Election2020: अमरावती मध्ये भाजपा उमेदवार बाद; केवळ २५२९ मते!

अमरावतीने शिवसेना आणि भाजपावर  नामुष्कीची वेळ आणली आहे


माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वीच शिवसेनेला डिवचताना ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही, आमचा एक तरी आला, असा टोला हाणला होता.






भारतीय अलंकार

अकोला: विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. तर अमरावती मध्ये भाजपाच्या उमेदवारावर बाद होण्याची वेळ आली.  भाजपचे उमेदवार नितीन धांडे २२ व्या फेरीत बाद झाले असून, त्यांना एकूण मते २५२९ मिळाली आहेत.




पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी केले. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्याने विजयी झाले. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण ५८ हजार मताधिक्याने विजयी झाले. 





अमरावतीमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपाचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेल्याने बाद ठरविण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वीच शिवसेनेला डिवचताना ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही, आमचा एक तरी आला, असा टोला हाणला होता. तो याच अमरावतीच्या जागेवरून होता. मात्र, आता भाजपाचा उमेदवारच शर्यतीतून बाद झाल्याने खळबळ उडाली आहे. 



अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत एकूण ३०९१८ मतदान झाले. यापैकी २९८२९ मते वैध ठरली. तर सध्या आघाडीवर असलेले अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना ८०८९ मते मिळाली आहेत. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीची २२ वी फेरी संपली असून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ६४५५ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार  शेखर भोयर यांना ५९२८ मते मिळाली असून अन्य दोन अपक्षांनी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर मजल मारली आहे. भाजपाचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. 




विधान परिषदेची पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांमधील निवडणुकीचे निकाल धक्कादायक असले तरीही अमरावतीने शिवसेना आणि भाजपावर मोठी नामुष्कीची वेळ आणली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना लढवत असलेली एक जागा निवडून आणता आलेली नाही. तर दुसरीकडे भाजपाच्या उमेदवारावर बाद होण्याची वेळ आली आहे. 









टिप्पण्या