WEEKENDVIBES: खेळखंडोबा! जनता भाजी बाजार उद्यापासून भाटे क्लब व बाजोरिया मैदानात भरणार…पण...

           WEEKENDVIBES

  जनता बाजार स्थानांतरण निमित्ताने...



ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: भाटे क्लब व बाजोरिया मैदानावर उद्या सोमवार पासून अकोल्याचा  मुख्य भाजी बाजार असलेला जनता बाजार मनपा  प्रशासनाच्या निर्णयामुळे स्थानांतरित करण्यात येत आहे. याकरिता मनपाच्या वतीने शनिवार पासून मैदानाची साफसफाई करण्यास सुरुवात केली. आज रविवारी हे काम पूर्णत्वास आले. अकोला शहरात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जनता बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी मनपा आयुक्त  नीमा अरोरा यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, या एका निर्णयामुळे अनेक प्रश्न अकोलेकरांच्या मनात निर्माण झाले आहेत.



मैदानावरील आठवणी

अकोला नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतरही भाटे क्लब आणि मुंगीलाल बाजोरिया क्रीडांगण या जागा खेळ मैदानासाठी आरक्षित होत्या. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे खेळ आणि खेळाडूंचा विकास हा मुख्य उद्देश बाद होवून खेळखंडोबा झाला. पुढे भाटे क्लब खेळ मैदानाचा वापर व्यवसायिक दृष्टीने होवू लागला. व्यवसायिक स्वयंरोजगार प्रदर्शन, जत्रा भरू लागल्या. तर बाजोरिया मैदान जागेच्या वादाच्या अडकले होते. या मैदानांवर पूर्वी फुटबॉल, हॉकी खेळाचे सामने अन कुस्तीच्या दंगली व्हायच्या. अनेक उच्चस्तर स्पर्धा या मैदानात पार पडल्या. जुन्यापिढीतील नागरिक आजही या मैदानावरील आपल्या आठवणीत रमतात.


दरम्यान, जनता भाजी बाजारच्या जागेवर आधुनिक वाणिज्य संकुल उभारले जाणार आहे. शहराच्या मध्यभागातील जनता भाजी बाजार व जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुलाचे आणि बाजोरिया खेळ मैदानावर प्रेक्षागृह असे आरक्षण केल्या गेले. मनपाचे तत्कालीन आयुक्त   संजय कापडणीस यांनी क्रीडांगणाची जागा वगळता इतर दोन जागांच्या हस्तांतरणाचे शुल्क २६ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहे. शहरात मुळातच क्रीडांगणाची कमतरता असताना क्रीडांगणाची आरक्षित जागा व्यावसायिक वापरासाठी कशी होवू शकते, असा सवाल क्रीडाप्रेमी नागरिकांनी उपस्थित केला आहे. जुने शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर देखील कोरोना काळापासून भाजी बाजार भरत आहे. हे बाजार कायम स्वरूपाचे आहे की तात्पुरती व्यवस्था आहे, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.



लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे

जनता भाजी बाजार स्थानांतरण प्रकरणी जिल्हा प्रशासन व मनपाची एकूणच  भूमिका संशयास्पद ठरत आहे. शहर विकासाच्या दृष्टीने आणि सामान्य नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना रखडलेल्या असताना वाणिज्य संकुलाच्या हालचाली कोरोना संकट काळातही एवढ्या गतिमान कश्या झाल्या आहेत, याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अकोल्यात केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणारे दहा लोक प्रतिनिधी आहेत, मात्र,त्यांना सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची जाणीवच नाही. हे स्थानांतरण आणि हस्तांतरण प्रकरण लोकप्रतिनिधीनी जातीने लक्ष देवून शासन दरबारी मांडावे, एवढी माफक अपेक्षा अकोलेकरांनी व्यक्त केली आहे.




फळ व भाजी विक्रेत्यांना विश्वासात घेतले नाही

जनता बाजारात मागील अनेक वर्षांपासून भाजीपाला, फळ विक्रीचा घाऊक व किरकोळ विक्री करणारे  व्यावसायिक यांनी पर्यायी जागा देण्याची मागणी लावून धरली आहे. व्यावसायिकांच्या मागणीला मनपा प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. मध्यंतरी प्रशासनाने २६ मार्च रोजी जाहीर सूचनेद्वारा व्यावसायिकांना हरकती व सूचना सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याआधी फुले मार्केट मध्ये स्थलांतरित झालेले आणि जनता बाजार येथे थांबलेले व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांनी मनपा विरुद्ध दंड थोपटले होते. प्रशासन ऐकुन घेत नसल्यामुळे या व्यवसायिकांनी प्रसार माध्यमांकडे धाव घेतली होती. पत्रकार परिषद घेवून मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा पाढा या व्यावसायिकांनी वाचला होता. मात्र,मनपा विरुद्ध बंड करणारे हे विक्रेते आपसातच वाद घालू लागले. याचे पडसाद आता दिसू लागले. यावेळी देखील व्यावसायिकाना विश्वासात न घेता बाजार स्थानांतरण करण्यात येत असल्याचे नाव न सांगण्याचा अटीवर व्यवसायिकांनी सांगितले.



फळ भाजी आणि फेरी विक्रेते


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता बाजाराचे स्थानांतरण होत आहे. मात्र,या जागेत फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते आणि छोट्या,मोठ्या वस्तू विकणारे फेरीवाले आपला व्यवसाय करणार आहेत. यामुळे साहजिकच या ठिकाणी खरेदीसाठी नागरिक येतील. गर्दी होवून नियंत्रण करणे शक्य होणार नाही. यामुळे कोरोना थोपविण्यासाठी हा पर्याय योग्य आहे का,असा सवाल सुज्ञ नागरिकांना पडला आहे.


या जागा रिक्त करुन महापालिका द्वारे मोठे कॉम्प्लेक्स बांधण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, ही महत्वकांक्षी योजना खरच महापालिकेची आहे की, या मागील सूत्रधार कुणी दुसराच आहे,असा सवालही नागरिकांच्या चर्चेत उपस्थित होत आहे.



महापालिकेचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण हे देखील येथील व्यापाऱ्यांच्या बाजूने मंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत असूनही त्यांच्या शब्दाला मान मिळाला नाही का,असा प्रश्न सुद्धा सामान्य अकोलेकरांना पडला आहे.



रस्त्यावरील फळ विक्रेत्यांना स्थलांतरित केल्या नंतर खरच  अकोलेकर मोकळा श्वास घेतील का ? की यांच्या जागी दुसरे अतिक्रमण उभे राहिल ?पुन्हा येथे अतिक्रमण उभे राहिले तर महापालिकेच अतिक्रमण विभाग हे हटविण्यासाठी सक्षम आहे का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होत आहे.




कोरोनाचा वाढता प्रभाव अन बाजाराचे स्थानांतरण


देशासह अकोला महानगरपालिका क्षेत्रातसुध्‍दा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्‍यामुळे शहरात कोरोना रुग्‍णांच्‍या वाढत्‍या संख्‍येवर जास्‍त प्रभावीपणे नियंत्रण आणण्‍याच्‍या  दृष्‍टीने मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील जनता भाजी बाजार येथे 18 एप्रील सकाळी 10 वाजेच्‍या नंतर पुढील आदेशापर्यंत कोणत्‍याही प्रकारची भाजीपाला व फळ विक्री अथवा हर्रासीवर पुर्णपणे बंदी घातली आहे.  




असा आहे आदेश


*जनता भाजी बाजार येथे सकाळी 7 ते 10 वाजेच्‍या दरम्‍यान फक्‍त फळांची हर्रासीला सोशल डिस्‍टसींग नियमाचे पालन करून व चेह-यावर मास्‍क आणि सेनीटायझरचे वापर करून मुभा देण्‍यात आली आहे. 


* भाजीपाला विक्री, हर्रासी करण्याकरिता महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा राहील. 


* महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्याकरिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणुन जनता भाजी बाजाराचा यापूढे हरार्सीकरीता वापर करता येणार नाही.  


*जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेहअली चौक येथे किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यवसायीक यांची भाटे क्लब प्रांगण येथे व्यवसाय करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 


* जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेहअली चौक येथे किरकोळ फळ विक्री करणारे व्यवसायीक यांची मुंगीलाल बाजोरिया प्रांगण येथे व्यवसाय करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 


* किरकोळ भाजीपाला / फळ विक्री करीता व्यवसायीक यांना परवानगी दिलेल्या जागेत कोरोना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करावा. दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडुन कोरोना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे गृहित धरुन कठोर कारवाई करण्यात येईल. 


* जनता भाजी बाजार येथे किराणा व जिवनावश्यक वस्तुची विक्रीचे व्यवसायास विहित कालावधी करिता व्यवसाय करण्याची मुभा राहील. 



सदर आदेशाची अंमलबजावणी न करणा-या व्‍यावसायिकांविरुध्‍द महाराष्‍ट्र महानगरपालिका अधिनियम व साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 2005 अन्‍वये कारवाई करण्‍यात येणार तरी भाजी व फळ विक्री व हर्रासी करणा-या व्‍यावसायिकांनी याची नोंद घेउन महानगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे.


अकोला महानगरात कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सोशल डिस्‍टसींग नियमाचे काटेकोरपणे पालन करणे तसेच चेह-यावर मास्‍क आणि सॅनीटायरझरचे वापर करून तसेच प्रशासनाव्‍दारे वेळोवेळी दिलेल्‍या सुचनांचे पालन करून कोरोनाला आळा घालण्‍यासाठी सहकार्य करण्‍याचे मनपा प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्‍यात आले आहे.








टिप्पण्या