Corona vaccination: अकोल्यात कोरोना लसीकरणास शनिवारी प्रारंभ; पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार लस

Corona vaccination in Akola will start on Saturday;  In the first phase, the vaccine will be given to the health workers




भारतीय अलंकार

अकोला: जिल्हा स्त्री रूग्णालय,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ऑर्बीट हॉस्पीटल अकोला या तीन सेंटरवर लसीकरणाची सुरूवात उद्या शनिवार १६ जानेवारीला सकाळी ९ वाजता पासुन होणार आहे. पहिल्या दिवशी  प्रत्येकी १०० अशा ३००  आरोग्य  कर्मचा-यांना  लसीकरण  करण्यात येणार आहे.  प्रथम टप्प्यात  आरोग्य कर्मचा-यांना लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबतची संपुर्ण तयारी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज  पत्रकार परिषदेत दिली. 


यावेळी  जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी  सौरभ कटियार, आरोग्य विभागाचे प्रभारी उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय महाविद्यालयाचे  डॉ. शिरसाम, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष  शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.


देशात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. उदघाटनानंतर महाराष्ट्रात २८५ ठिकाणी व अकोल्यात ३ ठिकाणी लसीकरणाला सुरुवात होईल. प्रत्येक सत्राचे ठिकाणी  आधीच ठरविलेल्या १०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. पुढील लसीकरणासाठी शासना कडून निर्देश प्राप्त होतील. अकोल्यासाठी ९००० डोस उपलब्ध झाले आहेत. 


या लसीकरणासाठी  Covishield  ही सिरम इंस्टीटयुट ऑफ इंडिया, पूणे व Covaxin ही भारत बायोटेक के. हैद्राबाद यांनी बनविलेल्या लसींना भारत सरकारने मान्यता दिली आहे. ही लस ०.५ मिली. इतकी हाताचे वरच्या बाजूस स्नायू मध्ये दिली जाईल. प्रत्येक लाभार्थ्याला पहिल्या  डोस नंतर किमान २८ दिवसांनी दुसरा डोस दिल्या जाईल.



ही लस टप्याटप्याने दिली जाईल. पहिल्या टप्यात शासकिय व खाजगी वैद्यकिय संस्थांमधील सर्व कर्मचा-यांना दिली जाईल. त्यानंतर पोलीस दल, लष्कर, महसुल, कर्मचारी, तुरुंग विभाग, नगर पालिका व महानगरपालिका कर्मचारी यांना दिली जाईल. यापुढील टप्यात ५० वर्षावरील सर्व नागरीक व ५० वर्षाखालील असे नागरिक ज्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, एचआयव्ही लागण, अशा सारखे आजार असतील, त्यांना लस दिली जाईल. सुरुवातीच्या टप्यामध्ये लस मोफत दिली जाईल. नंतरच्या टप्याबाबत शासन निर्णय घेईल.


जिल्हा पातळीवरुन कोणत्या लाभार्थ्याला कोणत्या तारखेस व कोठे लस मिळेल याबाबतचा संदेश त्यांचे मोबाईलवर मिळेल. आरोग्य संस्थामधील कर्मचारी व दुस-या टप्यातील कर्मचारी यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. इतर नागरिकांना मोबाईलवर ऍप उपलब्ध करुन दिल्या जाईल. या ऍपव्दारे प्रत्येक नागरिकाने लसीकरणासाठी स्वतः नोंद करावयाची आहे. आधी नोंद केलेल्या लाभार्थ्यांना लस मिळेल. वेळेवर नोंद करुन घेण्यात येणार नाही.



पहिला डोस दिल्यानंतर लाभार्थ्यांचे मोबाईलवर तसा संदेश मिळेल त्याचप्रमाणे दुसऱ्या डोसची तारीख देखील मोबाईल वर संदेश देवून कळविण्यात येईल. दोनही डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांचे मोबाईलवर QR कोड असलेले प्रमाणपत्र  येईल. या प्रमाणपत्राची प्रिंट काढून ठेवता येईल. काही कारणास्तव दिलेल्या तारखेस लाभार्थी उपस्थित राहू न शकल्यास पुढील लसीकरण सत्राचे वेळी त्यांना पुन्हा मोबाईल वर संदेश येईल, असे फक्त ३ वेळा होऊ शकेल. त्यानंतर लसीकरण बाबत माहिती दिली जाणार नाही.  कोविड-१९ ची लस ऐच्छीक आहे. लसीचे २ डोस घेतल्यावर २ ते ४ आठवड्यात उत्तम प्रतिकार शक्ती येईल. परंतू लसीकरणानंतरही मास्क वापरणे, हात साबणाने किमान २० सेकंद स्वच्छ धुणे व एकमेकापासून ६ फुटाचे अंतर ठेवणे या खबरदारीच्या उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.



कोविड-१९ ची लस सुरक्षित व प्रभावी आहे. कोणत्याही रोगावरील प्रतिबंधक लस ही १०० टक्के सुरक्षित किंवा प्रभावी नसते. त्याचप्रमाणे याही लसीकरणानंतर तुरळक स्वरुपात इंजेक्शन दिल्याचे जागी दुखणे, जागा लाल होणे, हलका ताप, थकवा, अंगदुखी अशी लक्षणे दिसू शकतात. थोड्या उपचारानंतर ही लक्षणे निघून जातात. अगदी क्षुल्लक प्रमाणात गंभीर आजार उदभवू शकतात. अशा वेळेस तातडीने लसीकरणाचे ठिकाणी लाभार्थ्यास अड्रीलीनचे इंजेक्शन देऊन रुग्णालयात पाठविण्याची सोय करण्यात येईल.


आधी कोविड-१९ चा आजार होऊन ब-या झालेल्या लाभार्थ्यांना लस देण्यात येईल. यामुळे चांगली प्रतिकार शक्ती येईल. कोविडची लक्षणे असणा-या लाभार्थ्यांना लक्षणे पूर्णपणे गेल्यावर १४ दिवसांनी लस दिली जाईल.


लसीची साठवणूक करण्यासाठी शासनाकडे उत्तम प्रतीची उपकरणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. लस देण्यासाठीची  निर्जंतूक सिरींज एकदा वापरल्यावर निकामी होते. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांसाठी नविनच सिरींज वापरली जाते. जितके जास्त नागरिक लस घेतील तितके लवकर आपण या रोगावर नियंत्रण मिळवू शकू, असे देखील पापळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


जिल्हा माध्यम अधिकारी  प्रकाश गवळी , उपसंचालक  विभागाचे मुख्य औषधी निर्माण अधिकारी प्रदिप पहाडे, राजेंद्र इंगळे, औषधी निर्माण अधिकारी रामेश्वर मुंडे, सतिष रिठे, जयंत मालोकार, डि.पी. एम. नागदेव भालेराव व लेखाधिकारी दीपक  मालखेडे आदि उपस्थित होते.


news vidio:Corona vaccination in Akola will start on Saturday; In the first phase, the vaccine will be given to the health workers



टिप्पण्या