TokyoOlympics2021:ऑलिम्पिक पात्र खेळाडू राज्याचे वैभव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Five athletes have been selected for the 2021 Olympics in Tokyo.  This player is the glory of the state.  It is the responsibility of the government to increase it.  The government has taken custody of the players.  Chief Minister Uddhav Thackeray said that his government will always support the players.



भारतीय अलंकार

मुंबई :  टोकियो येथील २०२१ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ५ खेळाडू वीरांची निवड झाली आहे. हे खेळाडू म्हणजे राज्याचे वैभव आहे. ते वाढविण्याची जबाबदारी सरकारची आहे. खेळाडूंचे पालकत्व सरकारने घेतले आहे. आपले सरकार नेहमी खेळाडूंच्या पाठीशी राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.




टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपये असे २.५० कोटी रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले. यावेळी क्रीडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची उपस्थिती होती.



यावेळी शुटींग १० मीटर एअर रायफल स्टँडींग कॅटेगरी - एस एच १ चे खेळाडू स्वरुप उन्हाळकर (पॅरा ऑलिंपिक), शुटींग २५ मीटर स्पोर्टस पिस्टलच्या खेळाडू राही सरनोबत, शुटींग ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या खेळाडू तेजस्विनी सावंत, आर्चरी रिकर्व्हर सांघिकचे खेळाडू प्रवीण जाधव, ॲथलेटिक्स ३००० मीटर स्टिपलचे खेळाडू अविनाश साबळे यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य  वितरित करण्यात आले.



मुख्यमंत्री म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये पदके मिळत नाहीत तर मिळवावी लागतात. खेळाडूंना परिश्रमाबरोबरच एकाग्रताही महत्त्वाची असते. हे राज्याचे वीर ऑलिंपिकमध्ये नेत्रदीपक यश संपादन करतील आणि राज्यासह देशाचा मान वाढवतील. निवडण्यात आलेल्या पात्र खेळाडूंनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळविली आहेत. त्यामुळे त्यांनी यशाची कमान अशीच चढती ठेवावी आणि राज्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.



उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निवडण्यात आलेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य वितरणाचा कार्यक्रम भव्य स्वरुपात करण्याचा सरकारचा विचार होता. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी पद्धतीने करावा लागत आहे. हे खेळाडू ऑलिंपिकमध्ये पदक जिंकून आल्यानंतर राज्यासह देशाला अभिमान वाटेल अशा स्वरुपाचा समारंभ आयोजित करण्यात येईल. खेळाडूंसाठी सरकार नेहमी सकारात्मक भूमिका घेत आहे. शासकीय सेवेत आरक्षण, तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर क्रीडा संकूले बांधण्यात येत आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात खेळाडू पुढे आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भविष्यातही क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासराठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे पवार यांनी सांगितले.



क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, महिला व मुलींना खेळामध्ये प्रोत्साहन देण्याकरिता  'गो-गर्ल -गो' ही योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच सर्व क्षेत्रातील खेळांडूना प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे आता राज्यात जागतिकस्तरावरील प्रशिक्षक निर्माण होतील. भविष्यात सुवर्ण पदकांची लयलूट करणारे खेळाडू निर्माण होतील. राज्यात स्वतंत्र क्रीडा विभाग स्थापण्यासाठीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, यावर मुख्यमंत्र्यांनी नक्कीच यावर विचार करण्यात येईल, असे सांगितले.



यावेळी शुटींग-२५ मीटरच्या खेळाडू राही सरनोबत यांनी मनोगतात सांगितले की, आम्ही सर्व खेळाडू पदके जिंकण्यासाठी परिश्रम घेत आहोत. सरकारही पाठीशी असल्याने आम्ही कठोर परिश्रम घेऊन पदके जिंकून राज्याचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करु.


यावेळी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनीही मनोगत व्यक्त केले. क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी उपस्थितांचे आभार मानले.


टिप्पण्या