Crime news: Buldana: Shivsena: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा झाला प्रयत्न; अज्ञात आरोपींचा शोध सुरू




बुलडाणा : जहाल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या चार चाकी (इनोवा कार) वाहनावर रात्री काही अज्ञात लोकांनी हल्ला करीत पेट्रोल टाकून वाहन जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना आज बुधवारी पहाटे उघडकीस आली. या घटने मागे राजकीय वादाची की अंतर्गत कलहाची किनार आहे, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही.





शिवसेना आमदार संजय गायकवाड हे मंगळवारी रात्री मुंबईहून बुलढाण्याला परतले होते. यानंतर रात्री तीन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी येऊन पेट्रोल टाकी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी आग लावून ईनोवा गाडी जाळली. या घटनेची माहिती मिळताच संजय गायकवाड यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असून, त्यासोबतच गृहमंत्री वळसे पाटील यांच्याशी सुद्धा या विषयावर चर्चा केली. हे प्रकरण पोलिसांनी गंभीरतेने घेतले असून जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हे अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



ज्यावेळी इनोवा गाडीला पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी काही काळाकरिता विद्युत पुरवठा बंद करण्यात आला असल्याची चर्चासुद्धा यावेळी सुरू होती.



आमदार संजय गायकवाड यांच्या इनोवा वाहनाला जेव्हा आग लावण्यात आली त्यावेळी वाहनांच्या मागे पुढे चार ते पाच मोठी चार चाकी वाहने उभी होती. जर  आगीने विक्राळ रूप धारण केले असते तर तेथे मोठ्या प्रमाणात सर्व गाड्यांचा स्फोट होऊन शेजारील नागरिकांनाच तसेच आ. गायकवाड व त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा हानी पोहोचली असती,अशी देखील चर्चा यावेळी सुरू होती. 


टिप्पण्या