Maharashtra: crime: Akola: पुरोगामी महाराष्ट्रात संतापजनक प्रकार: एक लाख रुपये दंड आणि थुंकी चाटायचा जातपंचायतने दिला आदेश; बच्चू कडू आणि नीलम गोरे यांनी घेतली दखल

progressive Maharashtra: Jat Panchayat orders fine of Rs one lakh and spit licking; Bachchu Kadu and Neelam Gore took notice(All photo:BAnews24)




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव येथील जातपंचायतीने एका तक्रारीचा निपटारा करीत असताना एक लाख रुपये दंड आणि थुंक चाटायचा आदेश दिला असल्याचा गंभीर आरोप जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील एका महिलेनी केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात असून, पुरोगामी महाराष्ट्रात हे काय चाललंय, असा संतप्त सवाल जनमाणसात उपस्थित झाला आहे. शिवसेना नेत्या नीलम गोरे व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणी दखल घेवून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. 




वडगाव सातशे लोकांची नागरी वस्ती असलेले गाव. २०१५ मध्ये घटस्फोट घेतलेल्या गावातील एका महिलेने येथील नाथजोगी समाजातील काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहे. ९ एप्रिल २०२१ ला महिलेची पहिल्या पती सोबत झालेली फारकती आणि दुसरं लग्न अमान्य करत तिला 1 लाख रुपये दंड आणि थुंकी चाटण्याची शिक्षा जातपंचायतीने सुनावली असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. 




पिंजर पोलीसानी गावकऱ्यांचे जवाब नोंदविलेे


या प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पिंजर पोलीस गावकऱ्यांचे जवाब नोंदवित आहेत.मात्र आतापर्यंतच्या तपासात घटनेतील सत्य बाहेर आले नसल्याचे पोलीस अधिकारी मोनिका राऊत यांनी सांगितले आहे.


या प्रकरणी शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी गृहमंत्री यांना दोषींवर कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. मात्र, गावकरी आणि नातेवाईकांनी असला कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले.




गावाची बदनामी होत आहे-गावकरी

महिलेने केलेला आरोप म्हणजे गावाची बदनामी आणि ब्लॅक मेल करण्याचा प्रकार असल्याचे गावकऱ्यांनी म्हंटल आहे. तर सत्यता पडताळून कोणताही निर्णय  घेण्याची विनंती माजी सरपंच गणेश बाबर, तंटामुक्ती अध्यक्ष पंजाबराव जाधव, नातेवाईक सुंदराबाई सेगर यांनी केली आहे.




अकोल्याचे पालकमंत्री आणि संबंधीत विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा याप्रकरणात पोलिसांना गुन्हे दाखल करून  दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.




पुरोगामी महाराष्ट्र पुरता हादरला

या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्र पुरता हादरला आहे. जात पंचायत सारखे प्रकार अद्यापही पुरोगामी महाराष्ट्रात सुरू आहेत का, घडलेल्या प्रकारचा कोणताही पुरावा आरोप करणाऱ्या महिलेकडे आहे का, तक्रार देण्यात एवढा उशीर का करण्यात आला. संपूर्ण गाव एक होवून या महिलेला खोट तर पाडत नाही ना, पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतचे महत्त्व कायम आहे का,असे अनेक प्रश्न या घटने निमित्त उपस्थित होत आहे. अद्याप या घटनेतील तथ्य समोर यायचे आहे. महिलेवर जर अन्याय झाला असल्यास ही बाब निश्चितच समाजासाठी लाजिरवाणी असणार आहे.

टिप्पण्या