auto rickshaw stands: Akola: शहरातील ऑटोरिक्षा स्टॅण्डची समस्या लवकरच सुटणार; 20 जागांची निश्चिती

Akola: The problem of auto rickshaw stands in the city will be solved soon;  confirmation of 20 spots




भारतीय अलंकार 24

अकोला: टॉवर चौक ते पोस्ट ऑफिस चौक पर्यंतची उड्डाणपुला खालील संपूर्ण जागा तसेच शहरातील प्रमुख चौक अश्या 20 जागा ऑटोरिक्षा स्टँड साठी निश्चित करण्यात आली आहे.  महानगर पालिकेच्या येत्या आमसभेेेत या जागेचा प्रस्ताव मांडला जाणार असून, मंजुरी मिळाल्या नंतर उड्णपुलाचे बांधकाम संपताच आवश्यक सुविधांसह याठिकाणी ऑटोरिक्षा स्टॅण्ड उभारण्यात येणार आहेत. एकूणच प्रचंड संख्येने धावणाऱ्या ऑटोरिक्षांना थांबण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहर वाहतुकीची समस्या काही प्रमाणात सुटणार आहे,अशी आशा अकोलेकरांना आहे.




पश्चिम विदर्भातील सर्वात जास्त ऑटोरिक्षा असणारे शहर म्हणून अकोला प्रसिध्द आहे. नेमकी हीच ओळख अकोल्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. लोकसंख्या व गरजेच्या कितीतरी जास्त प्रमाणात ऑटोरिक्षा  शहरात धावत असतात. बेरोजगारी हे एक प्रमुख कारण असले तरी इतरही अनेक कारणे यामागे आहेत, आज अकोला शहरात 6500 ते 7000 ऑटो धावतात. परंतू, एवढ्या मोठ्या संख्येने धावत असलेल्या ऑटोसाठी ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होत्या; त्या दुर्दवाने अजूनही दिलेल्या नाहीत. अशोक वाटिका चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावर  एकूण ऑटो पैकी 60 टक्के ऑटो धावतात. नेमके याच मार्गावर मागील दीड वर्षा पासून उड्डाण पुलाची निर्मिती सुरू आहे. चांगले प्रशस्त रोड व सर्व सुविधा युक्त ऑटो स्टँडची गरज वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असते. परंतू यासाठी सुविधा अकोल्यात नसल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 




अकोला महानगरपालिका अस्तित्वात येऊन आज 20 वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतू, अकोला शहरात अजूनही एवढ्या प्रचंड संख्येने धावणाऱ्या ऑटोरिक्षा साठी एकही अधिकृत स्टँड नाही. प्रशस्त रोड नाहीत. अधिकृत ऑटो स्टँडच नसल्याने व सध्या पोस्ट ऑफिस चौक ते टॉवर चौक दरम्यान उड्डाणपुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असल्याने रोडवर दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी खूप कमी रोड बाकी राहिला आहे. त्यातच बस स्टँडच्या आजूबाजूला शहराचे चारही बाजूला प्रवाशांना घेऊन जाणारे ऑटो उभे ठेवावे लागतात. त्यांचे साठी अधिकृत कोणतेही ऑटो स्टँड नसल्याने ते कुठेही उभे राहतात. रोड छोटा झाल्याने वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांना या ऑटोरिक्षा चालकांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. परंतू, अधिकृत ऑटो स्टँड किंवा उड्डाणपुलामुळे अत्यल्प जागा राहिल्याने आज मदनलाल धिंग्रा चौकात वाहतूक सुरळीत ठेवतांना वाहतूक पोलिसांना सतत हजर राहून प्रचंड मेहनत घ्यावी लागते. 



प्रमुख चौकात एकूण 20 जागा

वाहतुकीचा खोळंबा झाला तरी सर्वसामान्य नागरिकांचा रोष  सुद्धा वाहतूक पोलिसांनाच सहन करावा लागतो. ही बाब हेरून शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती मीटिंग मध्ये ऑटो स्टँडचा गंभीर मुद्दा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर  यांच्या समोर मांडला. याबाबीवर विचार विनिमय होवून एक समिती स्थापन करण्यात आली. ऑटोस्टॅण्ड साठी संपूर्ण शहरात जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने आर.टी .ओ., महानगरपालिका, शहर वाहतूक शाखा चे अधिकाऱ्यांनी शहरात सर्वेक्षण करून शहराचे चारही बाजूला प्रमुख चौकात एकूण 20 जागा निश्चित केल्यानंतर पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्फत  9 महिन्या पूर्वी मनपा आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठविल्या नंतर त्यावर विचार सुरू असतानाच, नव्याने रुजू झालेल्या मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी गांभीर्य लक्षात घेऊन दोन दिवसा पूर्वी या प्रस्तावाला मंजुरी दिली. लवकरच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊन निश्चित केलेल्या जागा ऑटो स्टँड साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,अशी माहिती  अधिकृत सूत्रांनी दिली.





टिप्पण्या