- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संग्रहित चित्र
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: राज्य टास्क फोर्स कडून प्राप्त कोविड १९ च्या रुग्णांवर करावयाच्या उपचार पद्धतींबाबत सुधारित निर्देशांबाबत आज जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांच्या डॉक्टर्सना अद्यावत प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील कोविड रुग्णांना वाजवी दरात व कुठलाही त्रास न होता उपचार सेवा व सुविधा उपलब्ध करुन द्यावी,असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित डॉक्टर्सना केले.
नियोजन भवनात आयोजित या प्रशिक्षणास मनपा आयुक्त निमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉ.आरती कुलवाल, डॉ. घोरपडे, डॉ. श्याम शिरसाम, उप जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे व तज्ज्ञ साधन व्यक्ती डॉ. मुकुंद अष्टपुत्रे हे उपस्थित होते.
या प्रशिक्षणात डॉ. अष्टपुत्रे यांनी उपस्थितांना कोविड १९ च्या उपचार पद्धतीच्या नियमावलीत नव्याने झालेल्या सुधारणा बाबत माहिती दिली.
त्यात रुग्णांचे संसर्गाच्या पातळी नुसार वर्गीकरण करणे, त्यानंतर वेगवेगळ्या वर्गीकरण नुसार उपचार पद्धतीचा अवलंब करणे, रॅपिड वा आरटीपीसीआर या चाचण्यांमधून रुग्णाला कोविड संसर्ग झाल्याचे निश्चित झाल्याशिवाय उपचार सुरु करु नयेत. काही लोक केवळ सिटीस्कॅन करुन एचआरसीटी अहवाल नुसार थेट कोविडचे उपचार सुरु करतात, असे करु नये. निदानानंतरचे दहा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच कालावधीत उपचारांची दिशा पहिल्या तीन दिवसात निश्चित करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी योग्य पद्धतीने रेमडेसिविर चा वापर, आवश्यकतेनुसार स्टेरॉइड्स वापर तसेच अधिक जटिल अवस्थेत ऑक्सिजनचा वापर याबाबत माहिती दिली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपचारांबाबत निरीक्षणे नोंदविली.
जिल्हाधिकारी यांचे आवाहन
आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी पापळकर यांनी सर्व रुग्णालय संचालकांना आवाहन केले की, सर्व रुग्णालयांनी ऑक्सिजन वापराचे ऑडिट करून घ्यावे. तसेच फायर ऑडीट व फायर सेफ्टीचे सर्व निकष तातडीने पूर्ण करावे. हॉस्पिटल विद्युत यंत्रणा सदोष नसल्याची खातरजमा करावी. थेट एचआरसीटी करुन रुग्णांवर कोविड उपचार सुरु करणे चुकीचे असून याबाबत रेडिओलॉजिस्ट त्यांच्याकडे केलेल्या एचआरसीटी चाचण्यांबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी व पुरवठ्याचे नियमन करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाने आपल्याकडील ऑक्सिजनची मागणी दररोज नोंदवावी. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा