Varhadi Dictionary: लोककवी विठ्ठल वाघ यांच्या अथक प्रयत्नातून वर्‍हाडी शब्दकोश तयार; शब्दकोश म्हणकोश व वाक्प्रचार कोशाचे प्रकाशन




भारतीय अलंकार24

अकोला: श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ व याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. रावसाहेब काळे यांनी संपादित केलेल्या वर्‍हाडी बोली शब्दकोश, म्हणकोश व वाक्प्रचार कोशाचे प्रकाशन राज्य मराठी विकास संस्थेने मुंबई येथे  मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून केले आहे. 



बोली प्रकल्प २०११ पासून सुरू


महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने डॉ. रामदास डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बोली प्रकल्प २०११ यावर्षी सुरू केला होता. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठाला बोली प्रकल्प दिला होता. काही विद्यापीठाने हे काम नाकारले तर काही विद्यापीठाने आपल्या मराठी विभाग मार्फत हा प्रकल्प पूर्ण केला. याला अपवाद ठरले ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. या विद्यापीठातील मराठी विभागाने अशा प्रकारचे काम यापूर्वीच डॉ. विठ्ठल वाघ व रावसाहेब काळे हे करत आहे, असे ज्ञात असल्यामुळे हा प्रकल्प यांना पूर्ण करण्यासाठी दिला. 




रावसाहेब काळे हे साहाय्यक संशोधक


डॉ. विठ्ठल वाघ हे मुख्य संशोधक, डॉ. रावसाहेब काळे हे साहाय्यक संशोधक, व ह्या संपूर्ण प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी डॉ. मनोज तायडे हे प्रकल्प प्रमुख म्हणून कार्य केले. हे काम अमरावती, अकोला व लोणी असे तीन ठिकाणावरून चालू झाले. कोणी कोणाचा मालक नाही व कोणी कोणाचा नोकर नाही. कुठेही कोणाची हजेरी नाही ना सही नाही. सर्वांना असलेली आपली कामाच्या प्रती आपुलकी. ‘असे घ्यावी जीव कामात ओतून, जसा म्हशीच्या थानाले बसे गोचीड चिटकून’ या डॉ. वाघ यांच्या काव्य ओळीप्रमाणे कामाला सुरुवात झाली. वाघ सरांनी वर्‍हाडातील गाव आणि गाव एकट्याने हिंडून वर्‍हाडी बोलीतील एकएक शब्द गोळा केले, म्हणी गोळा केल्या, वाक्प्रचार गोळा केले. जसे येतील तसे. लहान मुलांच्या शाळेतून, म्हतार्‍या माणसांच्या जवळून शब्द, म्हणी, वाक्प्रचार गोळा केले. आपल्या कविता गावातील अबालवृद्धाना ऐकवत व त्यांच्या जवळून हे सर्व साहित्य जमा करत होते. असे अविरत काम चार वर्ष चालू राहले आणि २०१४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला.




वर्‍हाडात काव्ययात्रा



डॉ. वाघ हे वर्‍हाडातील असल्यामुळे आयुष्याभराच्या, चाळीस पन्नास वर्षांच्या त्यांच्या अवलोकनातून हा प्रकल्प उभा राहिला. त्यांनी काव्यगायनाला सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांनी वर्‍हाडी बोलीतील शब्द, म्हणी व वाक्प्रचार जमा करायला सुरुवात केली ते आजपर्यंत. ‘पारंपरिक वर्‍हाडी म्हणीचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय असल्यामुळे संपूर्ण वर्‍हाडात काव्ययात्रा काढली. या काव्य यात्रा पायी गावागावात फिरून लोकांच्या समोर ‘तिफण हाकलली’ आणि वर्‍हाडातील हजारो लोकांनी म्हणी, शब्द, वाक्प्रचारांच्या ओट्या भरूभरू या ‘तिफणकर्‍याला’ लोकवाङ्मयाने श्रीमंत केले. तीच श्रीमंती आज या कोशाना लाभली. 




वर्‍हाडकरांच्या अभिमानाची गोष्ट


एवढे मोठे कोश तयार करणारी वर्‍हाडी बोली ही महाराष्ट्रातील पहिली बोली आहे. आजपर्यंत अनेक बोलींचा भाषाशास्त्रीय अभ्यास झाला आहे मात्र, अशा प्रकारचा महाविशाल प्रकल्प गाडगे बाबा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा वारसा सांगाणार्‍या त्यांच्या लेकरांनी पूर्ण केला. ही समस्त वर्‍हाडकरांच्या अभिमानाची गोष्ट आहे. चक्रधर स्वामींनी वर्‍हाडी बोलीला जो राजभाषेचा दर्जा दिला होता, तोच दर्जा आज वर्‍हाडी बोलीला मिळत आहे. प्रकल्प चालू असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांनी या कोशाचा कामाची दखल घेऊन स्तुती केली होती आणि आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्य राज्य मराठी विकास संस्थेच्या वाङ्ममय पुरस्कार सोहळ्यात वर्‍हाडी बोलीच्या कोशाचा उल्लेख केला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व सर्व कार्यकारीणी सदस्य तसेच श्री शिवाजी महाविद्यालय अकोला विकास समितिचे सर्व सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी डॉ विठ्ठल वाघ यांचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

  1. विठ्ठल वाघांचा वऱ्हाडी शब्दकोष हा वऱ्हाडी भाषेचे पुनरुत्थाना संबंधात ( जीला आज वऱ्हाडी बोली म्हणतात) मैलीचा दडद होय
    -उमेश ढोक,अंजनगाव सूर्जी

    उत्तर द्याहटवा
  2. वर्हाडी शब्द कोश निर्मिती ही मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची भर टाकणारा उपक्रम ठरला आहे.
    ---सुरेंद्र कडू , पथ्रोट

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा