Lockdown unlock: Akola: एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षा शिकवणी वर्ग तसेच व्यायामशाळा सुरु करण्यास सशर्त परवानगी

                                     File image



भारतीय अलंकार 24

अकोला:  जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारीचे शिकवणी वर्ग तसेच व्यायमशाळा सुरु  करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी देण्याचे आदेश निर्गमित केले आहे. हे आदेश बुधवार 17 पासून लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.




यासंदर्भात आदेशात नमूद केल्याप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील एनईईटी, जेईई, सिईटी परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीचे शिकवणी वर्ग तसेच व्यायाम शाळा सुरु  करण्यासाठी खालील अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.


अटी व शर्ती याप्रमाणे -


1) खाजगी कोचिंग क्‍लास, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्‍था सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीतच  सुरु ठेवता येतील.


2) खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस व प्रशिक्षण संस्‍था यांनी त्‍यांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करतांना प्रत्‍येक बॅचमध्‍ये नियमीत आसन क्षमतेच्‍या 25 टक्के किंवा जास्‍तीत जास्‍त 20 विद्यार्थी राहतील. तसेच दोन बॅचच्‍या मध्‍ये  अर्धा तासाचा अवकाश ठेवून प्रत्‍येक वेळी हॉल व रुमचे तसेच तदनुषांगीक साहीत्‍याचे  निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.


3) विद्यार्थ्‍याच्‍या पालकांचे संमती पत्र प्राप्‍त करुन घेणे बंधनकारक राहील.


4) प्रशिक्षण देणाऱ्या आस्‍थापनेतील सर्व संबंधीतांचे तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्‍यांचे  कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील.


5) वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी मास्‍कचा वापर करणे अनिवार्य राहील. त्‍याचप्रमाणे बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमानुसार असावी. शक्‍यतोवर एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी.


6) कोविड-19 चे अनुषंगाने केन्‍द्र व राज्‍य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्‍या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.


7) या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेल्‍या विविध आदेशांचे  उल्‍लंघन होणार नाही याची संबंधीत संचालकांनी व संस्थेने दक्षता घेण्‍यात यावी.


8) व्‍यायामशाळेमध्‍ये सरावास येणाऱ्या  खेळाडू तसेच कर्मचारी यांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करण्‍यात यावी.  तसेच  सर्व संबंधीतांची  कोविड चाचणी करण्‍यात यावी.


9) सराव करतांना दारे, खिडक्‍या उघडी ठेवण्‍यात यावी तसेच ए.सी. चा वापर टाळण्‍यात यावा. 


10) वापरण्‍यात येणा-या साहीत्‍यांचे  वारंवार निर्जंतूकीकरण करण्‍यात यावे.


11) कोविड-19 संदर्भात लक्षणे नसल्‍यास खेळाडूंना प्रवेश देण्‍यता यावा. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असल्‍यास प्रवेश देण्‍यात येवू नये.


12) कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव रोखण्‍यासाठी शासनाने तसेच क्रीडा विभागाकडून निर्गमित केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.



या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्‍याचे दृष्‍टीने संबंधीत उपविभागाचे  उपविभागीय अधिकारी यांनी  त्‍यांचे अधिनस्‍त पथकाचे  गठण करुन आवश्‍यक ती तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. 

टिप्पण्या