Road accident: उपचारार्थ अकोल्यात येत असलेल्या दोन कुटुंबावर काळाने घाला घातला; भीषण अपघात तीन ठार, पाच गंभीर जखमी

Road accident: Two families coming to Akola for treatment were attacked by time;  Three killed, five seriously injured in road mishap




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: पातुर महामार्गावरील चिखलगाव कापशी दरम्यान आज शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास दोन वाहनांची भीषण टक्कर झाली. यामध्ये तीन जागीच ठार झाले. तर पाच गंभीर जखमी झाले. जखमींना अकोला येथे हे उपचारार्थ भरती करण्यात आले. एक कुटुंब आपल्या नातीच्या तर दुसरे आपल्या आईच्या उपचारासाठी अकोल्यात येत होते. मात्र, आजी आणि मुलाला अपघातात जीव गमवावा लागला. वंजारे आणि कुर्हे कुटुंबावर काळाने घाला घालून दुःखाचा डोंगर त्यांच्या समोर उभा केला. तर  अपघातग्रस्त गाडीचे मालक सुदैवाने  यातून वाचले. मात्र, चालक असलेल्या त्यांच्या मित्राला या भीषण अपघातात प्राणाला मुकावे लागले. या घटनेमुळे कळंबेश्वर गावात दुःखाचे सावट पसरले आहे. 


अशी घडली घटना

शेजारी राहणारे दोन कुटुंब अकोला येथे उपचारासाठी सकाळी नऊ वाजता mh37v5381 महिंद्रा सुप्रो या प्रवासी वाहनाने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावा जवळील कळंबेश्वर येथून निघाले होते. मात्र, सकाळी ११ वाजता चिखलगाव कापशी दरम्यान अकोला कडून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा 407 गाडी क्रमांक mh30L2996 ची प्रवासी वाहन महिंद्रा सुप्रो mh 37 v5381 समोरासमोर धडक झाली. यामध्ये प्रवासी वाहनाचा चालक संजय निवृत्ती राऊत वय 45 वर्ष राहणार मुंगळा, बाळू बळीराम कुर्हे वय 35 वर्ष राहणार कळंबेश्वर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम, लक्ष्मीबाई रामभाऊ वंजारे वय 55 वर्ष राहणार कळंबेश्वर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. याच प्रवासी वाहनातील ज्ञानेश्वर रामभाऊ वंजारे वय सत्तावीस वर्ष, रामभाऊ गोविंदा वंजारे वय 58 वर्ष , दगडाबाई बळीराम कुर्हे वय 65 वर्ष , गायत्री ज्ञानेश्वर वंजारे वय दोन वर्ष , भागवत बळीराम कुर्हे वय 32 वर्ष सर्व राहणार कळंबेश्वर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हे सर्व अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोल्याच्या एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. यातील काही जण अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.


अन अवघ्या १५ मिनिटाच्या अंतरावर अपघात!

मुंगळा येथून नामदेव चतरकार प्रवासी वाहनाचे मालक स्वतः गाडी चालवत येत होते. त्यांना शिरला येथील मित्राला भेटावयाचे असल्यामुळे त्यांच्या मागून त्यांचाच मित्र असलेला ड्रायव्हर संजय निवृत्ती राऊत (मृतक) मोटर सायकल चालवत येत होता. शिर्ला येथे चतरकर यांनी वाहन थांबून संजय राऊत यांच्या ताब्यात दिले आणि अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर प्रवासी वाहनाला गंभीर अपघात झाला. शिर्ला येथे शामराव नामदेव चतरकार उतरल्यामुळे सुदैवाने बचावले.


उपचारार्थ निघालेल्या परिवारावर दुःखाचा डोंगर


गायत्री ज्ञानेश्वर वंजारे या दोन वर्षाच्या मुलीच्या उपचारार्थ तिचे बाबा ज्ञानेश्वर वंजारे, आजोबा रामभाऊ वंजारे आणि आजी लक्ष्मीबाई वंजारे अकोला येथे जात होते. त्याबरोबर त्यांच्या शेजारी राहणारे दगडाबाई कुर्हे यांच्या उपचारार्थ बाळू बळीराम कुर्हे व भागवत कुर्हे जात होते. गायत्रीच्या आजीचा मृत्यू झाला. तर दगडाबाई कुर्हे यांच्या मुलाचा मृत्यू या अपघातात झाला. त्यामुळे उपचारार्थ निघालेल्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.




तपे हनुमान मंडळाचे युवक धावले मदतीला

अपघात झाल्याचे कळताच चिखलगाव येथील तपे हनुमान मंडळाचे युवक गोपाल काकड, अतुल सपकाळ, सागर चांदुरकर, महादेव कुवारे, विकी शेगोकार, अभिषेक ढगे, विकी तायडे, सुनील ढगे, मंगेश चांदुरकर, प्रतिक बळवंतकार, सुरेश ठाकरे, साबीर शेख, दुले खान युसूफ खान यांनी अपघातातील जखमींना तातडीने दवाखान्यात पाठवले. त्यामुळे आठ पैकी पाच जणांचे प्राण वाचले. जखमींवर  उपचार सुरू आहेत.



घटनेची माहिती मिळताच पातुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी मार्गदर्शनात पीएसआय अमोल गोरे, पोलीस नाईक पंजाबराव चराटे, हेड कॉन्स्टेबल अर्जुन दुतोंडे, वाहन चालक जगदीश शिंदे  तातडीने घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या