा रुग्णांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवावे. मधुमेही रुग्णांनी आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण वेळोवेळी तपासावे. औषधोपचार स्टेरॉईडचा वापर सांभाळून करावा. उपचारादरम्यान ऑक्सिजन वापरण्याची वेळ आल्यास ह्युमीडीफायरमध्ये स्टराईल वॉटर वापरावे.


प्रत्येक कोरोनोबाधित व्यक्तिला हा आजार होतो असे नाही. कोरोना रुग्णांनी आपल्या मौखिक आरोग्याची निगा राखणे व काळजी घेणे हे गरजेचे आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसीसचा धोका असलेल्यांनी १० ते २० दिवसांच्या आत तपासणी करून घेणे गरजेचे आहे व त्यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.


प्रश्न- या आजारावरील माहितीसाठी लोकांनी कोठे संपर्क करावा?


डॉ. चव्हाण- आजाराची लक्षणे दिसल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. नाक कान घसा तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी. आपल्या नजिकच्या शासकीय रुग्णालयात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय तसेच सर्व आरोग्य केंद्रात याबाबत माहिती व मार्गदर्शन मिळू शकते. रुग्णाची स्थिती पाहुन तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे. वेळीच निदान व योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्ण बरा होतो.

टिप्पण्या