- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Jijau's birth place:माँ साहेब जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजाच्या विकासासाठी जाहीर आराखड्यासाठी निधी द्यावा-रामेश्वर पवळ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज राजमाता जिजाऊ जन्मदिन (तारखेप्रमाणे)
Maa Saheb Jijau's birthplace Sindkhedraja's development should be funded for the public plan - Rameshwar Paval
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला:भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने १२ जानेवारी २०१५ ला माँ साहेब जिजाऊंच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सिंदखेडराजा विकास आराखड्याची घोषणा केली होती. या घोषणेला सहा वर्षे पूर्ण होत आहे. पण, निर्धारित ११२ कोटी रुपयांपैकी विकासासाठी केवळ दीड कोटी रुपये नियोजन विभागाला देण्यात आले. दोन वर्षांत या आराखड्यातील कामे पूर्ण होणार असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज पहिल्या टप्प्यातीलच कामे अपूर्ण आहेत. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. माँ जिजाऊंचे हे स्थळ विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष देतील, अशी तमाम शिवप्रेमींची अपेक्षा आहे. तसे अभिवचनही नागपुरात २०१९ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देण्यात आले होते. पुरातत्त्व विभागाच्या प्रस्तावानुसार आता ३ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीसाठी पर्यटन मंत्रालयाकडे नव्याने मागणी करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करून तत्काळ सिंदखेडराजाच्या विकासासाठी सकारात्मक पाऊले उचलावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश संघटक रामेश्वर पवळ यांनी व्यक्त केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पवळ यांनी पाठविले आहे.
माँ साहेब जिजाऊंचे जन्मस्थळ
File photo
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे माँ साहेब जिजाऊंचे जन्मस्थळ. येथील भूईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली त्यांचा जन्म झाला. आकर्षक आणि तितकाच भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेडराजात मुंबई-नागपूर महामार्गाला लागून आहे. आज पर्यटनस्थळ म्हणून या स्थळाकडे पाहिले जाते. इथे आलेल्या प्रत्येकाच्या मनात एक सकारात्मक भाव निर्माण होतो. बुलडाणेकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे स्थळ ऊर्जेने ओतप्रोत भरलेले आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंदखेडराजा विकास आराखड्याची घोषणा केली होती. दोनशे कोटींची कात्री लागल्यानंतर ११२ कोटींचा हा आराखडा मंजूर झाला. २५ कोटींच्या पहिल्या टप्प्यातील कामांना शिखर समितीने मान्यता दिली. त्यातील १२.९६ कोटींच्या आराखड्यातील पाच कामांना पुरातत्व विभागाच्या (नागपूर) सहाय्यक संचालकांच्या अख्त्यारित मंजुरीही मिळाली. यामध्ये प्रामुख्याने राजे लखुजीराजे भोसले यांचा राजवाडा, नीलकंठेश्वर मंदिर, रंगमहाल व सावकारवाडा, काळाकोट या कामांचा समावेश होता. साडेसात कोटी रुपयांची कामेही सुरू झाली. राज्य पुरातत्व विभागाने नीळकंठेश्वर मंदिर परिसरात दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र १२ पैकी दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. हा निधी कोणत्या खात्यात ठेवायचा यावरून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. नंतर निधीही मिळाला नाही. परिणामी अजूनही पहिल्या टप्प्यातील कामे अपूर्ण आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब….
शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेसच्या महाविकास आघाडीनंतर राज्यात ठाकरे सरकार अस्तिवात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजधानी असलेल्या रायगडासाठी आपण २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला आपण निर्णय घेतला. त्याच छत्रपती शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देवून घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मभूमीसाठी घोषित विकास आराखड्याला गती देण्यासाठी आपण व्यक्तिगत लक्ष देण्याची गरज आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशन दरम्यान बैठक घेऊन अधिकाऱ्यांना तशा सूचना सुद्धा दिल्या होत्या. मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन जाहीर झाला. केंद्र, राज्य सरकारने अनेक योजना रद्द अथवा थांबविल्या. व्यवहार बंदचा फटका सगळ्या गोष्टींना बसला. मातृतीर्थ सिंदखेडराजा विकास आराखडाही यातून सुटला नाही. नव्या वर्षात आराखड्याला निधी मिळावा, अशी आम्हा जिजाऊ माँ साहेब, शिवप्रेमी तसेच बुलडाणेकरांना अपेक्षा आहे.
मंजुरीचा प्रवास…
File photo
क्रिएटिव्ह सर्कल नागपूर या तज्ज्ञ संस्थेने विस्तृत, असा बृहत विकास आराखडा तयार केला होता. ३११ कोटींच्या सुरुवातीच्या नियोजित आराखड्याला २०० कोटींची कात्री लागल्यावर ११२ कोटींचा विकास आराखडा घोषित झाला. विशेष म्हणजे, ३१ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये बैठकीतील हा निर्णय जीआरमध्ये रुपांतरितही झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी तज्ज्ञ समन्वय संस्थेवर आराखडा कागदावर उतरण्याची जबाबदारी दिली होती. सुरुवातीला २५० कोटींच्या विकासकामांचे नियोजन करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीने २८ सप्टेंबर २०१५ च्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ३११ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता दिली. तेथून मंत्रालयीनस्तरावर वर्षभर ही फाइल पडून होती. ४ जून २०१५ रोजी शिखर समिती गठीत करण्यात आली. त्यानंतर ३ ऑक्टोबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिखर बैठकीत नव्याने ११२ कोटी ४६ लाख रुपयांच्या सुधारित सिंदखेडराजा विकास आराखड्याची घोषणा झाली. यातील २५ कोटींचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढील टप्प्यातील कामांना सुरुवात करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. १२ कोटी ९६ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. जुलै २०१८मध्ये कार्यारंभ आदेश निघाले. कामे अजूनही अपूर्ण आहेत. महाविकास आघाडी सरकार ही नक्की पूर्ण करणार असा विश्वास रामेश्वर पवळ यांनी व्यक्त केला आहे.
रामेश्वर पवळ, माजी प्रदेश संघटक,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा