Holi 2021: होलीका दहन: मानव कल्याणासाठी कोरोना विषाणूचा नायनाट होवू दे…




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला,दि.२८: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाही शासनाने घालून दिलेल्या नियमात होळी सण साधेपणाने साजरा करण्यात आला. अकोल्यात रूढी व प्रथेनुसार सायंकाळी  ठिकठिकाणी होळी प्रज्वलित करण्यात आली. श्री राणीसाती दादी मंदिरातील २१ वर्षाची परंपरा लाभलेला 'भक्त प्रल्हाद व होलिका दहन' देखावा यावर्षी देखील साकारण्यात आला. तर केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी दिल्ली निवासस्थानी पारंपरिक होळी सण साजरा करून, देशवासियांसह अकोलेकरांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.



सायंकाळी  होलिका दहन

रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरोघरी, मंदिर तसेच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन करण्यात आले. लाकूड, शेण गवऱ्याच्या साह्याने होळी उभारण्यात आली. पुरणपोळी आणि वड्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. नारळ, साखरेच्या गाठी, चाकोल्याची माळ, समिधा अर्पण करून विधिवत पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली. पुजाऱ्यांच्या हस्ते देवाची होळीचे पूजन करून कोरोना विषाणूचा नायनाट होऊन सर्व सजीवांचे कल्याण होवो, अशी प्रार्थना करण्यात आली.  



प्रमुख मंदिरात झाले पूजन

श्री राणी सती धाम मंदिर, सालासर बालाजी मंदिर, राज राजेश्वर मंदिर, जयहिंद चौक मधील लक्ष्मी नारायण मंदिर, मुरली मंदिर, डाबकी रोड हनुमान मंदिर ,बिर्ला मंदिर, मोठे राम मंदिर, छोटे राम मंदिरासह  घरोघरी आणि चौका चौकात होलिका दहन करण्यात आले.



भक्त प्रल्हाद आणि होलिका दहन 

राणी सती दादी मंदिरात होलिका दहन आकर्षक देखाव्याची २१ वर्षापासूनची ही परंपरा. भक्त प्रल्हादाची प्रतिमा होलिका सोबत बसवण्यात येते. त्यानंतर भक्त प्रल्हाद सुखरूप अग्नीतून बाहेर येतात; आणि होलिका जळून राख होते, असा देखावा साकारला जातो.  या देखाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी  समाजबांधव मंदिर ट्रस्ट सोबत जगदिशप्रसाद बाछूका विशेष परिश्रम घेतात. यावर्षी कोरोना संकटात देखील ही परंपरा कायम ठेवली.



होलिका दहन कथा

राक्षसकुळाचा हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून श्रीविष्णू यांचे (श्री नारायण) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षस प्रवृत्तीची आणि क्रूर होती.  तीला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होणार नव्हता; तसा तिला देवांकडून  वर प्राप्त  होता. यासाठी हिरण्यकश्यपूने लाकडी चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतू, याच क्षणी प्रल्हाद आपल्या इष्टदेवतेचा जप करू लागला. प्रल्हादाच्या या भक्ति साधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली तर श्रीविष्णू भक्त असलेले प्रल्हाद या अग्नीदिव्यातून सुखरूप बाहेर आले. प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू खांबातून प्रकट होवून नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध करतात,अशी कथा यावेळी सांगून देखावा साकारला जातो. दरवर्षी हा देखावा पाहण्यासाठी अकोलेकर गर्दी करतात.यावेळी मात्र केवळ निवडक लोकांच्या उपस्थित देखावा सादर करण्यात आला.



दिल्ली निवासस्थानी संजय धोत्रे यांनी साजरी केली होळी

संस्कृती संस्कार सोबत मानवतेचा कार्य आपल्या आई-वडिलांपासून घेऊन, ग्रामीण संस्कृती कायम ठेवणारे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे प्रत्येक सणवार मोठ्या उत्साहाने साजरे करतात. covid-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, त्रिसूत्रीचे पालन करून दिल्ली निवासस्थानी सुहासिनी धोत्रे, अनुप धोत्रे, समीक्षा धोत्रे, छोटी नात यांच्यासह होळी सण साजरा केला. देशवासीयांच्या उत्तम आरोग्यासाठी धोत्रे यांनी प्रार्थना केली.

टिप्पण्या