Wildlife:leopard:अजब बिबट्याची गजब प्रेमकहाणी…


Strange love story of a strange leopard




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: प्रेम हे चातकाला पावसाशी होते, टपोर्‍या दव बिंदूला गवताच्या पात्याशी होते. फुलपाखराचे फुलावर जडते ,काजव्याला घनदाट अंधाराशी असतं, पतंगाचे दिव्याशी असतं…असंच काहीसं  प्रेम काटेपूर्णा अभयारण्यातील एका बिबट्याला त्याच्या सारख्याच दिसणाऱ्या बिबट्याच्या पुतळ्याशी झालं. वाचून आणि ऐकून आश्चर्य वाटलं ना...पण हे खरं आहे. कारण हा खराखुरा बिबट पुतळा बिबटशी सलगी करून मिलन करण्याचा देखील प्रयत्न करीत असल्याचे कॅमेराबद्ध (cctv) झाला आहे.



बिबट्याचा पुतळा


काटेपुर्णा अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अकोला वन्यजीव विभागाचे  विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) मनोजकुमार खैरनार यांच्या संकल्पनेतून येथे बिबट्याचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याने अनेक पर्यटकांना भुरळ घातली आहे. येथे येणारा प्रत्येक पर्यटक या पुतळ्या सोबत सेल्फी काढल्या शिवाय समोर जात नाही. या निर्जीव पुतळ्याचे आकर्षण फक्त मनुष्यालाच नाही तर वन्यप्राण्यांना देखील आहे, याचा प्रत्यय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आला आहे. 


काही दिवसांपासून काटेपुर्णा जंगलातील एक बिबट रोज रात्री येवून या बिबटची प्रतिकृती असलेल्या पुतळ्या जवळ येतो. त्याच्या जवळ बसतो. त्याच्या अंगा खांद्यावर खेळतो. एवढेच नव्हेतर या पुतळ्याशी सलगी करून मिलन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा  हा बिबट सी सी टी व्ही. बद्ध झाला आहे. हा बिबट नियमित पुतळ्याजवळ येवून बसतो. पुतळ्याशी खेळतो. यामुळे वन्यजीव विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आश्चर्य व्यक्त करीत आहे.


"हा बिबट्या नियमित येवून बिबट  पुतळ्याशी रोज भेटतो. काटेपूर्णा अभयारण्यात सध्या बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. परिसरातील नागरिकांनी  एकट्याने फिरणे टाळावे." 


बी.आर.पवार 

वनपरिक्षेत्र अधिकारी 

अकोला वन्यजीव



काटेपूर्णा अभयारण्य

काटेपूर्णा अभयारण्य विदर्भातील अकोला जिल्ह्यात आहे. मुख्यतः काटेपूर्णा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात आहे. हे जलाशय मुख्यत्वे पाणथळ पक्ष्यांना आकर्षित करते. येथील झुडुपे दक्षिणी उष्ण व कोरडे पानझडी वन असून, येथे वनस्पतींच्या ११५ प्रजाती आढळतात.  बेहडा, मोह, तेंदूपत्ता, खैर, सळई आदी वृक्ष येथे प्रामुख्याने आढळतात.



हे अभयारण्य चौशिंगी काळवीट आणि बार्किंग हरणासाठी प्रसिद्ध आहे. इतर प्राण्यांमध्ये काळे हरीण, लांडगा, बिबट्या, तडस, रानडुक्कर, नीलगाय, ससा, जंगली मांजर, माकड येथे आहेत. सामान्य गवताळ प्रदेश आणि पाणथळ पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे बघायला मिळतात. येथे पर्यटनाला गेल्यास मोर आणि लांडोरचे पर्यटकांना हमखास दर्शन होते. काटेपूर्णा  जलाशय स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना आकर्षित करते. स्थलांतर काळात अनेक विदेशी पक्षी येथे पाहायला मिळतात.


कसे जाणार काटेपूर्णाला

अकोला शहर ते काटेपूर्णा पर्यंत प्रवास करण्यासाठी अंदाजे अर्धा ते पाऊण तास लागतो. अकोला आणि काटेपूर्णा अभयारण्य मधील अंदाजे अंतर ३० किमी आहे.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा:Wildlife: leopard: Strange love story of a strange leopard






टिप्पण्या