Mohan Bhagwat: Akola: संघ आणि स्वयंसेवक कसा असावा हे काकाजींच्या प्रेरणादायी आयुष्यातुन कळते - मोहन भागवत





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: संघ आणि स्वयंसेवक कसा असावा हे काकाजी यांच्या आयुष्यातुन कळते. स्व. शंकरलाल उपाख्य काकाजी खंडेलवाल यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन जीवन घडवण्याची प्रेरणा समाजाला मिळेल, ते दायित्व आजच्या पिढीवर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. 



शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी खंडेलवाल महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 



निस्वार्थ समर्पण हेच स्वयंसेवकत्व आहे असे सांगून डॉ. भागवत म्हणाले, काकाजी खंडेलवाल डॉ. हेडगेवार कुलोत्पन्न होते. शुद्ध सात्विक प्रेमातून त्यांनी माणसे जोडली. आपलेपणाची अनुभूती त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मिळाली. कंटकाकीर्ण मार्गावर साथ करणारे मित्र आत्मविश्वास जागवतात असे त्यांचे वागणे असे. सुदैवाने आम्हाला त्यांचे सानिध्य लाभले होते. ज्यांनी त्यांना पाहिले नाही त्यांच्यासाठी स्मरणिका अनुसरणीय राहील, असा विश्वास व्यक्त केला. ‘ऐसी कळवळीयाची जाती लाभाविण केली प्रिती’ या तत्वानुसार शंकरलाल खंडेलवाल यांनी जीवन व्यतित केले. अशा व्यक्तींचीच जन्मशताब्दी साजरी होत असते, त्यातून आम्ही प्रेरणा घेतली पाहिजे, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले. 


संघ आणि स्वयंसेवक कसा असावा हे काकाजी खंडेलवाल यांच्या आयुष्यातुन कळते, एक व्रत एक निष्ठा ठेवून कार्य करणारे स्वयंसेवक असतात, काकाजीनी आपले संपूर्ण आयुष्य संघ विचारांना समर्पित केले,  अकोल्याला काकाजी मिळाले हे अकोल्याचे भाग्य होते. समाजाला आदर्शवत असणारे आचरण ठेवून जीवन जगले पाहिजे, धम्मचक्र प्रवर्तनाय असे यावेळी मोहन भागवत यांनी सांगितले.


व्यक्तिपूजेपेक्षा अनुकरण अनुसरण हे काकाजी यांच्या आयुष्यातुन शिकायला मिळते. मी आणि माझ्या बंधनातून बाहेर पडून समाजासाठी कार्य करणारे योगी असतात. समर्पणाची भावना ठेवून कार्य करणारे स्वयंसेवक असतात. संघाचा स्वयंसेवक कोणत्याही वयाचा कोणत्याही भागाचा असू शकतो, असे मत यावेळी मोहन भागवत यांनी व्यक्त केले.



डॉ. भागवत यांचे स्वागत 

सरसंघचालकांच्या हस्ते सुरुवातीला भारतमाता प्रतिमा पूजन करण्यात आले. समारोह समिती अध्यक्ष अतुल गणात्रा, आयोजन समिती अध्यक्ष गोपाल खंडेलवाल, सचिव महेंद्र कवीश्वर यांनी शाल, श्रीफळ देऊन डॉ. भागवत यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात गोपाल खंडेलवाल म्हणाले, १ ऑगस्ट २०२० पासून शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी वर्षाला आरंभ झाला असून काकाजींच्या कार्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात येत आहे. प्रारंभी  काकाजी खंडेलवाल यांच्या जीवनावर लघु चित्रफीत दाखवण्यात आली. 


सरसंघचालकांच्या हस्ते ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.काकाजींच्या स्मरणार्थ सेवा कार्यासाठी दिला जाणारा पहिला पुरस्कार उत्कर्ष शिशुगृहाचे अध्यक्ष विजय जानी, प्रकल्प प्रमुख दादा पंत यांनी सरसंघचालकांच्या हस्ते स्वीकारला. 



विवेक मुंबईने प्रकाशित केलेल्या संघ समर्पित काकाजी स्मृती ग्रंथाचे विमोचन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. स्मरणिका सर्वांगसुंदर झाल्याची पावती डॉ. भागवत यांनी दिली. आरती देवगावकर यांनी लेखन केले असून निर्मितीमध्ये रवींद्र भुसारी, श्रीकांत कोंडोलीकर, महेंद्र कवीश्वर, निशीकांत देशपांडे, मधुर खंडेलवाल, समीर थोडगे, महेश मोडक यांच्या प्रयत्नातून निर्मिती झाली. विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते पल्लवी अनवेकर तसेच लघुपटाची निर्मिती करणारे स्वप्नील बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. 


कार्यक्रमाचे संचालन प्रा. विवेक बिडवई यांनी, तर आभार प्रदर्शन अतुल गणात्रा यांनी मानले. वैयक्तिक गीत कविता वरघट यांनी गायले.


टिप्पण्या