Bharat band: दूध, फळ, भाजीपालाची वाहतूक राहणार बंद; अत्यावश्यक सेवा, विवाह सोहळ्यात अडथळा होणार नाही…

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर आंदोलन अधिक तीव्र...

                                      File photo




भारतीय अलंकार

नवी दिल्ली/मुंबई: मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यानी उद्रेक व्यक्त केला आहे. दोन महिन्यांपासून पंजाब, हरयाणासह अन्य राज्यातील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली' म्हणत दिल्लीची सीमा गाठली.बारा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून,मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.दरम्यान, आंदोलकांनी ८ डिसेंबर भारत बंद चे आवाहन केले असून, देशभरातून शेतकऱ्यांना व्यापक प्रतिसाद मिळत आहे.उद्याच्या बंद मध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.





मोदी सरकारने नव्याने केलेले कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०, शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक २०२० हे रद्द करावेत. कृषी मालाला हमीभाव देण्याची हमी द्यावी. त्याचबरोबर प्रस्तावित वीज कायदाही मागे रद्द करावा,यासाठी हे आंदोलन सुरू आहे. दिल्लीत दाखल झाल्यानंतर या मागण्यां वरून सरकार सोबत पाच वेळा चर्चा होऊनही कोणताही तोडगा निघालेला नाही,यामुळे शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली.




उद्या मंगळवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत भारत बंद पुकारण्यात आला आहे. विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. बंद दरम्यान चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. यामुळे वस्तु व सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या काळात दूध, फळ, भाजीपाला यांचीही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.







नेते योगेंद्र यादव यांनी प्रसार माध्यमांना भारत बंदची माहिती देताना सांगितलं की, "बंद दरम्यान चक्का जाम करण्यात येणार आहे. या काळात दूध, फळ, पालेभाज्या यांची वाहतूक बंद राहणार आहे. मात्र, विवाह सोहळे व अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण केला जाणार नाही."




भारत बंद सकाळी सुरू होईल. याकाळात सर्व व्यवहार बंद राहतील. त्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर चक्का जाम आंदोलन मागे घेतल्या जाणार आहे.सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील, अशी चेतावणी शेतकरी संघटनांनी दिली आहे.




दुसरीकडे महाराष्ट्रासह देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही बंदला पाठिंबा जाहीर केला असून, उद्या समित्या बंद राहणार आहेत. त्यामुळे फळ व भाजीपाल्याचा पुरवठाही बंद राहणार आहे. महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्या विरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार आणि व्यापारी संप करणार आहेत.




संपाचा परिणाम फळ व पालेभाज्याच्या पुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे उद्या दूधाबरोबरच फळ व पालेभाज्या मिळण्याची शक्यता कमीच आहे. शेतकरी नेते बलदेव सिंह यांच्या माहितीप्रमाणे भारत बंद शांततापूर्ण मार्गाने करण्यात येणार आहे. जर कुणी हिंसा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.











टिप्पण्या