Bird flu: अकोल्यात मृत पक्षी आढळले; बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर चार सतर्क केंद्र घोषित,मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळला पाठविले



Dead birds found in Akola;  Declared four vigilance centers in the wake of bird flu, sent samples of dead birds to Bhopal (file photo)




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोना सोबतच बर्ड फ्ल्यूचा धोका देखील वाढत आहे. बर्ड फ्ल्यू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात चार ठिकाणी मृत पक्षी आढळल्याने अकोल्यातही बर्ड फ्ल्यू पोहचला की काय, अश्या भीतीच्या सावटात नागरिक आहेत. दरम्यान, मृत पक्षी निदर्शनास आल्याने या  मृत पक्षांचे नमूने रोग अन्‍वेषण विभाग, पूणे यांचे मार्फत राष्‍ट्रीय उच्‍च सुरक्षा पशुरोग संस्‍था, भोपाळ येथे पाठविण्‍यात आले आहेत. या नमुन्‍यांचा अहवाल प्राप्‍त होईपर्यंत संबंधित क्षेत्रास सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले आहेत.



घोषित केलेल्या सतर्क क्षेत्रात मौजे हातगांव तालुका मुर्तिजापुर येथील राम हिंगणकर यांचे निवासस्‍थान, मौजे चाचोंडी तालुका अकोला येथील डॉ. चिकटे यांचे पोल्ट्री फार्म, चोरवड तालुका अकोट येथील बाळु पोटे यांचे पोल्ट्री फार्म व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवास स्थान या क्षेत्रांचा समावेश आहे. 


घोषित क्षेत्रापासूनचे १० कि.मी. त्रिज्‍येमधील   क्षेत्र  सतर्क क्षेत्र ( Alert Zone)  म्‍हणून घोषीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.  


काय म्हंटले आहे या आदेशात 


मृत पक्षी आढळल्याच्याया ठिकाणांपासून  १० कि.मी. त्रिज्‍येतील क्षेत्र सतर्क क्षेत्र ( Alert Zone) म्‍हणून जाहीर करण्‍यात आले आहे.  या प्रभावित क्षेत्रातील परिसरामध्‍ये  २ टक्‍के सोडियम हायड्रोक्‍साईड किंवा पोटॅशियम परमॅगनेटने  निर्जंतुकीकरण करावे.  तसेच प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्री फार्ममध्‍ये  काम करणाऱ्या  व्‍यक्‍तींनी  चेहऱ्यावर मास्‍क लावणे तसेच हातामोजांचा वापर करणे अनिवार्य आहे.  वापरण्‍यात आलेल्‍या मास्‍क तसेच  हातमोजांची योग्‍यप्रमाणे  विल्‍हेवाट लावण्‍यात यावी. प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्रीफार्म मध्‍ये इतर कुठलेही पशु-पक्षी येणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी. प्रभावित क्षेत्रातील  पोल्‍ट्रीफार्म मधील पक्षांसंबंधीच्‍या आवश्‍यक त्‍या सर्व नेांदी अद्ययावत व व्‍यवस्थित ठेवण्‍यात याव्‍यात,असे आदेशात नमूद केले आहे. 



या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता- १८६० च्या कलम  १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास  याद्वारे  प्राधिकृत करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी  तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे.

टिप्पण्या