Marathi education :अमराठी मोहसिन पठाण सलग तिसऱ्यांदा मराठी विषयात अव्वल!





अधि.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: मातृभाषा उर्दू आणि व्यवहारिक भाषा हिंदी असल्याने मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकणे, ही अत्यंत कठीण बाब असते. मराठी भाषा आत्मसात करून त्यात प्रावीण्य मिळविणे हे तर आणखीनच दिव्य कार्य. अलीकडे तर मातृभाषा मराठी असलेले लोक सुद्धा शुद्ध आणि अस्खलित मराठी बोलू शकत नाहीत. तसेच शालान्त परीक्षेतही मराठी भाषिक विद्यार्थी नापास झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत, आणि हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र, मराठी भाषेचा घरात गंधही नसलेल्या अमराठी भाषिक  मोहसिन पठाण याने विद्यापीठ परीक्षेत सलग तिसऱ्यांदा प्रावीण्य मिळवित प्रथम स्थान प्राप्त केले आहे, हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.


मोहसिन हा अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. मोहसीन पठाणने  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम. ए. मराठी परिक्षेत सलग तिसऱ्यांदा प्रावीण्य मिळविले.  विशेष म्हणजे ४०० गुणांपैकी ४०० गुण मिळवून शंभर टक्के गुणांसह  प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.



मोहसिनची मातृभाषा उर्दू असतानाही मराठी शिकण्यासाठी त्याने मराठी विभाग प्रमुख डॉ. सुलभा खर्चे, डॉ. श्रद्धा थोरात, प्रा. विनय पैकीने यांच्या शिकवणीतून  बारकाईने लक्ष केंद्रित करून, मराठी चांगल्या पद्धतीने आत्मसात केली. यामुळे महाविद्यालयात मराठीत सलग तिसऱ्यांदा एम ए मराठीच्या अंतिम सत्रात प्रथम क्रमांक मिळविण्यास मोहसिन पात्र ठरला आहे.


या यशाबद्दल मोहसिनवर सर्व स्तरातून अभिनंदनाची वर्षाव होत आहे. प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या हस्ते मोहसिनचा सत्कार देखील करण्यात आला. प्रा.दत्ता भारसाकळे, तसेच प्रा. संजय पोहरे, प्रा. विकास शिरसाट, डॉ.रावसाहेब काळे, डॉ. साधना कुलट, प्रा. प्राची मेंढे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले असल्याने हे यश गाठता आले असल्याची प्रांजळ कबुली मोहसिनने दिली. मोहसीनने भविष्यात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून उच्च पदस्थ अधिकारी होण्याचा मानस व्यक्त केला.  या सर्व यशाच्या मार्गात आई-वडील, मित्र वर्ग यांची सातत्याने साथ लाभत असल्याचेही मोहसीनने सांगितले. 

टिप्पण्या