Gajanan Maharaj:Akola:श्री गजानन महाराज यांनी सुरू केलेली मुंडगावची यात्रा…

Shri Jamsingh is the founder of Shri Gajanan Maharaj Paduka Sansthan Mundgaon.



श्रींचे जेष्ठ भक्त झामसिंग महाराज

श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावचे संस्थापक श्री झामसिंग राजपूत शेखावत उर्फ दादाजी हे त्या काळातील सर्व सुखसोयींनी संपन्न असे गृहस्थ होते. गावात ३१ एकर शेती व गावात मावद माडीचा वाडा होता. अतिशय तापट स्वभावाच्या झामसिंगाचा गावात बराच दरारा होता. 



विजय ग्रंथात उल्लेख

अशा भक्ताचा श्री गजानन विजय ग्रंथामध्ये अध्याय १६,१८मध्ये उल्लेख आलेला आहे. श्रींचा भक्तांमध्ये वयाने ज्येष्ठ असे होते. त्यांच्या माध्यमाने नंतर अनेक भक्त महाराजांशी जुळले. श्री गजानन महाराजांची झामसिंगावर विशेष कृपा होती. हे मुंडगावातील सर्व लोकांना माहीत होते. झामसिंगाला रानिका नावाची अडगावला एक बहिण होती.  तिचा मुलगा निरुसिंग म्हणजे झामसिंगाचा भाचा हा श्री झामसिंग राजपूत यांच्या माध्यमातून महाराजांचा भक्त झाला. श्री झामसिंगांनी महाराजांना हनुमान जयंती उत्सवाला अडगावला निरुसिंगाच्या घरी आमंत्रित केले. महाराज श्री भास्कर पाटील व इतर शिष्यासहीत या उत्सवाला आले.


अश्या स्थापन झाल्या चरण पादुका


त्यापुर्वी १९०६ ला श्रीगजानन महाराजांनी पुंडलिक महाराज भोकरे यांच्या स्वप्नात दृष्टांत दिलेल्या प्रसादिक चरण पादुका प्रत्यक्ष श्री झामसिंग यांच्याकडे पुंडलिक महाराज यांना देण्यासाठी पाठवल्या परंतु पर्याप्त जागा नसल्याने पादुका सुरक्षित रहाव्यात तसेच सर्व भक्तांना दर्शन करता यावे, म्हणून झामसिंग यांनी स्वताचा वाडा व शेती दान करण्याचा संकल्प केला व नंतर  ४ फेब्रुवारी १९१० रोजी दानपत्र केले व श्री गजानन महाराज यांनी श्री झामसिंग यांना दिलेल्या चरण पादुका व पुंडलिक महाराज यांना दिलेल्या पादुकांची स्थापना केली. श्री झामसिंग हे श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावचे संस्थापक आहेत. 


संत गजानन महाराज यांचे मुंडगावला आगमन

                                      संग्रहित चित्र


श्री झामसिंगानी गजानन महाराज यांना मुंडगावला येण्याचा आग्रह केला. महाराज झामसिंगाच्या भक्तीवर प्रसन्न होते. सहसा वैभव व वैराग्य दृष्टीस पडत नाही. आणि जेथे असे सच्चे वैराग्य आहे, भक्तीभाव व प्रेम आहे तिथे महाराजांनी जाण्याचे नाकारणे शक्य नव्हते. १६ जानेवारी १९०८ गुरुवार रोजी महाराज मुंडगावला आले. गजानन  महाराजांची भजनी दिंड्या सहित रथात बसून मिरवणूक काढली. झामसिंगानी दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीला महाप्रसादाचे आयोजन केले. परंतू, महाराजांनी चतुर्दशी आहे महाप्रसाद करू नका, असे सांगितले. परंतू, याकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले.  ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले. परंतू, क्षणात मुसळधार पाऊस, वारा, वादळ सुटले सर्वांना आपली चुक कळली. सर्वांनी महाराजांची क्षमा मागितली. तेव्हा महाराजांनी आकाशाकडे पाहिले सर्व वातावरण शांत झाले. 


असा सुरू झाला पौष पौर्णिमा महोत्सव


महाराजांनी दुसऱ्या दिवशी १८ जानेवारी १९०८ शनिवार रोजी पौर्णिमेला महाप्रसाद करा, असे सांगितले त्यादिवशी महाराजांच्या उपस्थितीत भंडारा झाला तीच प्रथा आजही सुरू आहे. तिथी प्रमाणे दरवर्षी पौष पोर्णिमेला श्री गजानन महाराज पादुका संस्थान मूंडगाव येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. (कोरोना संकटात यावर्षी महाप्रसादाचे स्वरुप छोटेखानी झालं ) संस्थांच्या वतीने पौष पौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येतो. महोत्सवात विविध धार्मिक, अध्यात्मिक,सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 


झामसिंग महाराजांचे देहवसन

झामसिंगानी आपल्या वाड्यातील पादुका मंदिरात महाराजांचा विश्रांतीचा पलंग, धुनीची जागा, रथाचा अवशेष जतन करून ठेवला. नंतर पंचमंडळीचा स्वाधीन ही अनमोल संपत्ती केली. झामसिंगाने फार मोठ्या भक्तीची ठेव मुंडगावला दिली. त्यांनी स्वतःचे आयुष्य महाराजांच्या सेवेत खर्ची घातले. २५ जुलै १९१० ला आपला देह महाराजांच्या चरणी ठेवला. 


                                        लेेेखन

                श्री. विजय ढोरे, कार्याध्यक्ष, 

  श्री गजानन महाराज पादुका संस्थान                              मुंडगाव




Edited by:Nilima Shingne-Jagad

टिप्पण्या