Coronavirus impact: कोरोना दहशतीची वर्षपूर्ती… Lockdown मुळे अनुभवले चांगले अन वाईट धडे …




✍️ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अनामिक भीतीने सन २०२० उजाडलं. जानेवारी-फेब्रुवारीत चीन मधल्या बातम्या टीव्हीवर पाहत कोरोना विषाणू खरचं आहे की, चीनचे नवे काही षड्यंत्र आहे, यावर चर्चा व्हायच्या. तेथील lockdown देखील टीव्हीवर पाहिलं. नंतर हा Covid-19 विषाणू हळूहळू जगभर पसरल्याच्या बातम्या. मार्च मध्ये पुढची बातमी भारतात दिल्लीतही हा विषाणू पोहचला. नंतर राज्यात पुण्यात याने दहशत माजवली. आणि मनात असलेली भीती खरी ठरली.  एक दिवस हा विषाणू आपल्या अकोला शहरात दाखल झाला. अन अजूनही जायचे नाव घेत नाही आहे. आता तर या विषाणूने उद्रेक केला. Coronavirus मुळे लागलेल्या Lockdown ची आज वर्षपूर्ती. यामुळे बरेच चांगले अन त्यापेक्षा जास्त वाईट अनुभव नागरिकांनी अनुभवले.




Lockdown चे सुरवातीचे दिवस छान गेले. आपले छंद जोपासायला वेळ मिळतो आहे म्हणून लोक आनंदित होते. मात्र नंतर  हा विषाणू आपल्या शहरात ... आपल्या प्रभागात... आपल्या शेजारी अन शेजारून आपल्या घरात या विषाणूने कधी प्रवेश केला हे लोकांना समजलेच नाही. 



Lockdown सुरवातीचा


रस्त्याने भयंकर शुकशुकाट… एरव्ही गजबजलेले रस्ते एकदम शांत पाहून आपलं शहरही आपल्याला अनोळखी वाटत होते. सुरुवातीच्या काही दिवसात घराघरांत आनंदाचे वातावरण नंतर मात्र घरात चिंतेने घर केले. उद्योग, व्यवसाय ठप्प झाले. लाखो लोक बेघर झाले. बेरोजगारीचे संकट निर्माण झाले.  उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून समोर उभा राहिला. थाळ्या वाजवल्या… टाळ्या वाजवून...दिवे लावले… परंतू सामान्यांच्या जगण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणता उपाय सरकारने केला नाही. मात्र, सामान्यांच्या जवळ कोरोनाला हरवण्याची जिद्द होती. सामान्यांनी एकमेकांना मदतीचा हात दिला. 



कोरोनाने जगण्याची नवी शैली दिली.‘वर्क फ्राॅम होम’, ऑनलाइन शिक्षण अशी नवी सुरुवात कोरोना काळात झाली. आता ही शैली सामान्यांच्या जगण्याचा भाग बनली आहे. अशा अनेक चांगल्या अन वाईट गोष्टींचा अनुभव अन त्यामधून सावरून घेण्याचा धडा लॉकडाऊनने शिकविला. 




२२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी २३ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनने अकोलेकर यांच्या स्मृतीत कायम राहणार. हा काळ ‘न भूतो न भविष्यती’ असा होता.  



कोरोना महामारीने देशात, राज्यात आणि अकोला जिल्ह्यात प्रवेश केला आणि त्यानंतर सर्वसामान्यांना लाॅकडाऊनला सामोरे जावे लागले. आजपर्यंत कधीही पाहिला नसेल असा कर्फ्यू लाॅकडाऊनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विविध क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला. मात्र,या सगळ्यांतून सावरत कोरोनाशी दोन हात करत अकोलेकरांनी एक पाऊल टाकुन   पूर्ववत जगण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘मिशन बिगिन अगेन' ने जनजीवन सुरळीत होत होते. परंतु कोरोना संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले. परिणामी, आता पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.


Corona Lockdown चे टप्पे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहननूसार २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळण्यात आला. या दिवशी कोरोना संकटाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ्या, थाळ्यांसह शंखनाद करत डाॅक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यंत्रणेप्रती नागरिकांनी सद्भावना व्यक्त केली.


जनता कर्फ्यूच्या उत्स्त्फूर्त प्रतिसाद नंतर केंद्र आणि राज्य सरकारने २२ मार्च रोजी मध्यरात्रीपासून (२३ मार्च २०२०) कडक निर्बंध आणि अधिक व्यापक उपाययोजना जाहीर केल्या. संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजेपासून शहरासह जिल्ह्यात जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले.


संचारबंदीची घोषणा होताच विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची रस्त्यावर एकच गर्दी उसळली. २३ मार्चला रात्री ९ वाजल्यानंतर मात्र, रस्ते निर्मनुष्य झाले. ही स्थिती पुढील अनेक दिवस जिल्ह्यात पाहायला मिळाली. शहरात तर भयाण शांतता अनुभवास आली. या काळात कोरोनाने अकोल्यात प्रवेश केला. 



७ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण अकोल्यात आढळला. अकोलेकरांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रशासकीय यंत्रणा हादरली. आणि पुढच्या क्षणाला सावरली. प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. निर्बंध अजून कडक केले. ८ एप्रिल रोजी याच रुग्णाच्या घरी चोरी झाली. ११ एप्रिलला ३० वर्षीय एका रुग्णाने सामान्य रुग्णालयात आत्महत्या केली. 



लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू झाला. ज्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोना साथीचा प्रसार जास्त प्रमाणात झाला आहे, अशा ठिकाणांहून प्रवास करून येणाऱ्यांना अकोला जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक करण्यात आली.



जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्र, मोठे उद्योग, कारखानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. लहान-मोठे कारखाने बंद ठेवण्यात आले. उद्योगासह कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला.


लाॅकडाऊनमुळे ‘वर्क फ्राॅम हाेम’ ही नवी संकल्पना पुढे आली. अनेक उद्योग, व्यवसाय, कार्यालयीन कामकाज ‘वर्क फ्राॅम होम ’ ने सुरळीत ठेवण्यात आले. 



कोरोनाशी लढत लॉकडाऊन पाळत अनेकांना बेरोजगारी, आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. फेरीवाले, भाजीवाले, रिक्षाचालक, मजूर, कामगारांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले. पण अशा लोकांसाठी सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला.


मोठ्या शहरात रोजगारासाठी आलेल्या कामगारांनी लॉकडाऊनमुळे उपासमारीच्या भीतीने गावी परतणे सुरू केले. मिळेल तिथपर्यंत वाहनाने, पायी प्रवास करून कुटुंबासह मजुरांनी स्थलांतर सुरू केले.



मृत्यूचे तांडव काय असते, हे  संपूर्ण देशाने ८ मे २०२० अनुभवले. मध्यप्रदेशकडे रेल्वे रूळावरून पायी निघालेल्या १६ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची दुर्दैवी घटना सटाणा (ता. जि. औरंगाबाद) गावाजवळ घडली. या घटनेनंतर मजुरांना गावी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या.


राज्य शासनाने १ जून २०२० रोजी लाॅकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने सूट दिली. ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करून विविध सेवा सुरळीत करण्यात आल्या. शहरवासीयांचे जीवन सुरळीत झाले होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने वर्षपूर्तीच्या टप्प्यावर पुन्हा  लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे.



माणुसकी 

दरम्यानच्या काळात कोरोनाने अनेकांचे प्राण घेतले. कोरोनाच्या भीतीने काही अपवादात्मक सगेसोयरेनी कोरोना रुग्णांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला तर,एक दोन घटनेत नातेवाईक मृतदेह सोडून पळून गेले.अश्यावेळी माणुसकीचा प्रत्यय देवून सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. असे विदारक प्रसंग देखील या कोरोना संचारबंदी पाहिल्या गेले. 



कोरोना लस 

कोरोना लस देखील भारतात तयार झाली. गावोगावी पोहचली. मात्र, कोरोना संचारबंदीचा काळ वर्षपूर्तीकडे वळत असताना १७ फेब्रुवारी २०२१ ला अकोल्यात एका ग्रामीण रुग्णालयातून वॅक्सिन चोरी झाली. अशी घटना राज्यात आणि देशात कुठे घडली नसेल, ती अकोल्यात घडली. 



सध्या नवे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. २४०० पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पार करण्यास सुरवातीला ४ महिने लागले होते. मात्र, हाच आकडा गेल्या ६ दिवसात पार झाला. कोरोना रुग्ण मृत्यू संख्येतही वाढ होत आहे, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे नागरिकांना आता स्वतःची काळजी घेत कोरोनाशी दोन हात करून मानसिक, शारीरिक स्वास्थ्य जपत आर्थिक उन्नती साधत नवे जीवन जगण्याची कला आत्मसात करून घ्यावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित.







लेख आवडल्यास share करा.प्रतिक्रिया खालील comment box मध्ये लिहा. सदस्यता घ्या (फॉलो करा)





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा