Nanded riots : हल्लेखोरांची धरपकड सुरू; ४०० जणांवर गुन्हा दाखल,२० जणांना अटक



भारतीय अलंकार 24

नांदेड: महाराष्ट्रात होळी धुळवड निमित्त उत्साही वातावरण असताना, काल  नांदेडमध्ये होला मोहल्ला सण साजरा करताना गुरुद्वारा चौरस्त्यावर दंगल घडली.  या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. जमावाकडून पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यामुळे नांदेड मधील वातावरण सध्या तणावाचे झाले आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २० हल्लेखोरांना अटक केली असल्याचे वृत्त आहे.


जमावाच्या हल्ल्यात काल जखमी झालेल्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  एसपी यांच्या अंगावरचा वार आपल्या अंगावर घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. काल रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जखमींमध्ये नांदेड पोलीस दलाचे तीन कर्मचारी असून, एक जण राज्य राखीव पोलीस दलाचा कर्मचारी असल्याचे कळते. 


दरम्यान, पोलिसांवर झालेल्या या हल्ल्या प्रकरणी नांदेडमध्ये सुमारे ४०० जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली. तसेच ६० आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले. आरोपींची शोध मोहीम पोलिसांकडून सुरूच आहे.



नांदेड मध्ये लॉकडाऊन असल्याने होळी नंतर निघणाऱ्या शीख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नव्हती. पण काल सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारा मध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले होते . गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती. पोलिसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेटिंग तोडली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे. चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांचे मोबाइल हल्लेखोरांनी फोडले . यावेळी पोलीस उपअधीक्षक यांची गाडी फोडण्यात आली.



नांदेड मध्ये दररोज कोरोनाचे एक हजार हुन अधिक रुग्ण सापडत असून, १७ ते १८ जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गुरुवार पासून टाळे बंदी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काल शीख समाजाच्या वतीने हल्ला बोल मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यात १० पोलीस जखमी झाले. तर ३० ते ४० मोबाईल फोडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक यांची गाडी ही फोडण्यात आली.



काय घडलं काल संध्याकाळी

शीख समाजात होळी सणाला मोठे महत्व आहे. त्यानिमित्त शीख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्लाबोल (होला मोहल्ला) मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या वतीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असा आदेश यापूर्वीच काढला होता. मात्र या आदेशाची पायमल्ली करत हल्लाबोल मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यात सहा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलिस अधीक्षक यांच्या वाहनांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर नांदेड शहरात तणाव निर्माण झाला. वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.




विनापरवानगी हल्लाबोल मिरवणूक काढून संतप्त तरुणांनी पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये सहा पोलिस जखमी झाले. पोलीस अधीक्षकांच्या शासकीय गाडीसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांची नासधूस केली. काल सायंकाळी सहाच्या सुमारास गुरुद्वारा परिसरात हा प्रकार घडला.



घटने मागील कारण

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सोमवार दि.२९ मार्च रोजी परंपरेनुसार हल्लाबोल मिरवणूक होळी निमित्त काढण्यात आली.  मिरवणुकीसाठी स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. जिल्हा प्रशासनाने त्यांना मिरवणूक काढू नये, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने काळ कठीण आहे. त्यामुळे शीख समाजाने प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली होती. परंतू, गुरुद्वारा परिसरातून बाहेर येवून काही संतप्त युवकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स तोडून टाकले. हातात खुल्या तलवारी घेऊन शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. पोलिस प्रशासनाकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता या युवकांनी पोलिसांवरच हल्ला केला. यात एस पी चे अंगरक्षक  दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा-सात पोलीस गंभीर जखमी झाले. या हल्ल्यातून पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले थोडक्यात बचावले.



घटनेची माहिती मिळताच पोलिस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी भेट दिली. पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.


टिप्पण्या