IPL 2021:वैदर्भीय दर्शन नळकांडे सलग तिसऱ्यांदा किंग्स XI पंजाब संघात; प्लेइंग इलेव्हन मध्ये यंदा संधी मिळण्याची शक्यता




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडेची ९ एप्रिल २०२१ पासून सुरु होणाऱ्या आय.पी.एल स्पर्धेकरिता किंग्स इलेव्हन पंजाब संघात निवड झाली असून, किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक तथा भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात वी.मी.मी.आयचे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानाबर सुरु झालेल्या सरावाकरिता दर्शन मुंबईला रवाना झाला आहे. दर्शन हा अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा खेळाडू आहे.



प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी!

दर्शनची यावर्षी होणाऱ्या आय.पी.एल. स्पर्धेकरिता (२०२१) सलग तिसऱ्यांदा किंग्स इलेव्हन पंजाब संघात निवड झाली असून यावर्षी आय.पी.एल. स्पर्धेत दर्शनला प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा विदर्भातील क्रिकेटप्रेमींना आहे. 



दर्शनचा खेळ प्रवास

वयाच्या ८ वर्षापासून अकोला क्रिकेट कलब येथे खेळास सुरवात करणाऱ्या दर्शनने यापूर्वी वयोगट १४, १६. १९. २३ म्पर्धेत विदर्भ तथा मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९ वर्षीय भारतीय संघाकडून इंग्लंड येथे कसोटी सामना तर आशिया कप करिता मलेशिया येथे १९ वर्षीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर तीन वर्षापासून रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.



उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू करिता प्रेरणादायी

"गेल्या ७ - ८ वर्षापासून क्लबच्या खेळाडूंनी अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले असून, ही बाब अकोला क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू करिता प्रेरणादायी आहे. आत्मविश्वासात भर टाकणारी असून जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडू उरात मोठे स्वप्न घेऊन आत्मविश्वासाने मैदानात उतरतील. भेदक गोलंदाजी व आक्रमक फलंदाजी करणारा दर्शन नळकांडे याचा खेळ दिवसेंदिवस बहरत असून आत्मविश्वास व परिपक्वता दर्शनच्या खेळात दिसून येते. दर्शनची निवड ही विदर्भ, जिल्हा व क्लब करीता अभिमानास्पद बाब आहे."


-भरत डिक्कर

अकोला क्रिकेट क्लब कर्णधार 

तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक 

टिप्पण्या