Education news:अकोल्यात केंद्रीय विद्यापीठ व्हावे; प्राचार्य संघाची मागणी





अधि. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: महाराष्ट्रातील एकूण १३ अकृषक विद्यापीठांची कार्यक्षमता लक्षात घेता त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने महाविद्यालये व विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात सुद्धा हीच अवस्था आहे. कित्येक वर्षांपासून अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे व्हावे म्हणून मागणी केली जात आहे. या विद्यापीठाचे उपकेंद्र किंवा नवीन विद्यापीठ अथवा केंद्रीय विद्यापीठ अकोला शहर किंवा परिसरात स्थापन करण्यात यावे,अशी मागणी अकोला प्राचार्य संघटना यांनी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.याबाबत प्राचार्यांची सभा पार पडली.



४०० च्यावर महाविद्यालय

१९८३ अमरावती विद्यापीठ स्थापन झाले तेव्हा केवळ एकूण ७० महाविद्यालय होती या विद्यापीठाची क्षमता २०० महाविद्यालय असताना आज ४०० च्यावर महाविद्यालय व मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या आहे. मात्र विद्यापीठाचे कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दुपटीने कार्य क्षमतेचा भार असून विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागतो. विद्यापीठाच्या शैक्षणिक कामानिमित्त देऊळगाव राजा, बुलडाणा, सिंदखेड राजा अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवस मुक्कामी राहून व मोठ्या प्रमाणावर खर्चही करावा लागतो. तसेच वाशीम, अकोला, बुलढाणा यवतमाळ या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व पालकांना हीच गैरसोय सातत्याने अनेक वर्षापासून सहन करावी लागत आहे. 



अकोला शिक्षण हब

अनेक वर्षांपासून विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे व्हावे म्हणून मागणी केली जात आहे. या विद्यापीठाचे उपकेंद्र किंवा नवीन विद्यापीठ किंवा केंद्रीय विद्यापीठ अकोला शहरामध्ये किंवा परिसरात स्थापन झाल्यास या भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण व संशोधनाची वेगळी सोय निर्माण होईल. आज अकोला शहर शिक्षणाचे हब झालेले आहे. पूर्ण विदर्भातून ट्युशन क्लासेसच्या निमित्ताने लाखो विद्यार्थी या शहरात विविध महाविद्यालयात प्रवेश घेतात. अनेक महाविद्यालय 'अ' दर्जाची असून मोठ्या प्रमाणात  उच्च शिक्षणाची व संशोधनाची सुविधा सुद्धा अकोला शहरामध्ये विविध महाविद्यालयात आहे. परंतु हे संशोधन संपूर्ण भारतीय स्तरावर पोचण्यासाठी स्थानिक पातळीवर अशा केंद्रीय विद्यापीठाची स्थापना झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. आज अकोला शहरातील केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री  संजय धोत्रे हे असतांना ही मागणी पूर्णत्वास येणे, ही जनतेची अपेक्षा असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य एकत्र येऊन अशा प्रकारची मागणी लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांना केलेली आहे. 



विमान उड्डाण सुविधा व्हावी

यासोबतच अकोला जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना व पालकांना तसेच अधिकारी कर्मचारी व व्यापाऱ्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात कमीत कमी वेळात जाता यावे यासाठी अकोला येथील शिवनी विमानतळा  वरून दररोज डोमेस्टिक विमानाच्या उड्डाणाची सुविधा व्हावी, अशीही मागणी या प्राचार्य संघांनी केलेली आहे. जेणेकरून अकोला शहर हे संपूर्ण भारताशी जोडले जाईल व विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत इतरही सुविधा प्राप्त होतील. अकोला शहर अनेक वर्षापासून विविध सुविधांपासून वंचित असलेले शहर म्हणून व ओळखले जाते ही ओळख बदलून सुविधांचे उच्च शिक्षणाचे संशोधनाचे शहर म्हणून अकोला शहराचा उदय व्हावा अशी या प्राचार्य संघांने मागणी केली आहे. 


शिवाजी महाविद्यालयात सभा

स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या सभेमध्ये केंद्रीय विद्यापीठ अकोल्यात व्हावे,या संदर्भात चर्चा करण्यात आली. जेणेकरून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये भर पडून जिल्ह्याची एक नवीन ओळख निर्माण होईल. सभेत प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके, प्राचार्य डॉ. विजय नानोटी, प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, प्राचार्य जयंत बोबडे, प्राचार्य डॉ.देवेंद्र व्यास, प्राचार्य डॉ.जगदीश साबू, प्राचार्या डॉ.संगीता नाईक यांची उपस्थित होती.

टिप्पण्या