National Film Award: अकोल्यातील चित्रकार राज मोरे यांच्या 'खिसा' लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित



भारतीय अलंकार 24

अकोला: अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवणाऱ्या 'खिसा' या मराठी शॉर्टफिल्मने ६७ वा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविला आहे. नॉन फिचर फिल्म कॅटेगरीत राज मोरे यांना सर्वाेत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा भारत सरकार कडून करण्यात आली असून, या यशाने अकोल्याच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली आहे.





पी.पी. सिने प्रॉडक्शन, मुंबई आणि लालटिप्पा निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केले आहे. तर लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भातील अकोला येथे झाले आहे. ललित कला अकादमीतर्फे ५४ वा राष्ट्रीय अकादमी पुरस्कार पटकावणारे राज प्रीतम मोरे मुळचे अकोल्याचे असून त्यांच्या या पहिल्या लघुपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार पटकाविले आहेत.





खिसा हा लघूपट ग्रामीण भागातील मानसिकतेवर भाष्य करणारा असून एका लहान गावात इतर मुलांच्या खिशा पेक्षा मोठा खिसा शिवून घेणाऱ्या मुलाची मन हेलावून टाकणारी कथा आहे. या लघूपटात कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि बालकलाकार वेदांत श्रीसागर यांच्या भूमिका असून पारिजात चक्रवर्ती यांचे संगीत लाभले आहे. संकलनाची धुरा संतोष मैथानी यांनी सांभाळली असून सिमरजितसिंह सुमन यांनी फोटोग्राफीचे दिग्दर्शन केले आहे.



 

खिसा लघुपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदविले सुयश  

जागतिक ख्यातीचे चित्रकार राज मोरे यांच्या द्वारे दिग्दर्शित या लघूपटास यापूर्वी इस्तंबूल फिल्म अवॉर्ड २०२० मध्ये सर्वात्कृष्ट लघूपट आणि सर्वाेत्कृष्ट पटकथेसाठी पुरस्कार मिळाले आहेत. तसेच अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या १० व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातही 'खिसा'ने सर्वात्कृष्ट लघूपटकथेच्या पुरस्कार पटकाविला आहे. तुर्कस्थानातील इस्तंबूल येथे आयोजित आयएफएच्या वार्षिक लाइव्ह स्क्रीनिंग मेळाव्यात प्रतिष्ठित अशा गोल्डन स्टार पुरस्कारासाठी हा लघूपट पात्र ठरला असून डब्लीन इंटरनॅशनल शॉर्ट अँड म्युझिक फेस्टिव्हल २०२० मध्ये 'खिसा'ला सर्वाेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघूपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी नामांकन मिळाले होते. तसेच  जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१, मुंबई इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हल, उज्जैनी लघूपट महोत्सवात पुरस्कार पटकावले आहेत. या लघूपटाची  कॅनडाच्या मॉन्ट्रियल इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल, २६ व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डायोरोमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या महोत्सवात 'खिसा' ची अधिकृत निवड करण्यात आली आहे.



 

फिल्मफेअर पुरस्कारासाठी मिळाले नामांकन 


जगभरात गाजत असलेली आणि विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेला 'खिसा' या लघुपटास  फिल्मफेअर पुरस्कारांसाठी देखील नामांकन मिळाले असून, हा लघुपट  फिल्मफेअरच्या संकेतस्थळावर नामांकन प्राप्त चित्रपटाच्या यादीत उपलब्ध असून अकोल्यातील प्रेक्षकांनी हा लघुपट बघून त्यास वोट करण्याचे आवाहन लघूपटाच्या टीमने केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा