Oxygen shortage: ऑक्सिजन तुटवडा: ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अकोल्यात; पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र व ओझोनायझेशन प्लांटची केली पाहणी


Oxygen shortage: Minister of State for Energy Prajakta Tanpure in Akola;  Inspection of Paras Thermal Power Station and Ozonization Plant



*राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने  ऑक्सिजन उपलब्धतेची पाहणी करण्यासाठी हा दौरा- ना. तनपुरे




भारतीय अलंकार news24

अकोला,दि.२५: महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथे आज नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी भेट देऊन पाहणी केली.  औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन उपलब्धता याबाबत त्यांनी ही पाहणी केली. त्यांचे समवेत पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल राहाटे, उप मुख्य अभियंता दाम्पोदर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी तसेच महाजेनकोच्या अन्य अधिकारी यांचा समावेश होता.





औष्णिक  विद्युत निर्मिती प्रकल्पातील ओझोन वायू निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती होत असते. त्या ऑक्सिजनची शुद्धता पातळी ही १०० टक्क्यांपर्यंत आणून तो वैद्यकीय वापर करण्या इतपत उपयुक्त बनवणे व आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री उभारून हा ऑक्सिजन सिलेंडर मध्ये भरणे, याबाबतच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ना. तनपुरे आज येथे आले होते. यावेळी त्यांनी वीज निर्मिती केंद्राची व ओझोनायझेशन प्लान्टची पाहणी केली.  यासंदर्भात संभाव्य तांत्रिक अडीअडचणी व ऑक्सिजन उपलब्धतेच्या शक्यता बाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.




सध्याच्या परिस्थितीत राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे, त्या पार्श्वभुमिवर पूरक तांत्रिक व्यवस्था उपलद्भ करुन ऑक्सिजन उपलब्धतेची पाहणी करण्यासाठी आपला हा दौरा आहे, असेही ना. तनपुरे यांनी यावेळी स्पष्ट केले.




जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा व सादरीकरण

त्यानंतर ना. तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन याबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. कुसुमाकर घोरपडे, बाळापुरचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.




यावेळी पारस येथील प्रकल्पात ऑक्सिजन निर्मिती करतांना व त्याची उपलब्धता करतांना वैद्यकीय निकषांची पूर्तता झाली पाहिजे, असे ना. तनपुरे यांनी सांगितले. तसेच पर्यायी व आपत्तीच्या प्रसंगी उपयुक्त ठरणारी ही व्यवस्था हवी. शिवाय या ठिकाणी संभाव्य आपत्ती वा तुटवडा गृहीत धरुन ऑक्सिजन साठ्याची सुविधाही उपलब्ध असणे हे सध्याच्या स्थितीत आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ऑक्सिजन निर्मिती व शुद्धीकरण तसेच तयार झालेल्या ऑक्सिजन सिलिंडर मध्ये भरणे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सादरीकरण करुन माहिती दिली.

टिप्पण्या