Political news: रामदेव बाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

                                       file image

मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड करिता परवानगी मिळावी म्हणून भाजपचे षडयंत्र! - पटोले यांचा आरोप




 

भारतीय अलंकार 24  

मुंबई: रामदेव बाबांच्या पतंजली समुहाच्या हर्बल अँड फूड पार्कसाठी तसेच अनिल अंबानीच्या उद्योगासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्प मध्ये राज्य सरकारने नाममात्र दराने जमीन दिली होती. परंतू  त्या जागेवर अद्याप उद्योग उभे राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत ? त्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार ?, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.




यासंदर्भात पटोले म्हणाले की, मिहान प्रकल्पामधील २३० एकर जमिनीवर रामदेवबाबांचा पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्कची निर्मिती करणार होता. रामदेवबाबांना ही जमीन ६६ वर्षांसाठी अतिशय कवडीमोल भावात दिली होती. या उद्योगामुळे ५० हजार रोजगार निर्मिती होईल तसेच दररोज ५ हजार कोटींचा कच्चा माल खरेदी केला जाईल असा दावा करण्यात आला होता परंतु चार वर्षे झाली तरी अद्याप या जागेवर पतंजलीचा उद्योग उभा राहिलेला नाही. अनिल अंबानी यांच्या रिलायंस डिफेन्स कंपनीसाठीही मिहानमध्ये २८९ एकर जमीन देण्यात आली आहे. या उद्योगातूनही प्रत्यक्ष २००० तर अप्रत्यक्ष १५ हजार रोजगार निर्मिती होईल असा दावा करण्यात आला होता पण हा प्रकल्प अद्याप उभा राहिलेला नाही.




नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, रामदेवबाबा, अनिल अंबानीसह ज्यांना ज्यांना उद्योग निर्मिती साठी सरकारने जमिनी उपलब्ध करुन दिल्या पण त्या जागेवर उद्योग उभे राहिले नाहीत त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करु.




अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड करिता परवानगी मिळावी म्हणून भाजपचे षडयंत्र!



उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानीच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.



यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तीक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी? हा प्रश्न आहे. २००९ साली अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घात पात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुस-याच दिवशी झाला होता, याची आठवणही पटोले यांनी करून दिली. राज्यात व देशात असलेल्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजपानेच या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला असेही पटोले म्हणाले.


टिप्पण्या