Rupnaath maharaj: रुपनाथ महाराज संस्थान ठरणार भारतातील दुसरे भव्य घंटा असणारे मंदिर;भव्य घंटाचे अकोल्यात आगमन

Rupnath Maharaj Sansthan will be the second grand bell temple in India



भारतीय अलंकार

अकोला : पश्चिम विदर्भातील देवस्थानात अकोला तालुक्यातील दहिहांडा येथील श्रीक्षेत्र रुपनाथ महाराज संस्थान असून, या संस्थान मध्ये भारतात आकार व वजनात क्रमांक दोनची असणारी देवळातील घंटा स्थापित होत असून, या निमित्ताने हे संस्थान भारतातील दुसरे भव्य घंटा असणारे मंदिर ठरणार असल्याची माहिती रुपनाथ महाराज संस्थान दहिहांडाचे गणेश पोटे यांनी दिली. 



शासकीय विश्रामगृहात सोमवारी देवस्थानच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थानच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे दहिहांडा येथील रुपनाथ महाराज संस्थान हे एक अत्यंत जागृत असे देवस्थान आहे. अनेक उपक्रम सातत्याने आयोजित करीत असते. 

यावेळी संस्थानच्या वतीने उत्तरप्रदेश येथील जनेश्वर येथून चांदी, जस्त साउंड पावडर, कासे, तांबे आदी धातूंनी बनविलेली  तब्बल ३२१ किलो वजनाची भव्य घंटा स्थापित करण्याचा उपक्रम साकार करण्यात येत आहे. अयोध्येत असणारी ६२१ किलो वजनाची घंटा ही प्रथम क्रमांकाची भारतात असून, यानंतर रुपनाथ महाराज संस्थानची ३२१ किलोची घंटा ही राष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची घंटा असणार आहे. या घंटेच्या निर्मितीला ३ लाख ५० हजार रुपये खर्च लागला असल्याची माहिती पोटे यांनी यावेळी दिली. 



या अजस्त्र घंटेची किमया म्हणजे या घंटेमधून ओंकार हा ध्वनी निर्माण होऊन तो तब्बल ३ किमी पर्यंत ऐकू येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महानगरातून ही घंटा थेट रुपनाथ महाराज संस्थानमध्ये नेण्यात येत असून, तेथे आरती व पुजा अर्चनेने या घंट्याची स्थापना करण्यात येणार आहे. दहिहांडा येथील रुपनाथ महाराज संस्थानच्या वार्षिक यात्रेची जिल्ह्यात सर्वदूर ख्याती असून, महाशिवरात्री नंतर तिसऱ्या दिवशी भरत असते. तेव्हा रुपनाथ महाराजांचा यात्रा उत्सव होऊन हजारोच्या गर्दीत भव्य मिरवणूक काढण्यात येऊन ६० पोत्यांचा भंडारा हे या यात्रेचे वैशिष्ट असते. मात्र, या करोना संकटात शासनाच्या निर्देशाचे पालन करीत मर्यादित स्वरूपात वार्षिक यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 


यावेळी उपस्थितांना घंटेचे प्रात्यक्षिक पोटे यांनी दाखवित जिल्ह्यातील भक्तांनी संस्थान मध्ये उपस्थित राहून, या भव्य दिव्य घंटेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी आशिष मगर, प्यारेलाल जयस्वाल आदी उपस्थित होते.


हे सुध्दा वाचा: दहीहंडा येथील श्री रुपनाथ महाराज मंदिरात ३२१ किलोची घंटा निनादणार...

टिप्पण्या