New year 2021: Sunday story: अकोल्यातील तीन दिव्यांगानी कळसुबाई वर तिरंगा फडकावित केले नववर्षाचे स्वागत

             Sunday Story

  ✍️ॲड. नीलिमा शिंगणे-जगड


New year 2021: Sunday story: Three handicappe from Akola hoist tricolor on Kalsubai to welcome New Year



भारतीय अलंकार news24

अकोला: महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वोच्च आणि खडतर शिखर चढाई करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. पण हे स्वप्न प्रत्येकाचेच पूर्ण होतेच असे नाही. सामान्य माणसालाही हे दिव्य पार करणे खूपच अवघड असते. मात्र, अकोल्यातील तीन दिव्यांग युवकांनी हे धाडस करून कळसुबाई शिखर आपल्या जिद्दीच्या बळावर गाठून, इतरांसाठी प्रेरणादायी कार्य केले.



शिवऊर्जा प्रतिष्ठान,औरंगाबाद यांच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी कळसुबाई शिखर सर करण्यासाठी एक मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेमुळे अनोखे सामर्थ्य असणाऱ्या दिव्यांगांना एक ऊर्जा मिळते. या मोहिम मध्ये अकोला जिल्ह्यातील तीन दिव्यांगांनी सक्रिय सहभाग घेतला होता.


महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकार संघटना, मुंबई ,शाखा अकोलाचे जिल्हा संघटक, दिव्यांग क्रीडा मार्गदर्शक तथा आंतराष्ट्रीय खेळाडू सुनील भाऊराव वानखडे (उरळ ,बु ता. बाळापूर), सचिन मनोहर मानकर (अकोला) व पलश सुभाष यादव (अकोला) असे या असामान्य कर्तृत्व असलेल्या तीन दिव्यांग खेळाडू तथा गिर्यारोहकांची नावे. 



अशी केली मोहीम फत्ते


महाराष्ट्रातील  जवळपास ७० दिव्यांग या मोहिमेत सहभागी झाले होते. सर्वप्रथम ३१ डिसेंबर रोजी कळसुबाईच्या पायथ्याशी जहांगीरदारवाडी या गावात मचू खाडे याच्या घरी सर्व दिव्यांग एकत्र आले.दुपार नंतर कळसुबाई शिखर चढाईला सुरुवात करण्यात आली. " शिवाजी महाराज की जय", "कळसुबाई माते की जय" अश्या घोषणा देत, सर्व दिव्यांगांनी एकमेकांना आधार देत सायंकाळी ७ वाजेपर्यंत कळसुबाई शिखर माथा गाठला. रात्री  थंडीत तंबूत मुक्काम ठोकून १ जानेवारी २०२१ रोजी पहाटेच कळसुबाई मातेचे दर्शन घेतले. यानंतर नवी ऊर्जा देणाऱ्या उगवत्या सूर्याचे दर्शन घेवून सर्वांनी नवीन  वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. एक नवी ऊर्जा, नवा आत्मविश्वास, नवे संकल्प घेत  सकाळी १० वाजता शिखरावरून उतरण्यास सुरवात केली. चढणे जेवढे कठीण, तेवढे उतरणे सोपे असते. मात्र, दिव्यांगांना उतरंडीचे रस्तेही कठीण असतात. परंतू, अवघ्या तीन तासात म्हणजेच १ वाजता जहागिरवाडी गाव या दिव्यांगांनी गाठले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, साहस आणि शिखर चढून अधिक बळावलेला आत्मविश्वास झळकत होता, शिखर चढ आणि उतार करतानाचे अनुभव सुनील वानखेडे यांनी भारतीय अलंकार सोबत शेअर केलेत.


गिर्यारोहकांचा गौरव

या मोहिमेत सहभागी सर्व दिव्यांगाना प्रतिष्ठानातर्फे प्रमाणपत्र व पदक प्रदान करून गौरविण्यात आले. या यशस्वी चढाई नंतर तीन दिव्यांग गिर्यारोहकांकडून प्रेरणा घेवून, अकोला जिल्ह्यातील दिव्यांगच नव्हेतर सामान्य युवा देखील गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकाराकडे  वळतील. येत्या काळात अकोला जिल्ह्यांतूनही गिर्यारोहक वाढतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनील वानखडे यांनी भारतीय अलंकार जवळ व्यक्त केला.


टिप्पण्या