Sportnews: एक आठवण: स्वजनांशी बंडखोरी करीत बनल्या कुस्तीगीर; महाराष्ट्रातील पहिल्या महिला वस्ताद सुनीता कडोळे यांचे निधन

A recollection: wrestlers who rebelled against their relatives;  Maharashtra's first woman Vastad Sunita Kadole passes away




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: महाराष्ट्रातील पहिल्या महिला कुस्ती वस्ताद सुनीता मोरेश्वर कडोळे यांचे गुरुवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी निमोनिया आजाराने उपचार दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती कुस्ती प्रशिक्षक मोरेश्वर कडोळे, मुलगी राष्ट्रीय कुस्तीगीर माधुरी कडोळे आहे.


आठवणीतल्या सुनीताताई

काल गुरुवारी रात्री साडे आठ नऊ वाजताच्या सुमारास मोरेश्वर कडोळे यांचा आम्हाला फोन आला. "नीलिमा मॅडम, मॅडम नाही राहिल्यात. कावीळ झाला होता" आणि जिवाच्या आकांताने रडायला सुरुवात केली. त्यांचा टाहो ऐकून आम्हाला क्षणभर काय बोलावे काहीच कळत नव्हते. त्यांचे सांत्वन केले… थोड्या वेळाने प्रसार माध्यमातील प्रतिनिधींचे फोन यायला लागले. सुनीता कडोळे यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे फोटो त्यांना पाहिजे होते. त्यांना माहिती आणि फोटो उपलब्ध करून दिली. तशी तोंडपाठच होती, कारण सुनीताताईंच्या प्रत्येक यशाचे साक्षीदार क्रीडा पत्रकार म्हणून आम्ही होतो. सुनीताताईंचे कार्य प्रकाशझोतात आणण्याचे भाग्य आम्हाला लाभले, यातच आमची धन्यता. ज्या प्रांतात स्त्रियांना आजही दुय्यम स्थान दिल्या जाते, तेथे सुनीताताईंनी दोन दशकापूर्वी स्वजनांशी बंडखोरी करून, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकले होते. मात्र, प्रसिद्धी पासून त्या कोसो दूर होत्या... 


पती मोरेश्वर यांची सक्षम साथ


लाल मातीतला क्रीडाप्रकार असणाऱ्या कुस्तीवर तशी पुरुषांचीच मक्तेदारी. त्यामुळे सामान्य घरातील स्त्रीने कुस्ती खेळणे तर दूरच, पाहणेही समाज बंधनामुळे अवघड. परंतू, अकोल्यातील सुनिता कडोळे या सामान्य महिलेने कुस्ती शिकण्याचे आणि खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांना त्यांच्या घरातील लोक आणि नातेवाईक यांचा सुरवातीला विरोध सहन करावा लागला. शेजाऱ्यांचे टोमणे ऐकावे लागले. मात्र, या स्वप्नाला पती मोरेश्वर कडोळे यांनी बळ दिले. कुस्तीचे धडे दिले. ज्यांनी त्यांना सुरुवातीला नावे ठेवली;त्यांनीच त्यांच्या सत्कारासाठी पुढे फुलहार आणली. सुनिताताईंनी जवाहरनगर भागात भाजीपाल्याचे दुकान चालवून आपला कुस्तीचा छंद जोपासला. तुटपुंज्या मिळकतीतही सुनिताताई यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या मुलीसोबत कुस्तीचे फड गाजविले. परिस्थिती बेताची असूनही सुनीताताई यांनी पतीच्या सहकार्याने अकोला सारख्या शहरात मुलींना कुस्तीचे धडे द्यायला प्रारंभ केला. सुरुवातीला पालक देखील आपल्या मुलींना कुस्ती शिकण्यास पाठवत नव्हते. कुस्ती म्हणजे मुलांचीच, असा समज आजही कायम आहे. परंतु कडोळे दाम्पत्यनी आपल्या मुलीला देखील या खेळात उतरविले. आज त्यांच्या छोट्या चिमुकल्या नाती देखील कुस्तीचे धडे गिरवीत आहेत. सुनीता ताईच्या तालमीत तयार झालेल्या अनेक मुलींनी विभाग, राज्य आणि देश पातळीवर नावलौकीक केले. तर काहींना नोकरी देखील कुस्ती मुळे प्राप्त झाली.



सुनिताताई यांचा दिनक्रम


सकाळी त्या मैदानावर मुलींना कुस्तीचे धडे देतांना वस्ताद सुनीता दिसत होत्या. त्यानंतर सकाळी घरी आल्या नंतर घरची कामे करणाऱ्या गृहिणीच्या रुपात त्या दिसत होत्या.अन त्यानंतर जवाहरनगर चौकातील भाजीपाल्याच्या दुकानावर भाजीपाला विकणारी उद्यमशील महिला अन संध्याकाळी पुन्हा कुस्तीच्या मैदानावर सराव करणारी कुस्तीगीर आणि प्रशिक्षक महिला… अशी सुनीता ताईंची दिनचर्या होती. यात मागीलवर्षी पर्यंत खंड पडला नव्हता. मात्र, सुनीताताईंचा सालस,लाघवी, हुशार असलेला मुलगा शुभम कडोळे याने पिकेव्ही परिसरात आत्महत्या केली, या दुर्दैवी घटनेने सुनीता ताई खचून गेल्या होत्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील कडोळे दाम्पत्याने शुभमला अभियंत्रिकेचे उच्च शिक्षण दिले. पुणे,कोल्हापूर येथे कुस्ती प्रशिक्षण देखील त्याला दिले. परिस्थितीची जाणीव ठेवून शुभमने देखील अभ्यासासोबतच कुस्तीतही प्रावीण्य मिळविले होते. मात्र,एका उगवत्या ताऱ्याचा अकाली अस्त झाला. या दुःखातून त्या मनातून सावरू शकल्या नाहीत. मात्र, नवोदित मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी मनावर दगड ठेवून,त्यांनी प्रशिक्षण केंद्रात जाण्यास सुरवात केली. मात्र, कोविड-१९ लॉकडाऊन मुळे मार्च पासून प्रशिक्षण केंद्र बंद असल्याने त्यांचा सराव देखील थांबला होता. दरम्यान,त्यांना कावीळ आणि निमोनियाने ग्रासले यातच त्यांची काल प्राणज्योत मालवली. आयुष्याच्या मध्यावर अवघ्या पन्नाशीकडे प्रवास करीत असलेल्या सुनिताताई जीवनाच्या कुस्ती आखाड्यात पराभूत झाल्या.


लग्नानंतर कुस्ती खेळ शिकल्या

सुनिताताई यांचे माहेर मध्यप्रदेशातील इंदौरचे. १९९१ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर पतीला असणारी कुस्तीची आवड हळू-हळू सुनिता यांच्यातही निर्माण झाली. पतीच्या मार्गदर्शनात सुनिता यांचा कुस्ती शिकण्याचा प्रवास सुरु झाला. मात्र यातही समाज आणि नातेवाईकांचा मोठा विरोध होताच. सुनिता यांचे पती मोरेश्वर यांना बालपणापासूनच कुस्तीचे प्रचंड वेड. घरची परिस्थिती जेमतेम असतांनाच मोरेश्वर यांची कुस्ती बहरत होती. त्यातूनच मग त्यांनी विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या कुस्तीचा ठसा उमटवत 'पैलवान' अशी ओळखही मिळवली. मात्र त्यांची कुस्ती प्रेमाची खरी परीक्षा होती ती लग्नानंतर. कुस्तीबद्दल आपुलकी असणाऱ्या त्यांच्या पत्नीला त्यांनी कुस्ती शिकविण्याचा आणि कुस्ती खेळविण्याचा निर्णय घेतला होता खरा. मात्र, त्यांच्या या निर्णयाला घरातील आणि समाजातील अनेकांचा मोठा विरोध होता. मात्र समाज विरोधाची तमा न बाळगता मोरेश्वर यांनी आपल्या पत्नीला कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. मोरेश्वर यांचे वास्तद त्र्यंबक दादा शिरसाट यांच्याकडे सुनीताताई मोरेश्वर यांच्या सोबत कुस्तीचे धडे गिरवण्यास यायच्या. जवाहरनगर भागातून जुने शहरातील भीमनगर आखाडा स्वतः सायकल चालवित येत होत्या. त्याकाळात याचे देखील लोकांना अप्रूप होते.



पुढे या दाम्पत्याला दोन मुले झाली. सुनिताताई यांची कुस्ती देखील या काळातही बहरली. आपल्या पतीच्या समर्थ पाठींब्यामुळे सुनिताताई यांना कुस्तीपटू अशी ओळख मिळत गेली. अन मोरेश्वर यांनाही पुढे कुस्तीपटू सुनिताताई यांचा पती असे अभिमानाने ओळखले जाऊ लागले.यानंतर समाजानेही सुनिता यांना कुस्ती प्रशिक्षक म्हणून मान्यता द्यायला सुरुवात केली. मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देता यावे म्हणून २००७ मध्ये सुनिता यांनी 'मोरेश्वर महिला कुस्ती संस्था' स्थापन केली. सध्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे अकोला आणि परिसरातील चाळीसवर मुली कुस्तीचे धडे घेताहेत. यातील अनेक मुलींनी आता विभाग, राज्य आणि देश पातळीवर कुस्तीमध्ये नावलौकिक करीत पदकांची लयलूट केली.



मायलेकींचे कौतूक


२००७ मध्ये सुनिताताईंनी आपली मुलगी माधुरी हिला कुस्तीच्या आखाड्यात उतरविले. माधुरीने हिने देखील २००७ मध्ये झालेल्या 'विदर्भ केसरी' स्पर्धेत रजत पदक जिंकत आपली छाप पडली. तर २००९ आणि २०१० मध्ये माधुरीनेही 'विदर्भ केसरी' स्पर्धेत सलग दोन वर्ष सुवर्ण पदक मिळविले. या माय-लेकीच्या जोडीने अनेक विविध गटांतील अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये सोबत सहभाग घेतल्याने  अनेकांनी या माय-लेकीचे कौतूक केले . सन २००९ आणि २०१० मध्ये झालेल्या 'विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेत' सुनीता ताईंनी सलग दोन वर्ष सुवर्णपदकं मिळविली. याशिवाय सात वेळा महाराष्ट्र पातळीवर महिला कुस्तीमध्ये प्रतिनिधित्व केले. अहमदनगर येथे झालेल्या 'खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत' सहभाग नोंदविला. यानंतरही अनेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली.नंतर यांच्या शिष्यांनी देखील सुनीताताईंचे नाव राज्याबाहेरही पोहचविले. विविध ठिकाणी सुनीताताईंचे सत्कार व्हायला लागले.अनेक पुरस्कारांवर त्यांचे नाव कोरल्या गेले.



प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक काम करीत महिलांनी आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीला हादरे दिले. सुनीताताई यांच्या सारख्या असामान्य महिलांनी उभे केलेले हे गगनभेदी कार्य फक्त सकारात्मक अन सृजनात्मक नव्हे तर त्यातून नव्या आणि एका सशक्त समाजाच्या निर्मितीची चळवळही गतिमान झाली आहे, एवढे मात्र निश्चित. सुनीताताई यांचे कार्य महाराष्ट्र महिला कुस्ती क्षेत्रासाठी सदैव प्रेरणादायी ठरणार आहे.


       लेखन: ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

                                 महाराष्ट्र  

                           



टीप: लेख जास्तीत जास्त क्रीडाप्रेमीपर्यंत पोहचविण्यासाठी share करा. Copy/paste करू नये. 


©®भारतीयअलंकारnews24

टिप्पण्या