Crime News: Akola Police: गीता नगरातील घरफोडी सत्राचा लागला छडा; आरोपींना केले उत्तर प्रदेशातून जेरबंद



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: शहरात मध्यंतरी घरफोडीचे सत्रच सुरू झाले होते. ऐनदुपारी देखील चोरीच्या घटना घडल्या. जुने शहर पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या गीता नगर भागात लागोपाठ चोरीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्हयातील आरोपी निष्पन्न झाले असून, तपास पथकाने उत्तर प्रदेश येथे जावुन गुन्हयातील आरोपीना अटक करुन ६,११,७८७/-रु चा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींना अकोल्यात आणले असून, त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.



घटनेची हकीकत अशी की, १८ नोव्हेंबर रोजी पो.स्टे. जुने शहर येथे फिर्यादी लखन संतोष शर्मा (वय २९ वर्ष राहणार नवकार अपार्टमेंट भरतीया भवनजवळ गिता नगर अकोला), खुशाल दिलीपराव नेमाडे, अशिष मनोहर यांनी फिर्याद दिली की, कोणीतरी अज्ञात चोराने ते राहत असलेल्या वेगवेगळया अपार्टमेंट मधील  फ्लॅटचे दरवाजाच्या कुलुप तोडुन, आत प्रवेश करुन, घरातील लॉकर तोडुन त्यामधील सोन्याचांदीचे दागिने व नगदी असा एकुण १,०७,५००/-रु चा मुद्देमाल चोरुन नेला. या तक्रारीवरुन जुने शहर पोलीस ठाणे येथे कलम ४५४,३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला.


स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील पोलीस उपनिरिक्षक सागर तलवार व त्यांचे तपास पथकातील कर्मचारी यांनी गोपनिय बातमीवरुन व तांत्रिक विश्लेषणावरुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. या गुन्हयातील आरोपी हे परराज्यातील उत्तर प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने   हटवार यांनी त्यांचे तपास पथकासह उत्तर प्रदेश येथे जावुन गुन्हयातील आरोपी  मो. रशीद उर्फ मुन्ना मोहम्मद साहिल (वय २३ वर्ष रा. आवाज विकास कॉलनी, हापुड, उत्तर प्रदेश), शान उर्फ शानु मोहम्मद सलीम (वय ३० वर्ष रा. कांदला जि. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश), मोहम्मद मोहसीन उर्फ काला मोहम्मद सगीर (वय २३ वर्ष रा.आकाश विकास कॉलनी, हापुड उत्तर प्रदेश) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेवुन हा गुन्हा उघडकीस आणला. आरोपींकडून गुन्हयातील सोन्याचांदीचे दागिने अंदाजे किंमत १,११,७८७/-रु. चा मुद्देमाल व गुन्हयात वापरलेले वाहन क. UP 14 FT 3818 किंमत ५,००,०००/- रू असा एकुण ६, ११, ७८७/-रु रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


हा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील आरोपी परराज्य उत्तर प्रदेश येथुन ताब्यात घेणे, तसेच गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची जिकरीची कामगिरी होती. ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शैलेश सपकाळ,पोउपनि सागर तलवार व पथकातील सदस्य सदाशिव सुळकर, मो.रफी,अब्दुल माजिद, रवी इरच्छे, एजाज अहमेद, रोशन पटले, पो. स्टे. सायबर येथील निलेश वाटे यांनी केली आहे.



टिप्पण्या