- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली
भारतीय अलंकार
ठाणे: रंगभूमी, मालिका आणि चित्रपट सृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा आप्त परिवार आहे.
काल रात्री रवी पटवर्धन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. पटवर्धन यांना मार्च मध्ये देखील हृदयविकाराचा झटका आला होता. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे,अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी प्रसार माध्यमाना दिली.
उध्दव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
"रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने "भारदस्तपणा" मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत", अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
'बबड्याचे आजोबा' म्हणून त्यांना नवी ओळख
                              छायाचित्र: संग्रहित
रवी पटवर्धन यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३७ रोजी झाला. मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपट सृष्टी गाजवल्यानंतर रवी पटवर्धन यांनी छोट्या पडद्यावर देखील आपला ठसा उमटवला. भारदस्त व्यक्तिमत्वामुळे त्यांनी गावचा पाटील, पोलिस आयुक्त आणि न्यायधीश अश्या भूमिका त्यांना शोभून दिसत होत्या.पटवर्धन यांनी खलनायकी भूमिका सुध्दा दमदार रंगवल्या. 
पटवर्धन यांनी दीडशेहून अधिक नाटकांमध्ये आणि दोनशे हून अधिक चित्रपट केले. सन १९७४ मध्ये रत्नाकर मतकरी यांच्या सोबत आरण्यक या नाटकात पहिल्यांदा त्यांनी काम केले होते. त्यानंतर वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांनी या नाटकात धृतराष्ट्राचीच भूमिका साकारली. 'अग्गबाई सासूबाई' ही त्यांची शेवटची मालिका ठरली. बबड्याचे आजोबा म्हणून त्यांना नवी पिढी ओळखते.
सन १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात पटवर्धन यांनी वयाच्या साडेसहा वर्षांच्या वयात भूमिका साकारली होती. बालगंधर्व हे या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते.
७०० श्लोक पाठ
अलीकडे त्यांना विस्मरणाचा त्रास जाणवत  होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्राचे देखील धडे गिरविले. विशेष म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी भगवद्ग गीतेतील ७०० श्लोक पाठ केले. शृंगेरी मठाच्या परीक्षेला देखील बसले होते. या परीक्षेत रवी पटवर्धन यांनी पहिले स्थान मिळविले होते.
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
  
  
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा