Chicken Festival: bird flu:Akola: 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे',चिकन आणि अंडी खाणे सुरक्षित; बर्ड फ्ल्यूची भीती घालवण्यासाठी अकोल्यात 'चिकन फेस्टिव्हल'

Safe to eat chicken and eggs;  'Chicken Festival' in Akola to allay fears of bird flu
नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : कोरोना सोबतच राज्यात बर्ड फ्ल्यूचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे हिवाळ्यात देखील लोकांनी चिकन आणि अंडी खाणे कमी केले. लोकांच्या मनातून बर्ड फ्ल्यू संदर्भातील भीती काढून जनजागृती करण्यासाठी अकोल्यात स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थे तर्फे ' चिकन महोत्सव ' आयोजित करण्यात आला. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे,असा संदेश देत अंडे आणि चिकन खाण्याचे फंडे देखील तज्ञानी उदघाटन प्रसंगी सांगितले. एवढेच नव्हेतर स्वतः यावेळी चिकन खावून, लोकांना देखील चिकन व अंडी बिनधास्त खाण्याचे आवाहन केले.राज्यातील अनेक गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत्युमुखी पडत आहे. याचे एक कारण म्हणजे बर्ड फ्ल्यू रोग असल्याचं समोर आले. ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा उद्रेक झालेला आहे, त्याच ठिकाणी नियंत्रण करण्यासाठी राज्यात दक्षता घेतली जात आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था तर्फे सामाजिक जनजागृतीच्या हेतूने सध्या भेडसावत असलेल्या बर्ड फ्लूच्या समस्ये संदर्भात मार्गदर्शन. तरुण वर्गामध्ये लोकप्रिय असलेल्या पोल्ट्री फार्मिंग उद्योगाला अफवांपासून वाचविण्याकरिता तसेच कोव्हीड-१९ काळात मांसाहारातून निरामय आरोग्य राखण्याकरिता जागरूकता करण्याच्या हेतूने चिकन व अंडी सेवन करण्यासाठी, सकस आहार व पोल्ट्री व्यवसायास चालना देण्याकरिता “चिकन फेस्टिवल – २०२१” चे आयोजन करण्यात आले. यावेळी चिकनप्रेमींना मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच अंडी आणि चिकन तयार करून उपस्थितांना मेजवानी देण्यात आली. दरम्यान,अंडी व कुक्कूट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे तज्ज्ञानी सांगितले. बर्ड फ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, अशी सर्व जनतेने नोंद घ्यावी असेही आवाहन आयोजकांनी केले.


कृतिशील जनजागृती

बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत जनमानस शंकाग्रस्त असतांना, लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष चिकन व अंडी खाऊन कृतिशील जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच पत्रकार व समाजातील विविध घटकांतून लोक सहभागी झाले. येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसरात या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. तुषार बावने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने, अमोल पाटील व राजरत्न वानखडे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद थोरात यांनी केले. बर्ड फ्ल्यू मुळे जनमानसात निर्माण झालेली भिती पाहता चिकन व अंडी यांचे सेवन करण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र शिजवून खालेल्ल्या मांसातून हा आजार होत नाही. इतकेच नव्हे तर हा फक्त पक्षांना होणारा आजार आहे, तो माणसांना झाल्याची एकही नोंद भारतात नाही. अपसमज दूर करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.चिकन व अंडी हे प्रथिनांचा चांगला स्त्रोत

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बावने म्हणाले की,  व्यावसायिक पद्धतीने होत असलेल्या कुक्कुट पालनात पक्षी ठेवण्याच्या जागांचे वारंवार निर्जंतुकीकरण केले जात असते, परिसराची स्वच्छता राखली जाते. त्यांचा अन्य पक्षांशी संपर्क येत नाही. तेव्हा अंडी व चिकन खाणे हे सुरक्षित आहे.डॉ. भिकाने यांनी सांगितले की, स्थलांतरीत पक्षी असे विषाणू आणत असतात. या पक्षांशी पाणी, विष्ठा इ. च्या  माध्यमातून संपर्कात येतात त्यांना या विषाणूची लागण होते. मात्र असे कुक्कुट पालन केलेले पक्षी हे कोणाच्याही संपर्कात येत नसतात. त्यामुळे त्यांचे मांस व अंडी खाणे हे निर्धोक आहे. परसबागेत कोंबडी पालन करणाऱ्या पक्षीपालकांनी आपल्या पक्षांची अधिक निगा राखावी,असे त्यांनी सांगितले.उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी सांगितले की,  चिकन व अंडी हे प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहेत. शरिराची रोग प्रतिकार शक्ती ही त्यामुळे वाढत असते. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषि प्रधान असून कुक्कुट पालन व दुग्धव्यवसाय हे  त्याला पूरक व्यवसाय आहेत. निव्वळ गैरसमजापोटी या व्यवसायांवर अरिष्ट येणे हे योग्य नाही. तेव्हा हा गैरसमज दूर करण्यासाठी आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की,  बर्ड फ्ल्यू या पक्षांमध्ये होणाऱ्या आजाराबाबत माणसांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आयोजित हा कृतिशिल प्रबोधनाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. लोकांनी न घाबरता चिकन व अंडी खावी, असे आवाहनही त्यांनी केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.  प्रवीण बनकर यांनी केले तर डॉ. मंगेश वड्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी चिकन व अंडी यांच्या डिशचा आस्वाद घेऊन  चिकन व अंडी खाणे सुरक्षित असल्याचा संदेश दिला.


टिप्पण्या