Health department: आरोग्य विभाग: तुटपुंज्या मानधनात जिल्ह्यातील 'आशा' झाल्या 'कोट्यधीश'!

         भारतीय अलंकार न्यूज 24

विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात पुढाकार




 नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: शासनाकडून मिळणाऱ्या अल्प मानधनावर प्रामाणिकपणे ग्रामीण जनतेची आरोग्य सेवा करून जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका कोट्यधीश झाल्या आहेत! कोणतेही ठराविक वेतन नसताना देखील, या कोरोना संकट काळात जीवाची पर्वा न  करता आशा स्वयंसेविकांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत जिल्ह्यातील  जवळपास एक हजार आशा स्वयंसेविका यांनी ग्रामीण भागात दिलेल्या विशेष आरोग्यसेवांच्या मोबदल्यात कोट्यधीश झाल्या आहेत. या कालावधीत त्यांनी सर्वांनी मिळून तब्बल 4 कोटी 81 लाख 44 हजार 22 रूपयांची बक्कळ कमाई केली आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. 




आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्यविषयक कामांच्या मोबदल्यात मानधन दिले जाते. खरे तर हे मानधन तसे फारच तुटपुंजे असते. परंतु त्यातही प्रामाणिक सेवा करून आशा स्वयंसेविकानी ही कमाई केली आहे.



आशा स्वयंसेविका करीत असलेले कार्य

हिवतापावरील समूळ उपचार, दप्तर हाताळणी, जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर मातांची पूर्वतपासणी तसेच त्यांना संस्थात्मक प्रसूती साठी प्रवृत्त करण्याच्या कामात आशा स्वयंसेविकांना बाजी मारली आहे. त्यामुळे माता आणि बालकांच्या मृत्यूवर नियंत्रण मिळविण्यात आणि शासकीय आरोग्य संस्थांमधून प्रसूतीचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे. मलेरिया रूग्णांचे रक्तनमुने गोळा करणे, क्षयरोग्याचा शोध घेऊन त्यांना डॉट‍्सचा संपूर्ण उपचार पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा, कुष्ठरोग्यांचा शोध घेऊन त्यांनाही शासकीय संस्थांमध्ये उपचारासाठी प्रवृत्त करण्यासाठी नियमित पाठपुरावा करणे, साथरोग नियंत्रण, ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या पाणी पुरवठा समितीच्या सभा आयोजित करणे, कमी वजनाच्या कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांना संस्थात्मक उपचारासाठी नेणे, त्यासाठी त्यांच्या पालकांना प्रवृत्त करणे, आशांच्या मासिक सभा घेणे, बालकांसाठी लसीकरण सत्र राबविणे, त्यासाठी लसीकरणाच्या सभा घेणे, सिकलसेल रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचारासाठी पाठपुरावा करणे, वयात आलेल्या युवतींसाठी सभा घेणे, युवती आणि महिलांना सॅनीटरी नॅपकीन पुरविणे, संतती प्रतिबंधक साधनांचे वितरण यासोबतच आता कोरोना काळातील कामासाठी त्यांना विशेष अनुदान देण्यात आले आहे. त्यासोबतच माहेर घर योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना मध्ये सहभागासाठी आशा स्वयं सेविकांना मोबदला देण्यात येत आहे.



पंचवीस रुपये ते तीन हजार मानधन

आशा सेविकांना विविध आरोग्य विषयक कामासाठी किमान 25 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत मोबदला देण्यात येतो. आरोग्य विभागात कार्यरत नियमित अधिकारी व कर्मचारी यांना आशांद्वारे केल्या जात असलेल्या कार्यामुळे बराच मोठा हातभार लागतो. जिल्ह्यात सध्या एक हजारावर आशा स्वयंसेविका मानधन तत्वावर कार्यरत असून, ग्रामीण भागात घरोघरी फिरून त्या आपले कार्य करीत आहेत. त्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे असले तरी एक प्रतिष्ठेची नोकरी करत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळते. मानधनात वाढ करावी आणि शासकीय सेवेत सामावून घ्यावे यासह आशांच्या अनेक मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. परंतु तरीही कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी आशा स्वयंसेविका तत्पर असल्याचे दिसून येते.  



4 कोटीची कमाई करून आदर्श

निर्माण केला - डॉ. सुरेश आसोले

जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी गेल्या वर्षभराच्या काळात विविध आरोग्यसेवांच्या माध्यमातून 4 कोटी 81 लाख 44 हजार 22 रूपयांची कमाई करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. नव्यानेच मानधनाच्या श्रेणीत आणण्यात आलेल्या दप्तर हाताळणीच्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या कमाईला बराच मोठा हातभार लागला आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये आशा स्वयंसेविका यांनी दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी आहे. कोरोनाच्या जीवघेण्या कालावधीतही जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आरोग्य सेवा पुरविण्यात अग्रेसर असल्याचे यावरून दिसून येते. या कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा नुकताच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सत्कार आणि गौरव करण्यात आला, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.  


टिप्पण्या