- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
HindKesari Shripati Khanchanale behind the curtain of time
अधि. नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: ज्येष्ठ कुस्तीपटू भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीपती खंचनाळे यांनी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने श्रीपती खंचनाळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती बिघडल्याने नोव्हेंबर महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
श्रीपती खंचनाळे यांचा जन्म १० डिसेंबर १९३४ रोजी शेतकरी कुटुंबात झाला होता. १९५९ मध्ये झालेल्या पहिल्या हिंद केसरी स्पर्धेत बनता सिंग यांना पराभूत करत श्रीपती खंचनाळे हे देशातील पहिले हिंद केसरी ठरले होते. त्याचवर्षी आनंद शिरसागर यांना पराभूत करत त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धाही जिंकली होती.
खंचनाळे हे मूळचे सीमाभागातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावचे होते. ते कित्येक वर्षांपासून कोल्हापुरात वास्तव्यास होते. विविध कुस्ती स्पर्धांत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजविला. नवीन मल्लांना तालमीत धडे देण्याचे काम ते करीत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध कुस्ती मैदाने गाजवली होती.
हिंदकेसरीची अविस्मरणीय लढत
हिंदुस्तानातील कुस्तीतील सर्वोच्च हिंदकेसरी पदाचा बहुमान स्पर्धाच्या पहिल्याच वर्षी खेचून आणणारे नामांकित पैलवान म्हणजे पैलवान श्रीपती खंचनाळे होय. १९५९ मध्ये राजधानी दिल्लीतील न्यू रेल्वे स्टेडीयममध्ये साखळी फेरीतील सर्व- कुस्त्या चितपट मारून खंचनाळे अंतिम फेरीत पोहोचले. अंतिम फेरीत गाठ पडली रुस्तुम-ए-पंजाब पैलवान बत्तासिंग बरोबर. या कुस्तीला पंच होते गुरू हनुमानसिंग (सतपालचे गुरु). दोघेही पैलवान तुल्यबळ असल्याने काट्यावरची लढत होती. क्षण- क्षणाला कुस्तीचे पारडे कधी या बाजूला तर, कधी त्या बाजूला झुकत होतं. २८ मिनिटे होऊन गेली तरी, निर्णय लागत नव्हता. त्यामुळे पंचानी कुस्ती अनिर्णित घोषित केली. हिंदकेसरीपदाचे ते पहिलेच वर्ष असल्याने ती कुस्ती निकालीच करावी, असे खंचनाळेंचे मत पडले. त्यानंतर कुस्ती होऊन पै. बंत्तासिग याला घुटना डावा वरती चितपट करत पहिले हिंद केसरी होण्याचा मान मिळवला.
देशातील प्रमुख मल्लसोबत लढत
बंत्तासिग, नझीर अहमद, बचनसिग, खडकसिग, चांदा पंजाबी, गणपतराव आंदळकर, कर्तार पंजाबी, सादिक पंजाबी या पहिलवानां सोबत झालेल्या लढतींचे किस्से आजही जुन्या पिढीतले मल्ल सांगत असतात. हिंद केसरी नंतर १९६२ साली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खंचनाळे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले होते. आयुष्यभर 'कुस्ती हेच जीवन' असे म्हणत ते जगले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा