Akola Police: अकोल्यात बस मध्ये घुसले अतिरेकी ...घाबरलेल्या प्रवाश्यांची केली पोलिसांनी सुटका...काय घडला नेमका प्रकार…





भारतीय अलंकार24

अकोला:  मध्यवर्ती बसस्थानक... सकाळी साडे दहा - अकराची वेळ...एका बसमध्ये अतिरेकी घुसल्याची माहिती मिळते… पोलीस ताफा बसस्थानकावर पोहचतो… प्रवासी गोंधळलेले…अन घाबरलेले... परिसरात काहीवेळ पर्यंत तणावाचे वातावरण…पोलिस बसमधील चार अतिरेक्यांना जेरबंद करतात...अखेर हे प्रात्यक्षिक असल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर प्रत्यक्षदर्शी सुटकेचा निःश्वास सोडतात… हे चित्र आज सकाळी अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानक येथे पाहायला मिळाले.


 


मुंबईत उद्योगपती अंबानी यांच्या घरासमोर संशयित आणि स्फोटक असलेले कार दोन तीन दिवसांपूर्वी आढळून आली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरला. या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दलाने सोमवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकात मॉकड्रील आयोजित केले. 



बस हायजॅक

अकोला मध्यवर्ती बसस्थानकात एका बसमध्ये अतिरेकी घुसले आहेत. या अतिरेकांनी बस हॉयजॅक केली असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाकडून सिव्हिल लाईन्स, सिटी कोतवाली, रामदास पेठ पोलिस स्टेशन, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक व नाशक पथकास ही माहिती देण्यात आली. 




गोंधळलेले प्रवासी

काही वेळातच दहशतवाद विरोधी पथक प्रमुख विलास पाटील आणि इतर पोलिस स्टेशनचे अधिकारी व इतर यंत्रणा बस स्थानक येथे पोहचली. अतिरेकी असलेल्या बसच्या आजुबाजूचा परिसर पोलिसांनी दोरी लावून प्रतिबंधित करून निर्मनुष्य केला. प्रवाशांना खाली उतरवण्यात आल्याने त्यांच्यात गोंधळ निर्माण झाला. मात्र,घाबरलेल्या अवस्थेतही प्रवाश्यांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य केले.  



अतिरेकी बाहेर काढले


दरम्यान, काही पोलीस बसच्या छतावर चढले. काही जण खिडकीतून बसमध्ये आत गेले. एक-एक करून चार अतिरेक्यांना (बनावट) बसमधून बाहेर काढून जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर जेरबंद करून पोलिस व्हॅनमध्ये नेण्यात आले. 



हा सर्वप्रकार होईपर्यंत बसस्थानकात असलेल्या प्रवाशांना काहीच माहिती नव्हती. मॉकड्रील पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून प्रवाशांना मॉकड्रील असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तब्बल अर्धा-एक तास हे मॉकड्रील सुरू होते.



तीन डमी अतिरेकीना पोलिसांनी पकडल्यानंतर बॉम्ब शोधक पथक बसमध्ये गेले. श्वानाच्या मदतीने एक संशयित बॅग ताब्यात घेण्यात आली. पूर्ण बॅग तपासण्यात आल्यानंतर अर्धातासाने प्रवासी बस मार्गस्थ करण्यात आली.


हे प्रात्यक्षिक जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी उप विभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकूर, दहशतवाद विरोधी पथक प्रमुख विलास पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले.





टिप्पण्या