Akola Police: सायबर पोलिसांनी २४ तासांचे आत तक्रारदाराच्या बँक खात्यातून गेलेले पंचावन्न हजार रुपये परत मिळवून दिले

                                प्रातिनिधिक चित्र


बनावट कस्टमर केअर नंबर पासून रहा सावध: ऑनलाईन नंबर शोधताना सतर्कता बाळगा:जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आवाहन



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कापशी तलाव येथील रहिवासी प्रकाश इंगळे यांनी आपल्या बँक खात्यातून ५५ हजार रुपये गेल्याची तक्रार काल अकोला सायबर पोलीस स्टेशनला केली होती. अवघ्या २४ तासाच्या आत सायबर शाखेच्या पोलिसांनी आज तक्रारीचा निपटारा करून तक्रारदारास दिलासा दिला आहे.



अशी घडली घटना

                                प्रातिनिधिक चित्र

या घटनेची हकीकत अशी की, काळ २८ जानेवारी रोजी तकारदार प्रकाश पुंडलिक इंगळे ( कापशी तलाव, अकोला)  यांनी सायबर पोलिस स्टेशन येथे तकार दिली की, त्यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडीयाचे कापशी येथील शाखेमध्ये खाते असून, त्यात ९०,०००/- रु रक्कम होती. आज रोजी त्यांचे मुलाचे विमान तिकीट रद्द करुन तिकीटाचे पैसे परत मिळण्याकरीता गुगलवर विमान कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर कॉल केला.  या कस्टमर केअरच्या प्रतिनिधीने मुलाला बँकेचे अकाउंट तसेच एटीएमची माहिती विचारली. त्यांचे मुलाने बँक अकाउंट व एटीएमची माहिती दिली असता त्यांचे बँक अकाउंट मधुन ५५०००/-रु कमी झाले बाबत तक्रार दिली होती.


इंगळे यांच्या तक्रारीवरून बँक स्टेटमेंटचे अवलोकन केले असता, रक्कम ही दोन टप्प्यामध्ये ५००००/- रु व ५०००/-रु अशी अनुक्रमे फ्लिपकार्ट व एरॉनपेला वळती झाल्याचे लक्षात आले. सायबर पोलिस स्टेशन येथील कर्मचारी यांनी तात्काळ फ्लिपकार्ट व एरॉनपेशी संपर्क करुन घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. तसेच रक्कम तक्रारदारास परत करण्याबाबत कळविले. फ्लिपकार्ट व एरॉनपे यांनी ही रक्कम तक्रारदार यांना परत केली असून, ती रक्कम तक्रारदार यांचे बँक खात्यामध्ये ७-२१ दिवसांत येणार आहे.


ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनखाली सायबर पो.स्टे. चे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे , पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके, तसेच अतुल अजने, गोपाल ठोंबरे, गणेश सोनोने यांनी केली आहे.



नागरिकांनी घ्यावयाची काळजी


                                प्रातिनिधिक चित्र

*सध्या धावपळीच्या काळात आपण बरेच आर्थिक व्यवहार हे इंटरनेटच्या माध्यमातुन करीत असतो. परंतू आर्थिक व्यवहार करतांना नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. 


*आपल्या बँक अकाउंटची माहिती तसेच आपले एटीएमची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला न सांगता नागरिकांनी इंटरनेटचा वापर करतांना अधिकृत संकेतस्थळावरच ऑनलाईन व्यवहार करावा.


*अलीकडचे काळात नागरीकांचे फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असुन बऱ्याच प्रकरणांमध्ये नागरीकांची फसवणुक ही बनावट ग्राहक सेवा केंद्र (Customer Care) (हॅश टॅग # Customer Care) फोन कॉल्सपासुन फसवणुक झालेली आहे. 


*नागरिकांनी गुगलवर कोणतेही ग्राहक सेवांचे क्रमांक शोधतांना सतर्क असणे आवश्यक आहे. 


*तसेच कोणतेही ग्राहक सेवा केंद्र प्रतिनिधी आपल्या मोबाईल मध्ये Any Desk, Quick Supports etc.ऍप डाउनलोड करण्यास सांगत नाही.



*अशा ऍप्लिकेशन मुळे समोरच्या व्यक्तीला आपल्या मोबाईल मध्ये शिरकण्याचा मार्ग मिळु शकतो त्या करीता नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करतांना सतर्क असणे आवश्यक आहे,असे आवाहन अकोला जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

टिप्पण्या