EVM:राजकारण: ईव्हीएम सोबत मतदान पत्रिकेचे गाजर दाखवून नानांचा राजीनामा - वंचित




नीलिमा शिंगणे-जगड                         अकोला: ईव्हीएम सोबत मतदान पत्रिकेचे गाजर दाखवून चर्चेत आलेल्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी मतदान पत्रिका उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता. त्यावर चर्चेचे गु-हाळ सुरू असताना आज त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देवुन कालची त्यांची घोषणा म्हणजे बोलाची कढी असल्याचे सिध्द केले असून, काँग्रेस भाजपा मध्ये तत्वीक दृष्टीने काही फरक नसल्याची असल्याची टिका वंचितचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.


स्थनिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना आता ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी परवाच दिल्या होत्या.या संबंधीचा कायदा महाराष्‍ट्र विधानमंडळाने करावा अशा प्रकारच्या सूचनाही  त्यांनी दिल्या होत्या. 


मुंबई विधानभवन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयचे सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव उपस्थित होते.ईव्हीएमसोबत मतदान पत्रिकेचा पर्याय मतदारांना उपलब्ध असला पाहिजे. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 328 प्रमाणे राज्यातील निवडणुकांच्या बाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधीमंडळाला आहेत. अनुच्छेद 328 नुसार राज्य विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार अनुषंगिक कायदा तयार करुन राज्यातील जनतेला ईव्हीम व्यतिरिक्त मतपत्रिकेने मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा. त्यावेळी मतदार आपल्या इच्छेनुसार ईव्हीएम किंवा मतपत्रिकाव्दारे मतदानाचा हक्क बजावू शकतील, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.


नानांचा हा पवित्रा ईव्हीएम बाबतच्या काँग्रेसच्या गुळगुळीत भूमिकेवर थेट आघात करणारा होता.देशात ईव्हीएम इन्ट्रोड्यूस करणाऱ्या काँग्रेसने भाजप आधी मशीन मॅनेज करण्याची सुरुवात केल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे काँग्रेसचे शिर्ष नेतृत्व सदैव ईव्हीएम विरोधात लढ्यात पुढे येत नव्हते. परवाच्या नानाच्या घोषणेनंतर राज्यात मतदान पत्रिकेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.मात्र अवघ्या एक दिवसात नानांची विधानसभा अध्यक्ष पदावरून एक्सिट पाहता त्यांची ही घोषणा सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी केलेली घोषणा होती, हे सिध्द झाले असून काँग्रेसचे नेते सदैव आपल्या 'कथनी करणी' मध्ये खरे उतरत नसल्याचा आरोप देखील वंचितने केला आहे.ईव्हीएम सोबत मतदान पत्रिका बाबत पुढे काय होणार ह्याची स्पष्टता महाराष्ट्र राज्यातील जनतेला काँग्रेसचे नेते सांगतील अशी अपेक्षा देखील राजेंद्र पातोडे यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या