Online education: Akola: संपूर्ण शुल्क भरण्यासाठी पोदार शाळेने पालकांवर आणला दबाव; संतप्त पालकांनी काढला मोर्चा...


 


नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : कृषी नगर भागातील पोदार इंटरनॅशनल शाळेने, शालेय परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांवर वार्षिक शाळा व परीक्षा शुल्क भरण्यासाठी दबाव आणला आहे. शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देणार नाही, अशी सूचना वजा धमकी  शाळा प्रशासनाने दिली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर एकूण शुल्क मधून ६० % शुल्क माफ करण्याची मागणी पालकांनी केली आहे. याआधी पालकांनी या संदर्भात शाळेला विनंती देखील केली होती. मात्र, यावर कुठलीच कारवाई न झाल्याने अखेर त्रस्त व संतप्त झालेल्या पालकांनी शाळा प्रशासन विरोधात आज मोर्चा काढून, फी (शुल्क) माफ व्हावी, अशी मागणी केली. मागणीचे लेखी निवेदन शाळा प्रशासनाकडे सोपविण्यात आले. निवेदन वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे सांगून शाळा प्रशासनाने पालकांची बोळवण केली. मोर्चात जवळपास १५०-२०० पालकांचा समावेश होता.




काय लिहलं आहे निवेदनात


यावर्षी कोरोना या जागतिक महामारी मुळे शाळा भरली नाही. शाळेने online शिक्षण देणे सुरु केले. त्याकरिता लागणारी e - books ज्यांनी फी भरली त्या विद्यार्थ्यांना पासवर्ड देण्यात आला. पण इतर विद्यार्थाना e - books पासून वंचित ठेवले. अश्या अपुऱ्या सुविधात शाळेने online शिक्षण देणे सुरु केले.  पालकांकडे online शिक्षण करिता मोबाईल , लॅपटॉप,कॉम्पुटर आहे किंवा नाही याची खातरजमा करणे शाळेने गरजेचे समजले नाही. व online शिक्षणाकरिता पालकांना अतिरिक्त खर्च करण्यास भाग पाडले. online क्लास मध्ये १०० ते १५० विद्यार्थांना शिकविले जायचे, अश्या परिस्थिती त्या मुलांच्या काय लक्षात आले असेल हे देव जाणे. 



Covid-19 महामारी पूर्वी शाळेमध्ये ६-८ तास शिकविल्या जायचे व त्याची फी पालक भरत होते. परंतु online शिक्षण करिता किती फी द्यावी लागेल, याबाबत शासनाने कोणताही निर्णय दिला नाही. असे असताना व शाळेच्या सर्व प्रकारच्या खर्चात कपात होत असून, तसेच शाळेने शिक्षकांना सुद्धा पूर्ण पगार देण्याचे टाळले आहे.  शाळेने दरवर्षीच फी मध्ये वाढ केली आहे. 



शाळेने नवीन PTA मेंबरची लवकरात लवकर निवड करावी व फी बाबत निर्णय घ्यावा किंवा ६० % पर्यंत कमी करावी. शहरातील इतरही खाजगी शाळेने स्वतःहून फी कमी केली, याची शाळा व्यवस्थापनेने नोंद घ्यावी.  शाळेने सामाजिक भान लक्षात ठेवून विद्यार्थी व पालकांना सोबत न्यायपूर्ण व्यवहार करावा. शाळा हे शिक्षणाचे मंदिर आहे, शाळा व्यवस्थापनाने याची जाण ठेवावी. अकोला शहरामध्ये शाळेचा पाया रोवण्यात आम्हा अकोल्यातील पालकांचा हातभार आहे हे शाळेने लक्षात ठेवावे. शाळा व्यवस्थापने विद्यार्थांना वेठीस धरून पूर्ण फी वसूल करण्याचा अट्टाहास सोडावा व यामध्ये शाळेने पुढे येऊन आपले सामाजिक दायित्व सिद्ध करावे. यामुळे आम्हा पालकांनाही शाळेबद्दल गर्व वाटेल,असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर पालकांच्या सह्या आहेत.



मागणीचे निवेदन वरिष्ठांकडे पाठवून या संदर्भात निर्णय घेवू, असे आश्वासन शाळा प्रशासनाने पालकांना दिले. मात्र, यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया शाळा प्रशासनाने दिली नाही.



टिप्पण्या