Akola crime: बनावट स्वाक्षरी द्वारे करारनामा तयार करून न्यायालयाची केली दिशाभूल; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक




भारतीय अलंकार 24

अकोला: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील रहिवासी गोपाल चंद्रभान हाडोळे व त्याची पत्नी आणि त्याचे सहयोगी सचिन रामराव मानकर यांच्या विरोधात अकोल्यातील चार्टड अकाऊंटट विनय थावरानी यांनी केलेल्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलिस स्टेशन येथे या तिनही आरोपी विरूद्ध भा.द.वि. कलम ४२०, ४२३, ४६५, ४६८, ४७१, १९७, १९८, ३४, व १२० (ब) अन्वये गुन्हे दाखल करून गोपाल हाडोळे व सचिन मानकर यांना अटक केली.




याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोपाल हाडोळे यांनी विनय थावरानी यांच्याकडून २०१६ मध्ये १६ लाख रू. तर २०१७ मध्ये २ लाख रू. घेतले होते. २०१८ मध्ये परत १० लाख रू. चंद्रभान हाडोळे अन्ड सन्स या प्रतिष्ठानच्या नावाने चेकद्वारेच घेतले होते. हे सर्व व्यवहार वैयक्तीक संबंधामुळे व बिनव्याजी स्वरूपाचे होते. त्याबदल्यात गोपाल हाडोळे यांनी १८ लाख रू. व १० लाख रू. चे दोन चेक सदर रकमेच्या परतफेडी करीता दिले होते. विनय थावरानी यांनी दोन वर्षे पैसे परत करण्याची सतत मागणी केल्यानंतरही गोपाल हाडोळे यांनी पैसे परत न केल्यामुळे चेक वटविण्यासाठी बँकेत जमा केले असता हे चेक बाऊंस झाले. त्यामुळे थावरानी यांनी १२ फेब्रुवारी २०१९ रोजी गोपाल हाडोळेची पत्नी व दि. १६ एप्रिल २०१९ रोजी गोपाल हाडोळे याच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे चिडून जाऊन गोपाल हाडोळे याने  विनय थावरानी व यशपाल शर्मा यांच्या विरोधात खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. खदान पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल केले होते. मात्र दाखल करण्यात आलेली तक्रार संशयास्पद  वाटल्याने  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विनय थावरानी व यशपाल शर्मा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यास स्थगिती दिली होती. याशिवाय थावरानी व शर्मा यांची कायम जमानतही मंजूर केली होती.




जिल्हा सत्र न्यायालयात जमानतीसाठी थावरानी यांनी सादर केलेल्या अर्जावर गोपाल हाडोळेने न्यायालयात बनावट करारनामा सादर केला होता. या करारनाम्यातील विनय थावरानी यांच्या सह्या खोट्या असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यांनतर विनय थावरानी यांनी तक्रार दाखल केल्यावर गोपाल हाडोळे व त्याची पत्नी आणि सचिन मानकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. 




गोपाल हाडोळेची आर्थिक गुन्हेगारी पार्श्वभूमी


गोपाल चंद्रभान हाडोळे यांच्याविरूद्ध गेल्या ४ वर्षापासून जिल्हा सत्र न्यायालयात चेक बाऊंसच्या एकूण २९ केसेस सुरू आहेत. याशिवाय फरीदाबाद बहादूर जंग व अहमदाबाद येथेही अनेक केसेस सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अकोल्यातील अक्सीस बँकेची गोपाल हाडोळे यांनी चार कोटी तेवीस लाख रू.ची रक्कम व मास फायनांन्शीयल सर्विसेसची रू ८० लाख थकविली असल्याची माहिती आहे. गोपाल हाडोळे यांनी बऱ्याच लोकांकडून बँकेमध्ये गहाण ठेवलेल्या मालमत्तेऐवजी लाखो रू. करारापोटी घेतली असून ब-याच लोकांची फसवणूक केल्याबाबतची माहिती आहे. 


टिप्पण्या