World Malaria Day: आज जागतिक हिवताप दिन :अकोला विभाग 'हिवताप मुक्त' करण्याचा संकल्प! 2022 पर्यंत हिवताप दूरीकरणाचे लक्ष्य…


Today is World Malaria Day: Resolution to make Akola Division 'Malaria Free'! Malaria eradication target by 2022 …

                                     File image


Reaching the Zero Malaria Target



ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: केंद्र सरकारने सन 2030 पर्यंत तर महाराष्ट्र शासनाने सन 2025 पर्यंत राज्य हिवताप मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुषंगाने अकोला विभागातील पाचही जिल्हे सन 2022 पर्यंत 'हिवताप मुक्त' करण्याचा संकल्प करण्यात आला असून, विभागाची हिवताप दूरीकरणाकडे यशस्वी वाटचाल सुरू असल्याची माहिती अकोला हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. कमलेश आर. भंडारी यांनी जागतिक हिवताप दिनानिमित्त दिली.  



अकोला विभागातील पाचही जिल्हे 'हिवताप मुक्त' करण्याच्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल

                                     file image

गेल्या अनेक वर्षांपासून अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या अकोला विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये थैमान घालणा-या हिवतापाला आळा घालण्यात आरोग्य विभागाला उत्तम यश प्राप्त झाले आहे, असे सांगून डॉ. भंडारी म्हणाले, की हिवताप नियंत्रणासाठी युद्धपातळीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याने आगामी सन 2022 पर्यंत अकोला विभागातील पाचही जिल्हे 'हिवताप मुक्त' करण्याच्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. सन 2016 पासून या पाच जिल्ह्यांमध्ये हिवताप रुग्ण संख्या मध्ये लक्षणीय घट झाली असून, हिवतापाचा कोठेही उद्रेक किंवा हिवतापामुळे एकही मृत्यू झालेला नाही. यासाठी नागरिकांचा सहभाग तितकाच महत्वाचा ठरला आहे. रक्त नमुने तपासणी करून हिवतापाचा रूग्ण शोधला जातो. विभागात सन 2016 ते 2019 या कालावधीमध्ये दरवर्षी 20 लाखांवर रक्त नमुने संकलित करण्यात आले. 2020 मध्ये कोरोनाचा कार्यक्रमावर परिणाम होऊन हे प्रमाण 12 लाखांवर आले. मार्च 2021 अखेरपर्यंत विभागात 3 लाखांवर रक्त नमुने संकलित करण्यात आले.



या आजाराची लक्षणे काय आहेत?


हिवताप हा 'अनाफेलिस' नावाच्या डासामुळे उद्भवणारे आजार आहे. यामध्ये थंडी वाजून ताप येणे, सततचा ताप, घाम येऊन अंग गार पडते तसेच थकवा, तीव्र डोकेदुखी, मळमळ व उलट्या अशी लक्षणे आढळतात. हिवताप संबंधित तपासणी तसेच समूळ उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तसेच सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. रक्त तपासणी मध्ये हिवतापाचे जंतू आढळून आल्यास जंतू प्रकारानुसार रुग्णावर समूळ उपचार करण्यात येतो. 'प्लास्मोडियम विवेक्स' हिवताप प्रकारात दूषित रुग्णाला 14 दिवसांचा समूळ उपचार आणि 'प्लास्मोडियम फाल्सीपेरम' दूषित रूग्णाला तीन दिवसांचा 'एसीटी'चा समूळ उपचार करण्यात येतो.  





आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा - डॉ. कमलेश भंडारी

यावर्षी जागतिक हिवताप दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने, '' रिचींग दि झिरो मलेरिया टार्गेट '' अर्थात '' झिरो हिवताप रूग्ण उद्दिष्टाकडे वाटचाल '' असे घोषवाक्य दिले असून, अकोला विभागात हिवताप रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी आणि विभाग हिवताप मुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. 'अॅनाफेलिस' या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये होते, असे सांगून डॉ. कमलेश भंडारी म्हणाले, की हिवतापाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साचलेले पाणी वाहते करावे, पाणी साचलेले खड्डे बुझवावे, पाण्याच्या भांड्यांना घट्ट झाकण बसवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, साचलेल्या पाण्यात किंवा डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडावेत, निरूपयोगी साहित्य नष्ट करावे, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, कुंड्यांमध्ये आवश्यक तेवढेच पाणी टाकावे, घराच्या खिडक्यांना जाळी बसवावी, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.  




हिवताप रूग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने घट राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश 

   

मागील 10 वर्षाचा काळ पाहता अकोला जिल्ह्यामध्ये हिवताप रूग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने घट राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. सन 2011 मध्ये जिल्ह्यात तब्बल 240 रुग्ण आढळून आले होते. सन 2012 मध्ये 218 रुग्ण आढळून आले होते. सन 2013 मध्ये रूग्णसंख्या 149 पर्यंत कमी झाली. सन 2014 मध्ये पुन्हा रूग्णसंख्या वाढून 196 झाली. सन 2015 मध्ये त्यात थोडीशी घट होऊन जिल्ह्यात 179 रुग्ण आढळून आले होते. सन 2016 मध्ये रूग्णांमध्ये लक्षणीय घट होऊन ती अगदी 92 पर्यंत पोहोचली. सन 2017 मध्ये रूग्णसंख्या अवघ्या 53 रुग्णांवर आली. सन 2018 मध्येही हिवतापावर नियंत्रण मिळविण्यात आलेल्या यशाच्या परिणामी जिल्ह्यात केवळ 36 रुग्ण आढळून आले. सन 2019 मध्येही जिल्हा हिवताप विभागाने जिल्ह्यातील सुमारे 28 संवेदनशील गावांमध्ये राबविलेल्या विविध उपाय योजनांच्या परिणामी यावर्षी जिल्ह्यात हिवतापाचे केवळ 11 रुग्ण आढळून आले, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदित्य महानकर यांनी दिली.  


टिप्पण्या