Fit India: फीट इंडियासाठी अतिरिक्त तासिकेबाबत शासन सकारात्मक

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी व सुदृढ आरोग्यासाठी शारीरिक शिक्षण महत्वाचेच- उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ 




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: शालेय स्तरावर इयत्ता पहिली ते बारावी इयत्तेसाठी फीट इंडिया अॅसेसमेंट प्रोग्राम राबविण्यास सुरूवात झाली असून, या उपक्रमांतर्गत शाळांची ऑनलाईन  नोंदणी चालू आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वर्षभरात दोन वेळा फिटनेस चाचण्या घेण्यात येणार असून, चाचणी आधारे प्रत्येक विद्यार्थ्यांचे  प्राप्त गुण ऑनलाईन अपलोड करावयाचे आहेत. हे काम  उपलब्ध शारीरिक शिक्षण तासिकेतच करावयाचे आहे . मुळातच शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकविणे, प्रात्यक्षिक घेणे, क्रीडा स्पर्धेची तयारी करून घेणे, खेळाचा सराव घेणे तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेणे, गुणांकन करणे  या करीता उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक साठी असलेल्या ४, ३ व २ तासिका कमी पडत असून त्या मध्ये फीट इंडिया उपक्रमची भर शालेय स्तरावर घालण्यात आल्याने फीट इंडिया उपक्रम यशस्वीतेसाठी वेळापत्रकात दोन वाढीव तासिका प्रचलीत कार्यभारा व्यतिरीक्त देण्यात याव्यात म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष  नरहरी झिरवाळ यांनी शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती यांचे मागणी वरून बैठकीचे आयोजन केले होते. 


या बैठकीत फीट इंडिया मुव्हमेंटची प्राप्त परिस्थितीत शालेय स्तरावर असलेली गरज व या उपक्रमासाठी  शालेय स्तरावर उपलब्ध तासिकेव्यतिरीक्त जादा तासिकांची आवश्यकता असल्याची मागणी अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे यांनी केली. तसेच सध्याचा वेळापत्रकात असलेला कार्यभार, फीट इंडिया अंतर्गत फिटनेसबाबत विद्यार्थ्यांना द्यावयाचे धडे, घ्यावयाच्या चाचण्या, करावयाचे गुणदान, ऑनलाईन गुणांकन भरणे ही कामे उपलब्ध तासिकेत शक्य नसल्याची माहिती शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर व क्रीडा विकास परीषदेचे राज्य सचिव ज्ञानेश काळे यांनी करून दिली. 


या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेली तासिकेची गरज लक्षात घेऊन शासन लवकरच या संबंधी निर्णय घेईल असे शालेय शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार व क्रीडा उपसचिव स्वाती नानल यांनी सांगीतले. प्रत्येक भारतीयाला फीट करणारा हा उपक्रम अतिशय चांगला असून, सद्य परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला रोगप्रतिकारक क्षमता टिकवण्यासाठी व वाढविण्यासाठी शारीरिक शिक्षणाचे महत्व अधोरेखित झाल्याने या उपक्रमास अतिरिक्त तासिका उपलब्ध करून देण्यात याव्यात व त्या संबंधी लवकर निर्णय घेण्यात यावा असे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी संबंधित अधिका-यांना निर्देशित केल्याची माहिती शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाचे सचिव संजय मैंद यांनी दिली. 


भारतात २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फीट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रमाची घोषणा केली. योगदिवस आणि स्वच्छ भारत अभियान या नंतर सर्वांत मोठा असणारा हा उपक्रम आहे. भारतात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत फीटनेसच्या बाबतीत जागरूकता निर्माण करून सुदृढ व बलशाली भारताचे स्वप्न साकारण्यासाठी फीट इंडिया उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात या उपक्रमाअंतर्गत सर्वात मोठा सहभाग हा शालेय विद्यार्थ्यांचा असून या उपक्रमाची यशस्वीता शिक्षकांवर व संबंधित यंत्रणेवर अवलंबून आहे. त्यामुळे या उपक्रमाअंतर्गत वाढीव कार्यभारास तासिकेची गरज असल्याचे शिष्टमंडळाने मांडले. या संदर्भात विभागीय बैठक घेऊन लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उच्च पदस्थ अधिकारी यांनी  दिले.



विधानभवनात उपाध्यक्ष नरहरी  झिरवाळ यांनी बोलावलेल्या या बैठकीस शालेय शिक्षण,  प्राथमिक शिक्षण संचलनालय, क्रीडा विभाग, समग्र शिक्षा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेचे उच्च पदस्थ अधिकारी तसेच शारीरिक शिक्षण संघटनेचे  शिवदत्त ढवळे, राजेंद्र कोतकर, ज्ञानेश काळे, कला - क्रीडा - कार्यानुभव शिक्षक कृती समितीचे ज्ञानेश भोसले, राजू उलेमाले, नितीन चौधरी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या