Livestock Board: विशेष बातमी: महत्प्रयासाने खेचून आणलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याचा निर्णय

                                      File photo



* जुने वळू संगोपन केंद्र, नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा झाला निर्णय


*अकोल्यातील लोकप्रतिनिधी अनभिज्ञ!



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे सद्यस्थितीत अकोला येथे कार्यरत असलेले मुख्यालय जुने वळू संगोपन केंद्र, नागपूर येथे स्थलांतरित करण्याची आज शासनाने मान्यता प्रदान केली आहे. १८ वर्षापूर्वी महत्प्रयासाने हे मुख्यालय अकोल्यात आणल्या गेले होते. मात्र, अकोल्यातील लोकप्रतिनिधीना याबाबत जाणीवच नसल्याने हे मुख्यालय नागपूरला हलविण्याचा निर्णय आज शुक्रवारी शासनाने घेतला.


अकोल्यातील लोकप्रतिनिधी करतात तरी काय?

जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांसाठी झटणारे अकोल्याचे  पालकमंत्री बच्चू कडू,  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना देखील अकोला पशुसंवर्धन मुख्यालय नागपूरला हलविण्याचे रोखू शकले नाही. माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी हे मुख्यालय अकोल्यात खेचून आणले होते. मात्र, त्यावेळी अकोल्यातील लोकप्रतिनिधीनी केलेले श्रम आजच्या स्थानांतरणच्या शासन निर्णयामुळे व्यर्थ गेले असे म्हणावे लागेल. राज्यात सत्ता असलेल्या महाविकास आघाडी मधील नेते यांनी हे मुख्यालय येथेच राहावे, यासाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीत. तसेच एरव्ही छोट्या मोठ्या विकास कामाच्या मुद्यांना विरोध करणारे भाजपा आमदारांनी देखील यावर कोणताच आक्षेप घेतला नाही. ना विरोध दर्शविला. याशिवाय पशुसंवर्धन महामंडळ मुख्यालयासाठी हक्काची जागा देखील उपलब्ध करून देवू शकले नाहीत. याच उणिवांचा फायदा घेत पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री सुनील केदार यांनी हे मुख्यालय आपल्या जिल्ह्यात पळवून नेले, असा आरोप अकोलेकरांकडून केला जात आहे.


मुख्यमंत्र्यांना  दिले होते निवेदन


पशुधन विकास मंडळाच्या कार्यालयाचे प्रशासकीय इमारत आणि आयुक्ताच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी अकोला जिल्हा नियोजन समिती मार्फत सन २०१९-२० मध्ये ६.१० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. या बांधकाम अंदाज पत्रक तयार करून नजीकच्या काळात बांधकाम पूर्ण करणे सुद्धा शक्य आहे, ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूर येथे स्थलांतरित करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनीधींनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मात्र,याचा पाठपुरावा झाला नाही.



मंडळाचे महत्व


पशुपैदाशीची विशेष तज्ञतेची सेवा अधिक कार्यक्षमतेने पुरवून विशेषतः राज्याच्या मागासलेल्या भागाचे संकरित पैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्ध उत्पादन व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस उतेजन देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ ही स्वायत्त संस्था स्थापन केली आहे. सध्या मंडळामार्फत कृत्रिम रेतन कार्यासाठी लागणा-या उच्च अनुवंशिकतेच्या गोठीत रेतमात्रांशी निर्मिती, कृत्रिम रेतन केंद्रांना गोटीत रेतमात्रा पुरवठा, द्वयनत्र व अनुषंगिक साहित्याचा पुरवठा करून राज्यातील कृत्रिम रेतन सनियंत्रण करण्यात येते. राज्यातील गाई-म्हशीची उत्पादकता वाचविण्यासाठी सर्व समावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम ही राज्यस्तरीय योजना मंडळामार्फत राबविण्यात येत आहे. तसेच, केंद्र शासनाने राष्ट्रीय गोकूल मिशन व राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा या योजना राबविण्यासाठी मंडळास अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित केलेले आहे.


अकोला गैरसोयीचे


मंडळाची अकोला येथे स्वत:ची इमारत नाही तसेच, इमारत बांधावयाची झाल्यास मंडळाची कोणतीही जमिन अकोला येथे उपलब्ध नाही. केंद्र शासनाचे प्रतिनिधी, मंडळाचे अध्यक्ष, आयुक्त पशुसंवर्धन तसेच, संचालक मंडळातील इतर सदस्य यांना मंडळामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे आयोजित बैठकांना उपस्थित राहणे गैरसोयीचे होते, ही बाब समोर ठेवून हे मुख्यालय अकोल्यातून नागपुरात हलविण्यात आले.


नागपुरात सुविधा


नागपूर उपराजधानी असून, देशातील मध्यवर्ती शहर आहे. दिल्ली. मुंबई, पुणे आदी शहरातून नागपूरसाठी विमान सेवा उपलब्ध आहे. नागपूर मुख्यालयी महाराष्ट्र राज्य पशुवैदक परिषद ही शिखर संस्था, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, गोटीत रेत प्रयोगशाळा, वळू संगोपन केंद्र, मध्यवर्ती अंडी उबानी केन्द्र, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, नागपूर विभाग या संस्था कार्यालये कार्यरत आहेत.तसेच, नागपूर शहरात मडळाचे मुख्यालय बांधण्यासाठी आवश्यक ती स्वत:ची जमिन महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे सद्यस्थितीतील मुख्यालय अकोला येथून नागपूर येथे स्थलांतरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने आज शासन निर्णय निर्गमित केला आहे.



काय आहे शासन निर्णय

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे सद्य:स्थितीत अकोला येथे कार्यरत असलेले मुख्यालय जुने वळू संगोपन केंद्र, नागपूर येथे स्थलांतरित करण्यास या निर्णयद्वारे, शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. नागपूर येथे मंडळाची स्वत:ची नवीन इमारत बांधकाम करण्याच्या अनुषंगाने कालबध्द कार्यक्रम आखण्यात यावा. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची स्थापना करण्याच्या अनुषंगाने याआधीच्या कार्यप्रणालीमध्ये मंडळाच्या मुख्यालयाच्या स्थलांतरा व्यतिरिक्त इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.





टिप्पण्या