Rupnath maharaj: दहीहंडा येथील श्री रुपनाथ महाराज मंदिरात ३२१ किलोची घंटा निनादणार...




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अकोट तालुक्यातील दहीहंडा येथील श्री रूपनाथ महाराज संस्थान येथे उत्तर प्रदेश येथील जलेसर येथून ३२१ किलोग्रामची घंटा जलेसर वरून निघाली आहे. ही घंटा ३० डिसेंबर रोजी अकोल्याकडे रवाना झाली असून, दोन - तीन दिवसात दहीहंडा येथे पोहचणार,अशी माहिती जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेश पोटे यांनी भारतीय अलंकार सोबत संवाद साधताना दिली.



३२१ किलोची घंटा 


या घंट्या मध्ये ३० टक्के कासे आहे तसेच ७० टक्के तांबा पितळ आहे व जास्त सुद्धा यामध्ये आहे या घंटे मधून ओम (ॐ) चा ध्वनि निघतो. याचा प्रतिध्वनी दूरवर ऐकू येतो. तसेच ही घंटा पावणे चार फुट उंच आहे. याचा परिघ पावणे तीन फूट आहे. रूप नाथ संस्थांनी घंटाकरिता येलर चेन्नई मदुराई रामेश्वरम इत्यादी ठिकाणी पाहणी केली. शेवटी उत्तरप्रदेश मधून घंटा बनवण्याचे देवस्थानंनी ठरविले. त्यानुसार घंटा मंदिरामध्ये येणार आहे. या घंटाची किंमत साडेतीन लाख रुपयापर्यंत आहे.उत्तर प्रदेशातून निघालेली ही घंटा अकोल्यात पोहचेपर्यंत अंदाजे पाच दिवस लागतात.



मंदिराची आख्यायिका


श्री रूपनाथ संस्थान हे पाचशे वर्ष जुने आहे. याठिकाणी श्री रूपनाथ महाराज अचानक प्रगट झाले, आणि त्यांनी या ठिकाणी विविध चमत्कार घडविले. त्यांचे मित्र गरीब शहा हे होते. गरीब शहा फकीर होते. त्यांचे आणि महाराजांचे अतिशय घनिष्ठ व मित्रत्वाचे संबंध होते. एक दिवस गरीब शहा यांनी महाराजांची गंमत करावी म्हणून गोमांसाचे ताट आणले. लगेच महाराजांनी गरीब शहा यांना सांगितले की, तू ते उघड. उघडता बरोबर ताटामध्ये मोगऱ्याचे फुले झाले. तसेच रूपनाथ महाराजांनी काशी वरून पाच शिवलिंग आणले. त्यापैकी एक भंगले, म्हणून ते पूर्ण मध्ये विसर्जन केले. सध्या गावांमध्ये महाराजांनी आणलेले चार शिवलिंग स्थापित असून, त्यांचे मंदिरे सुद्धा उभारलेले आहे. मंदिराकडे ७८ एकर जमीन असून, गावामध्ये खूप साऱ्या जागा आहेत. 


अन महाराज प्रगटले!


श्री रुपनाथ महाराज यांना महादेवाचा अवतार मानतात. महाराजांनी काशीला जाऊन जलसमाधी घेतली होती. त्यावेळी गावातील लोक देखील काशीला गेले होते. जलसमाधी घेतल्यानंतर गावातील लोक जेव्हा दहीहंड्याला वापस आले. त्यावेळेस रूपनाथ महाराज त्या ठिकाणी विराजमान असलेले दिसले. आश्चर्यचकित होवून लोकांनी त्यांना प्रश्न केला की, "महाराज आपण काशीला जलसमाधी घेतली परंतू, या ठिकाणी आपण कसे काय?". यावर रूपनाथ महाराजांनी सांगितले की, "मी इथेच आहे. आपण आवाज द्या मी आपल्या सेवेत हजर आहे," अश्या महाराजांच्या अदभूत लीला जुन्या पिढीतले लोक आजही सांगतात.



यात्रा महोत्सव


श्री रुपनाथ यात्रा महोत्सव दहीहंडा येथे दरवर्षी भव्यदिव्य साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या सवाटात यात्रा भरली नाही.या यात्रेत पंचक्रोशीतील लोक हिरीरीने सहभागी होतात. तसेच महाराजांचे भक्त, अनुयायी देशभरातून यात्रेच्या दिवशी दहीहंडा येथे हजर होत असतात. महाशिवरात्री येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच रथयात्रा आणि दहीहंडी हे दोन प्रमुख उत्सव गावकरी उत्स्फूर्त साजरे करतात.या उत्सवासाठी चाकरमानी आणि माहेरवासीनी आवर्जून गावात येतात. अकोला शहरापासून जवळपास ३५ किलो मीटर अंतरावर दहीहंडा गाव आहे. गावात पोहोचण्यासाठी खाजगी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे.  


टिप्पण्या