Political news: Akola: मनपा स्थायी समिती सभापतीपदी संजय बडोणे यांची निवड; तर राष्ट्रवादीचे भाजपला स्पष्ट समर्थन असल्याचा राजेश मिश्रा यांनी केला आरोप




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक आज सकाळी पार पडली. निवडणुकीत १७ वे स्थायी समिती सभापती म्हणून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय बडोणे यांची निवड झाली. त्यांना १० मते मिळाली.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही निवडणूक पार पडली. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर होते. निवडणुकीत संजय बडोणे यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणूकीत एकूण १६ सदस्य होते. बडोणे विरुद्ध शिवसेनेच्या प्रमिला गीते होत्या. बडोणे यांना १० मत तर गीते यांना ४ मत प्राप्त झाले. राष्ट्रवादीचे सदस्य अनुपस्थित असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपला छुपी मदत असल्याची चर्चा यावेळी महापालिकेत रंगली होती. 


राजेश मिश्रा यांचा आरोप


दरम्यान, भाजपच्या प्रत्येक भ्रष्टाचारात राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपला मदत करीत असून राष्ट्रवादीचे भाजपला स्पष्ट समर्थन आहे, असा आरोप यावेळी शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी केला. निवडणूक पार पडल्यानंतर मिश्रा यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीं सोबत याबाबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.




बडोणे यांचा विजय निश्चित होता

महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी आज ९ मार्च रोजी निवडणूक पार पडली. विरोधी पक्षातील काँग्रेस व शिवसेनेने आघाडी करीत सोमवारी सत्ताधारी भाजपच्या विरोधात महिला उमेदवाराचा अर्ज दाखल केला होता. भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक १९ मधील नगरसेवक संजय बडोणे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने बडोणे यांची निवड निश्चित मानली जात  होती. 



राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष


राज्यात महाविकास आघाडीमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला महापालिकेत पाच नगरसेवक आहेत. आघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर तोंडसुख घेणाऱ्या भाजपसोबत स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे   राष्ट्रवादीचे सदस्य कोणाच्या बाजूने मतदान करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 



खुली ऑफर दिल्याची चर्चा!


स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य आहेत. सभापतीपदासाठी विजयी उमेदवाराला नऊ मतांची गरज होती. या समितीत १६ पैकी १० सदस्य भाजपचे असल्याने भाजपचा विजय निश्चित मानल्या गेले होते. अशा स्थितीत काँग्रेस, सेनेने उमेदवारी अर्ज सादर करण्यासोबतच भाजपमधील तीन सदस्यांना खुली ऑफर दिल्याची चर्चा सोमवारी शहरात रंगली होती. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत मंगळवारी कोणाचा विजय होतो, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.



संजय बडोणे यांची प्रतिक्रिया


संजय बडोणे यांनी याआधी  सन २००३-२००४ मध्ये महापालिका स्थायी समिती सभापती म्हणून काम केले आहे. त्यावेळी त्यांनी केलेले कामे पाहता सन २०२१-२२ मध्ये बडोणे यांना भाजपाने पुन्हा संधी दिली.


"पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे त्यावर मी १००% टक्के खरा उतरण्याचा प्रयत्न करेल.", असे यावेळी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती संजय बडोणे यांनी प्रतिक्रिया दिली.




आतापर्यंत झालेले सभापती व त्यांचा कार्यकाळ



विजय देशमुख २००२-२००३

संजय बडोणे २००३-२००४

विलास शेळके २००४-२००५

संजय शेळके २००५-२००६

सुनील मेश्राम ----

सुनील शुक्ल २००६-२००७

रफिक सिद्दीकी २००७-२००८

साजिद खान २००८-२००९

पप्पु शर्मा २००९-२०१०

पप्पु शर्मा २०१०-२०११

विजय अग्रवाल- २०१२-२०१३

विजय अग्रवाल -२०१६-२०१७

बाळ टाले -२०१७-२०१८

विशाल इंगळे- २०१८-२०१९

विनोद मापारी -२०१९-२०२०

सतीश ढगे - २०२०-२०२१

संजय बडोणे -२०२१-२२



टिप्पण्या