AkolaMNC: भ्रष्ट्राचाराचा कळस गाठणारी अकोला मनपा बरखास्त करावी- काँग्रेसची मागणी: प्रदीप वाखारीया यांनी वाचला मनपा भ्रष्टाचाराचा पाढा

 Akola Municipal Corporation, which has reached the peak of corruption, should be dismissed - Congress demands: Pradip Wakharia reads Municipal Corporation Corruption



भारतीय अलंकार24

अकोला: अनेक वर्षापासुन आपल्या अनियमित व भ्रष्टाचारी कारभाराने राज्यात गाजलेल्या अकोला मनपाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून, या संदर्भात शासनाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी या अनियमिततेच्या चौकशीचे आदेश बजाविले आहेत. त्यामुळे राज्यात या मनपाची नाचक्की झाली असून, ही मनपा शासनाने त्वरीत बरखास्त करून प्रशासकाची नेमणुक करावी, अशी मागणी काँग्रेस जेष्ठ नेते प्रदीप वाखारिया व विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण व इतर सर्व काँग्रेस पदाधिका-यांनी केली आहे.


बुधवारी या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत वखारिया यांनी अकोला मनपाच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. मनपा आयुक्तांच्या सहभागामुळे मनपा मध्ये नियमबाहय गुंठेवारी विकास नियमाकुल, टिडीआर हेक्टर ऐवजी चौरस मिटर मध्ये मंजुर करणे, रस्ता जागा, ओपन स्पेस मंजुरीचा सपाटा सुरू असून मर्जीतील बिल्डरांच्या खातर हा विकासाचे नाटक सत्ताधा-यांना हाताशी धरून सुरू असल्याचा आरोप यावेळी केला.


तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कार्यकाळा पासुन आजतागायत सर्व गुंठेवारी नियमाकुल करण्याचा नावावर शेकडो महाभागांना विकास परवानगी देण्यात आली परंतु गरीबांच्या घरकुल योजनेला गुंठेवारीची अट दाखविण्यात येवुन प्रकरण नामंजुर करणे, किती ओपनस्पेस व रस्ता जागेवर मंजुर केलेली टिडीआर प्रकरणे आदिंची चौकशी व्हावी अशी अपेक्षा ववाखारीया यांनी व्यक्त केली.


तसेच सत्तारुढ भाजपा आपल्या आमसभेत एकाच दिवशी चर्चाविणा जे ठराव अजेंडामध्ये सुध्दा नाहीत अशा ठरावाला सुद्धा मंजुरी देवून कोणालाही विश्वासात न घेता केंद्रातील 'मन की बात' नावावर गाजणाऱ्या केंद्र शासना प्रमाणे अकोला महानगर पालिका भाजपा सत्ताधीश सत्ता चालवित आहेत. महानगरपालिकेत अवैध ठरावाच्या अनुषंगाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. तत्कालीन महापौरांचे बिल्डर लॉबीशी असणारे लागेबांधे सर्व जनतेत उघड असून यामुळे मनपा मध्ये महापौर दालन व नगररचना विभागात रंगीत पडदे, कार्यालयाला कॉर्पोरेट ऑफीस सारखी चकाकी आणण्याचे काम करण्यात आले असल्याचे भाजपा नगरसेवकात बोलल्या जात असल्याचे वाखारीया यांनी सांगितले.


उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली

मनपा सत्ताधीश व आयुक्त यांनी, जवाहर नगर ते दुध डेअरी पर्यंतच्या रस्ता जागेचा जनहित याचिकामध्ये उच्च न्यायालयाचे आदेशाला केराची टोपली दाखवुन या यासंदर्भात अवमान झाला आहे. करीता अवमान याचिका दाखल करीत आहे. त्याच प्रमाणे कृषिधन सिडस लि.जालना यांचा लेआउट २०१२ मध्ये नियमबाहय विकास परवानगी मनपा प्रशासनाने दिली आहे. यामध्ये उच्च न्यायालयाने साडेतीन एकर जागा कामगारांसाठी ठेवावी, सदर देणी पुर्णपणे जो पर्यंत मिळत नाही तोपर्यत सदर जागा विकता येणार नाही असे आदेशीत केले होते. मात्र, कामगारांसाठी साडेतिन एकर जागा कृषिधन सिड्स लि.ने आपल्या लेआउट मध्यो दर्शविली बसून कामगारांची दिशाभुल या माध्यमातुन झाली आहे. हा भुखंड हा गुंठेवारी पध्दतीचा विकास परवानगी असून नकाशा मध्ये ओपनस्पेस सार्वजनिक रस्ता सोडण्यात आला नाही. या बाबत २०१२ पासुन सतत आयुक्त मनपा यांना सुनावणी देण्यासाठी विनंती करीत आहे. परंतु, त्यांनी सुनावणी न दिल्यामुळे आपण स्वतः न्यायालयात या संदर्भात अवमान याचिका दाखल करीत असल्याची माहिती वखारीया यांनी यावेळी दिली.


अशा पध्दतीने सत्ताधारी भाजप सन २००१ पासून आतापर्यंत जवळपास साडेतेरा वर्ष मनपात सत्ता गाजवित असून, विकासाच्या नावावर केवळ भ्रष्टाचार करीत असल्याचे दिसून येत आहे.


भ्रष्टाचाराचा आणखी एक नमुना म्हणजे सन २०१७ च्या मनपा निवडणुकी आधी स्थायी समितीमध्ये अमरावतीच्या स्थापत्य कंपनीला मालमत्ता कर, टॅक्स वसुलीधे कंत्राट देण्याचा ठराव पारीत करण्यात आला होता. मालमत्ता कर व हे टेंडर २०१७ च्या निवडणूकी नंतर भाजपा सत्ताधा-यांनी ठराव मंजुर करुन व आलेल्या एका निवीदा धारकालाच आठ कोटीचे टेंडर मंजुर करून अकोला शहरवासीयांची लुट केली आहे,असा आरोप देखील वाखारीया यांनी केला.


मनपा कार्यरत सत्ताधारी वर्ग भ्रष्टाचाराचे मार्गाने अवैध संपत्ती जमा करत असून दुसरीकडे शहर भकास होवून सर्व नागरी प्रश्न ऐरणीवर उभे राहीले आहेत. एकीकडे अतिक्रमण, गर्दी, नविन सिमेंटचे रस्त्याला तडा गेल्या, छोटे गड्डे पडले, दिवाबत्तीची सोय, गलीच्छ वस्ती सुधार निर्मुलन, डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरातील रहीवाशांना त्यापासुन होणारे आजार, अनियमित पाणीपुरवठा, मनपा दवाखान्यांचे बेहाल, बाजार ,उद्यान मनपा शाळा याकडे भाजपा सत्ताधा-यांचे सतत दुर्लक्ष असून केवळ मलीदा मारण्यातच त्यांची हुशारी आज जनतेला दिसुन येत आहे,अशी टीका देखील वाखारीया यांनी केली.


शासनाने ही मनपा त्वरीत बरखास्त करून कार्यक्षम प्रशासकाची नेमणुक करण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.  मनपाला चेतावणी म्हणुन यापुढे जनआंदोलनाची भुमिका घेण्यात येणार असून, नागरीकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सर्व कॉग्रेसिनीं केली आहे.


प्रदीप वाखारीया,साजिद पठाण यांच्यासह पत्रकार परिषदेला रमाकांत खेतान, राजाभाऊ देशमुख, तश्वर पटेल,उमाकांत कवाडे, शैलेश सूर्यवंशी, डॉ.जिशान हुसेन, निखिलेश दिवेकर, अविनाश देशमुख, कपिल रावदेव, पुष्पा देशमुख, विलास गोतमारे, आकाश कवडे आदी उपस्थित होते.



टिप्पण्या