- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात भारत बंद आंदोलनाला नागरिकांनी देखील समर्थन दिले.
भारतीय अलंकार
महाराष्ट्र: नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांनी आज ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद' पुकारला आहे. राजधानी दिल्लीत १३ दिवसांपासून आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निनिर्णय झाला नाही. शेवटी आंदोलक शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिले आहे. महाराष्ट्रात भारत बंद आंदोलना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
थोडक्यात आढावा
नांदेड: केंद्राने आणलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या भारतबंद ला पाठिंबा देत हे काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस तर्फे आज नांदेडमध्ये निदर्शने दिली.
बुलडाणा: अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद ला आज बुलडाणा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदचे आवाहन करण्यासाठी बुलडाणा शहरातून  रविकांत तुपकर  यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
यवतमाळ : शेतकरी कृषी कायद्या विरोधातील भारत बंद आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याच्या सर्वच बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत. यवतमाळच्या बस स्थानक चौकात आंदोलकांनी ठिय्या दिला. महाविकास आघाडीचे सर्वच नेते आंदोलनात सहभागी झालेत.
ठाणे: केंद्र सरकारने लादलेल्या कृषि कायद्याच्या विरोधात गेले अनेक दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश चिटणीस, नगरसेवक सुहास देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शेतकरी नांगर आणि ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते.
मनमाड : किसान सभा आणि काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. मोर्चा काढून पुणे-इंदौर महामार्गावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
मुंबई: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मुंबईत विविध ठिकाणी भारत बंद आंदोलन सुरू आहे. पवई, अंधेरी रेल्वे स्थानक, मालाड, मीरारोड आदी ठिकाणी मोर्चा, निदर्शने देण्यात आली. मुंबईच्या जनजीनवावर या भारत बंदचा फारसा प्रभाव पडला नाही. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआयएम यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन केले गेले.
गडचिरोली : गडचिरोली, देसाईगंज वडसा शहरात बाजारपेठांसह बाजार समित्याही बंद आहेत. शहरातील भाजीपाला मार्केट मात्र सुरु आहे. गडचिरोली चंद्रपूर मार्गावर चक्का जाम करण्यात आला. दक्षिण गडचिरोली भागातील आलापल्लीसह इतर गावातील दुकाने सुरू आहेत.
वसई: वसई विरार नालासोपारा शहरात ही आज भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आज वसई रेल्वे स्थानकाजवळ उतरून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली. भिवंडीत अल्प प्रतिसाद मिळाला.
बारामती: शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला बारामतीत चांगला प्रतिसाद मिळाला. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली. सासवड, इंदापूर आणि दौड कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद आहे. भिगवन मच्छी मार्केट बंद ठेवले आहे.
रायगड : जिल्ह्यात भारत बंदला मिश्र प्रतिसाद मिळाला. अलिबाग, माणगाव भागांत दैनंदिन व्यवहार सुरु होते. हॉटेल आणि दुकाने उघडली होती. मात्र, रस्त्यावर वर्दळ नेहमीच्या तुलनेत कमी होती.
पुणे: पुण्यातील व्यापारी संघटनांनी आधीची भूमिका बदलत शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लक्ष्मी रस्ता आणि इतर बाजारपेठ बंद होत्या. व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा जाहिर केला होता मात्र, बंदमध्ये सहभागी होणार नाही,अशी भूमिका घेतली होती. परंतू, बंदला समर्थनार्थ काढण्यात येणारा मोर्चा मुख्य बाजारपेठेतुन जाणार असल्याने या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला.
नाशिक: भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी कडकडीत बंद पुकारला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर बंदचा कोणताच परिणाम दिसला नाही. नाशिक मधील लासलगाव, मनमाडसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनी पाठिंबा दिल्याने बाजार समिती मध्ये शुकशुकाट पहायला मिळाला.
नवी मुंबई: एपीएमसी मार्केट मध्ये आज शुकशुकाट पाहिला मिळला. दररोज या मार्केटला भाजी विक्रीसाठी हजारों गाड्या येतात. आज मात्र व्यापारी, शेतकरी आणि कामगारांनी भारतबंद मध्ये सहभाग घेत कडकडीत बंद पाळला.
दिंडोरी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप जगताप यांनी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावात शेतकरी विरोधी कृषी कायद्यांची होळी केली.
नागपूर: संत्रा मार्केट मधील व्यवहार सुरू होते. मात्र रोजच्या तुलनेत तुरळक ग्राहक बाजारात दिसले.
सोलापूर : सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे. बाजारात अगदी पहाटे पासून सुरू होणारे लिलाव आज बंद पाहायला मिळाले. कांदा, किराणा मालाची बाजारपेठ पूर्णपणे बंद होते.
जालना : दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बाळगोपाळांना तसेच ग्रामस्थांना दूध वाटप करण्यात आले. आज दूध बाजारात घेऊन न जाता ते मोफत वाटून या कार्यकर्त्यांनी शेतकरी कायद्याचा निषेध केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे अत्यंत शांततेने सुरु आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांनी शांततेने सहभागी होण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते.
  
  
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा