Akola police: पिंजर पोलिसांच्या निषेधार्थ विधवा महिलेचे 25 मे पासून उपोषण; कोरोनाच्या नावाखाली आरोपीला अडीच महिन्यांपासून अभय !




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोना आणि लॉकडाऊन या दोन गोष्टींचा फायदा घेत पिंजर पोलिसांनी एका आरोपीला अडीच महिन्यांपासून अभय पुरवल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विधवा महिलेने केलेल्या पाठपुराव्याला पोलिसांनी केराची टोपली दाखवल्यामुळे येत्या 25 मे पासून ही महिला आपल्या मुलाबाळांसह पिंजर पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.



या प्रकरणाची माहिती अशी की, दोनद येथील केशवराव कावरे यांचा १७ मार्च २०२१ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. याप्रकरणी पिंजर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून या प्रकरणातील मुख्य आरोपी वाहन चालकाला पोलिसांनी जाणीवपूर्वक अटक केली नाही. मृतकाची पत्नी मंजुळा केशव कावरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापुर यांच्याकडे याबाबत तक्रार केली, मात्र या ठिकाणी सुद्धा सदर महिलेला यश आले नाही. अडीच महिन्यांपासून आरोपीला पाठीशी घालणारे पिंजर  ठाणेदार महादेव पडघन व या प्रकरणाचे तपास अधिकारी सोळंके यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी मंजुळा कावरे यांनी पालकमंत्री बच्चू कडू व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांच्याकडे केली आहे. 



अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून अधिकारी मनमानी पद्धतीने वागत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकाची अधिकाऱ्यांवर पकड सैल झाल्यामुळे ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अपघातात घरातला कर्ता पुरुष गमावल्यानंतर पोलीस ठाण्याच्या कागदपत्राच्या जुळवाजुळवी साठी एका विधवा महिलेवर उपोषणाला बसण्याची वेळ आणणाऱ्या पिंजरच्या ठाणेदार विरुद्ध कारवाई होईल की नाही ? असा प्रश्न ग्रामीण भागातून उपस्थित झाला आहे. या महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या सोबत सुद्धा संपर्क साधला असून, आमरण उपोषणाची माहिती त्यांना दिली. 

टिप्पण्या